Diwali 2022: रावणाचा वध करून श्रीराम परतले, तेव्हा अयोध्यावासियांनी कशी साजरी केली असेल दिवाळी? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 10:20 AM2022-10-25T10:20:58+5:302022-10-25T10:21:25+5:30
Diwali 2022: अश्विन अमावस्येची रात्र लक्ष लक्ष दीपांनी उजळली गेली आणि अयोध्येत दिवाळी साजरी झाली, त्याचं काव्यमय यथार्थ वर्णन वाचा!
>> सौ.शैलजा शेवडे
श्रीराम अयोध्येत परत आले...केवढी आनंददायी घटना अयोध्यावासियांसाठी...! केवळ नुसत्या कल्पनेनेही आनंदाचे रोमांच उठतात अंगावर..! आपला परमप्रिय राम , पराक्रमी राम, आनंदघन राम, कनवाळू राम मर्यादापुरुषोत्तम राम परत आला..लंकेवर विजय मिळवून,रावणाचा वध करून..अत्यंत आनंदाची गोष्ट...! अश्विन महिन्यातल्या अमावास्येला दीपोत्सवच झाला..दिवाळी साजरी झाली....
लक्ष दीप उजळले, नगरी तेजोमय झाली,
जयजयकारे श्रीरामाच्या, स्वागता सज्ज झाली,
विजयपताका रांगोळ्यांनी, घरे सारी नटली,
प्रभू आले, प्रभू आले, अयोध्या हर्षेभरीत झाली |
गंधित वारे वाहू लागले, फळाफुलांनी, वृक्ष लगडले,
मंगलमय तो घोष आणखी, वेदातले ते मंत्रही घुमले,
सात्विक भावे शरयुही मग निर्मल जणू झाली,
प्रभू आले,प्रभू आले, अयोध्या हर्षभरित झाली |
चौदा वर्षे वनवास संपला, दशाननाचा वधही झाला,
आता करील राम राज्य, जनता आनंदली,
उत्स्फुर्तपणे शोभायात्री, सामील सारी झाली,
प्रभू आले,प्रभू आले, अयोध्या हर्षभरित झाली |
राम रथावर,आरूढ असती, भरताच्या तो.लगाम.हाती,
शुभ्र राजछत्र शत्रुघ्न धरी, लक्ष्मण बिभीषण चव-या ढाळती,
देवीदेवता,रामाचे गुणगान गाऊ लागली,
प्रभू आले,प्रभू आले, अयोध्या हर्षभरित झाली |
रघुनाथ असती,पूर्णचंद्र , जनसागरास आली भरती,
उचंबळोनी,परमानंदे, रामासमीप येती,लाटांसम भासती,
श्रीरामाच्या जयघोषाने, अवनी दुमदुमली,
प्रभू आले,प्रभू आले, अयोध्या हर्षभरित झाली |