Diwali 2022: देवीदेवतांचे फाटलेले फोटो, भग्न मूर्ती, जुन्या पोथ्या यांचे रविवारी पुणे-मुंबई येथे होणार संकलन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 12:57 PM2022-10-15T12:57:16+5:302022-10-15T12:57:36+5:30

Diwali 2022: घराची आवराआवर करताना पुजेशी संबंधित जुन्या वस्तू नदीत, झाडापाशी, कचऱ्यात टाकून न देता त्यावर यथायोग्य संस्कार व्हावेत म्हणून तुम्हीही पुढाकार घ्या!

Diwali 2022: Torn photos of deities, broken idols, old devotional books to be collected in Pune-Mumbai on Sunday! | Diwali 2022: देवीदेवतांचे फाटलेले फोटो, भग्न मूर्ती, जुन्या पोथ्या यांचे रविवारी पुणे-मुंबई येथे होणार संकलन!

Diwali 2022: देवीदेवतांचे फाटलेले फोटो, भग्न मूर्ती, जुन्या पोथ्या यांचे रविवारी पुणे-मुंबई येथे होणार संकलन!

googlenewsNext

दिवाळी तोंडावर आल्यामुळे घराघरातून जुन्या वस्तू, अडगळीचे सामान यांची विल्हेवाट करण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न असेल. मात्र प्रश्न जेव्हा देवीदेवतांचे जुने फोटो, भग्न मूर्ती, फाटलेल्या तसबिरी यांचा येतो, तेव्हा त्या कुठे टाकाव्यात हा प्रश्न निर्माण होतो. मग नदीकाठावर, समुद्रात, तळ्यात, झाडाच्या पायथ्याशी किंवा अडगळीच्या रस्त्यावर ते टाकले जातात. त्यांची दुर्दशा होऊ नये म्हणून नाशिकच्या संपुर्णम सेवाभावी संस्थेतर्फे रविवारी अर्थात १६ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे परिसरातून या वस्तूंचे संकलन केले जाणार आहे. त्यासंदर्भात तपशीलवार माहिती लेखात जोडलेल्या फोटोंमधून मिळू शकेल. 

२०१९ मध्ये ऍडव्होकेट तृप्ती गायकवाड यांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला. पुरात वाहून आलेल्या मूर्ती, तसबिरी यांचे एकत्रीकरण करून त्याची उत्तरपूजा करून, त्यांचे रीतसर विघटन केले. आपल्या देवीदेवतांना योग्य पद्धतीने निरोप देता यावा म्हणून त्यांनी या सेवाभावी संस्थेची सुरुवात केली. देशभरातून १०० स्वयंसेवक त्यांच्या कार्याशी जोडले गेले आहेत व आजवर जवळपास ५० टन हुन अधिक मूर्ती, फोटोचे रीतसर विघटन झाले आहे. 

या कार्यात पुण्याच्या नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने १६ ऑक्टोबर रोजी सहकार सदन येथे भारती निवास सोसायटीचा हॉलमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दोन सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. पहिला उपक्रम संपुर्णम या संस्थेच्या सहकार्याने पार पडणार असून त्यात जीर्ण पोथ्या, तसबिरी या गोष्टी स्वीकारल्या जातील. या कार्यासाठी ऐच्छिक देणगीचा स्वीकार केला जाईल. तर त्याचवेळेस दुसऱ्या मोहिमेअंतर्गत जुने पण सुस्थितीतले कपडे, बूट,चपला, खेळणी, पुस्तके, प्लॅस्टिक, दुचाकी, तीनचाकी सायकली अशा वस्तू ज्यांच्या वापरामुळे अन्य कोणाची दिवाळी आनंदात जाऊ शकेल, अशा गोष्टींचेही संकलन केले जाणार आहे. संपर्क : ९६८९९३१६५६

या उपक्रमाशी तुम्हालाही जोडले जाण्याची इच्छा असेल तर संपुर्णम_२०१९ हे इन्स्टाग्राम पेज तसेच 'संपुर्णम सेवा फाउंडेशन नाशिक' हे फेसबुक पेज तुम्ही फॉलो करू शकता. वरील वस्तूंचे विघटनच नाही तर त्यांचा पुर्नवापर करण्याचा प्रकल्पही जोमात सुरू आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. नदी नाल्यात, अडगळीत देवतांना निरोप देण्यापेक्षा या सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलून आपल्यालाही पर्यावरणाला आणि धर्मकार्याला हातभार लावता येईल. 

Web Title: Diwali 2022: Torn photos of deities, broken idols, old devotional books to be collected in Pune-Mumbai on Sunday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.