Diwali 2022: आताच्या तुलनेत पूर्वीची दिवाळी कशी साजरी होत होती, त्याचे थोडक्यात शब्दचित्रण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:08 PM2022-10-13T14:08:59+5:302022-10-13T14:09:28+5:30

Diwali 2022: दोन पिढ्या एकत्र आल्या की त्यांच्यात पूर्वी आणि आता ही तुलना होतच राहते. त्यानिमित्ताने दिवाळीच्या १०० वर्षांपूर्वीच्या आठवणी!

Diwali 2022: A brief vignette of how Diwali was celebrated in yesteryear compared to now! | Diwali 2022: आताच्या तुलनेत पूर्वीची दिवाळी कशी साजरी होत होती, त्याचे थोडक्यात शब्दचित्रण!

Diwali 2022: आताच्या तुलनेत पूर्वीची दिवाळी कशी साजरी होत होती, त्याचे थोडक्यात शब्दचित्रण!

googlenewsNext

समाजमाध्यमांवर हे चित्र सध्या खूप फिरत आहे. ते पाहता आपसूकच पूर्वीची दिवाळी कशी असेल, याबद्दल कुतूहल जागृत झाले. योगायोगाने त्याचवेळेस ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी शंभर वर्षांपूर्वीच्या दिवाळीचे वर्णन असलेली कविता दिली आहे. 

दिवाळीमध्ये जशी आजची अमावस्येची रात्र आपण लाखो-कोटी दिवे लावून उजळून टाकण्याचा प्रयत्न करतो, तसेच मनातील निराशेचा अंधार आनंदाचे, आशेचे दीप लावून दूर करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करीत असतो. हा प्रयत्न, निराशा दूर करून मनात आनंद निर्माण करण्याची ही प्रवृत्ती, आपल्याला मराठी साहित्यातूनही प्रतिबिंबित झालेली दिसते.

१८९८ च्या 'मनोरंजन' मासिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात दत्तात्रय कोंडो घाटे म्हणजेच कवी दत्त यांची 'दिवाळी' नावाची एक कविता प्रसिद्ध झाली होती. त्यात दत्त कवी म्हणतात,

पौरजनही निजगृहा रंगवीती, द्वारकेशी सुमहार घालिताती,
नवी वस्त्रे भूषणे लेवुनी ही, घरे सजली जणु पुरुष भव्य देही।

पौरजन म्हणजे शहरातले नागरिक, ते आपापली घरे दिवाळीच्या निमित्ताने रंगवतात, दारावर तोरणे लावतात आणि ती घरे इतकी सुंदर दिसतात, की नवी वस्त्रे घालून कोणी रुबाबदार पुरुषच त्या ठिकाणी उभा आहे, असे वाटते. पुरुष म्हणजे देहपुरामधील ईश, हे घराकडे बघून वाटते.

कवी दत्ता यांनी शंभर वर्षापूर्वीचे वर्णन करून ठेवले आहे. एक शतकाचा काळ उलटून गेला, तरी दिवाळीचे स्वरूप आणि आपल्या मनातील दिवाळीबद्दल असलेली अपेक्षा यात फारसा फरक पडलेला नाही. फराळाचे पदार्थ बदलले असतील, फटाक्याची प्रकारही खूप बदललेले आढळतील, कपड्यांमध्ये तर बदल झालेच, परंतु दिवाळीचा उत्साह तीळमात्रही कमी झालेला नाही. पूर्वी वर्षातून एकदाच दिवाळीनिमित्त नवीन कपडे घेतले जात असत. तेही कोणते, तर नऊवारी लुगडे, धोतर. त्यांची जागा आता जीन्स, कुर्ते, ट्राउझर्सने घेतली, हाच काय तो बदल. मात्र, दिवाळीचे मूळ स्वरूप अजुनही टिकून आहे. 

सकाळी उठून लवकर स्नान केले जाते. स्नानापूर्वी तेल, सुगंधी उटणे लावले जाते. पती पत्नीला, बहिण भावाला ओवाळते. हे सगळे जुन्या परंपरेला धरून चालते. पूर्वी दिवाळीचा फराळ घरोघरी केला जात असे. आता बाजारातून विकत आणण्याकडे कल दिसून येतो. आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे फराळ करण्याचे, विकत घेण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी शास्त्रापुरता फराळ केला किंवा आणला जातोच.

सर्वधर्मसमभावाच्या दृष्टीने दिवाळी या सणाला सर्वधर्मियांनी मान्यता दिली आहे. अन्य कोणत्याही सणांत जेवढा एकोपा दिसून येत नाही, तेवढा दिवाळीत दिसून येतो. कवी दत्ता कवितेचा शेवट करताना लिहितात, 

जधी जाइल दारिद्रय बांधवाचे, जधी जातिल हे दूत यमाजीचे,
जधी होइल जन्मणू पुण्यशाली, तदा माझी गे समज ती दिवाळी

असा आशावाद कवींच्या कवितेतून दिसून येतो. शंभर वर्षांपूर्वी समस्याप्रधान स्थिती होती, तशीच आजही आहे. समस्येचे रूप बदलले, परंतु प्रश्न तेच आहेत. ते सर्व प्रश्न निकाली निघो आणि सुबत्तेचा, आनंदाचा, हर तऱ्हेच्या सुखाचा वर्षाव सर्वांवर होवो, अशी प्रार्थना करूया.

Web Title: Diwali 2022: A brief vignette of how Diwali was celebrated in yesteryear compared to now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.