Diwali 2022 : दिवाळीत तेलाच्या पणत्या आणि तुपाचे निरांजन लावताना आठवणीने 'ही' काळजी घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 03:08 PM2022-10-15T15:08:41+5:302022-10-15T15:09:35+5:30
Diwali 2022: दिवाळीत आपण असंख्य दिवे लावतो. त्यावेळी घ्यावयाची काळजी कोणती, ते पाहा.
पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे असे नानाविध प्रकार असतात. देव्हारा प्रकाशमान करणे एवढाच त्याचा हेतू असतो. तरीदेखील रोषणाई आकर्षक व्हावी, यासाठी लामणदिवा, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात. इतर दिवे उत्सवाच्या वेळी वापरले जातात, तर रोजच्या पूजेत समई आणि निरांजनाची वर्णी लागते. त्यातही समई तेलाची आणि निरांजन तुपाने लावण्याचा प्रघात आहे. दिवाळीत आपण असंख्य दिवे लावतो. त्यावेळी घ्यावयाची काळजी कोणती, ते पाहा.
समईची वात लांब असते तर निरांजनाची वात बसकी गोलाकार असते. निरांजनात एक वात, तर समईत दोनापेक्षा अधिक वाती लावल्या जातात. हे गुणोत्तर उलट करू नये. देवापुढे लावायच्या दिव्यात तेल किंवा तूप याव्यतिरिक्त अन्य कोणतेही ज्वलनद्रव वापरू नये, असे अग्नीपुराणातील आदिकल्प पुराणात सांगितले आहे. या गोष्टी रोजच्या निरीक्षणातल्या असूनही आपली आई, आजी आपल्याला दिवा लावताना नेहमी हटकते, `एकाच काडीने किंवा तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावू नको.' आपण त्यांचे म्हणणे ऐकतो, पण त्यामागचे शास्त्र समजून घेत नाही. चला जाणून घेऊ, तसे न करण्यामागचे कारण!
माणसांना ओवाळताना तेलाच्या दिव्याने ओवाळले जाते. त्याला आपण औक्षण म्हणतो. पुण्याहवाचन किंवा इतर वेळी औक्षण करताना तेलाचा दिवा वापरतात. पूर्वी पती युद्धावर जाताना त्याची पत्नी तेलाच्या दिव्याने ओवाळत असे. आजही वाढदिवसाच्या दिवशी मुलांना, मोठ्यांना ओवाळताना तेलाचा दिवा वापरला जातो. तुपाच्या दिव्याच्या तुलनेत तेलाचा दिवा बरात वेळ तेवत असतो. दिव्याच्या ज्योतीचा संबंध मनुष्याच्या आत्मज्योतीशी असल्यामुळे औक्षण करणारी व्यक्ती समोरील व्यक्तीच्या दीर्घायुष्याचे शुभचिंतन करत असते. बहीण भावाला ओवळताना, बायको नवऱ्याला ओवाळताना, आई मुलांना ओवाळताना हाच विचार मनात तेवत असतो. म्हणून औक्षणाच्या वेळेस तेलाचा दिवा वापरला जातो.
देवाला ओवाळताना, त्याची आरती करताना तुपाचा दिवा लावला जातो. देवकार्यात समस्त पवित्र गोष्टींचा वापर केला जातो. तूप हे पवित्र मानले जाते. तुप हे समृद्धीचे प्रतीक आहे. तुपाच्या निरांजनाने देवाला ओवाळून त्याबदल्यात आपले आयुष्य त्याच्या आशीर्वादाने उजळू देत अशी प्रार्थना केली जाते.
आता प्रश्न येतो, तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा का लावू नये याचा, तर उत्तर हे आहे, की हे दोन्ही घटक भिन्न आहेत. एक खनिज तर दुसरा प्राणिज. त्या दोघांचे एकत्रीकरण होऊ नये, हा त्यामागील हेतू असतो. म्हणून अनेक ठिकाणी दोन्ही प्रकारचे दिवे एकत्र लावणे टाळतात. जर दोन्ही प्रकारचे दिवे एकाच वेळेस लावले, तरी हरकत नाही, फक्त ते वेगवेगळ्या काडीने लावले पाहिजेत, ही बाब लक्षात ठेवावी.
चला तर, दिवाळीची तयारी पूर्णत्वाला नेऊया आणि शास्त्राचे पालन करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया.