Diwali 2023: दिवाळीची आवराआवर सुरू केली असेल तर त्याबरोबरच मनाचा पसाराही आवरून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:54 AM2023-10-30T11:54:43+5:302023-10-30T11:55:20+5:30
Diwali 2023: स्वच्छतेचे महत्त्व आपण जाणतो, पण ती केवळ बाहेर असून उपयोग नाही, आपली आंतरिक स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची!
आपल्या रोजच्या वस्तू आपण नीटनेटक्या ठेवतो. त्यांची देखभाल करतो, आवराआवर करतो, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मन, ते आवरायला नको का? ते कसे आवरायचे, सांगत आहेत, साधू गौर गोपाल दास.
आपण रोज जेवतो. कोणी दोनदा, कोणी तीनदा, तर कोणी दिवसभर. परंतु, खाल्लेल्या अन्नाचा निचरा झाला नाही, तर काय होईल? मृत्यू.
आपण रोज पाणी पितो. कोणी एक लीटर, कोणी दोन लीटर, कोणी त्याहून जास्त. परंतु, प्यायलेले पाणी शरीरातून बाहेर पडले नाही, तर काय होईल? मृत्यू.
आपण दर क्षणाला श्वास घेतो. किती वेळा घेतो, याची मोजदादही ठेवत नाही. योगाभ्यासात श्वास घेण्याचे विशिष्ट तंत्र शिकवले जाते. मात्र, घेतलेला श्वास सोडलाच नाही, तर काय होईल? मृत्यू.
त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट घेऊन झाल्यावर ती सोडूनही देता आली पाहिजे. साचून राहिलेल्या गोष्टी खराब होतात. त्यांचा क्षय होतो. त्या निकामी होतात. शेवटी नाशवंत होतात.
या भौतिक उदाहरणातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आपण अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतो. परंतु, त्या गोष्टींचा वेळेत निचरा झाला नाही, तर काय होईल? मृत्यू...तोही मनाचा. मनात कितीतरी गोष्टी अकारण साठवलेल्या असतात. मनात असंख्य विषयांची दाटी होते. अस्वस्थता निर्माण होते. मन सतत द्विधा मनस्थितीत अडकून राहते. या सगळ्या गोष्टी तुमच्याही बाबतीत घडत असतील, तर वेळीच मनाचा कप्पा आवरायला घ्या.
आपण वरचेवर घरात आवराआवर करत असतो. उपयोगी गोष्टी ठेवून देतो. कमी महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि निरुपयोगी वस्तू फेकून देतो. फेकायचा वस्तू, ठेवलेल्या वस्तूच्या दशांश असतात. मात्र, काही काळाने कमी महत्त्वाच्या वस्तूदेखील अडगळीत जाऊन त्याचे रुपांतर निरुपयोगी वस्तूंमध्ये होते आणि नव्या वस्तूंसाठी जागा मोकळी होते.
त्याचपद्धतीने आपल्याला रोजच्या रोज मनाचा कप्पा आवारायचा आहे. चांगल्या आठवणी, चांगले लोक, चांगले संवाद, चांगले क्षण मनात साठवायचे. अडगळीच्या गोष्टी काढून टाकायच्या आणि कमी महत्त्वाच्या गोष्टी तपासून घेत हळू हळू कमी करायच्या. हे एकाएक जमणार नाही, परंतु सरावाने निश्चित जमेल.
मनाचा कोपरा आवरण्यासाठी तीन उपाय :
१. वाईट विचार जाळून टाका : विचार जाळायचे कसे, हा प्रश्न पडला असेल, तर एक प्रयोग करा. तुमच्या मनातले वाईटात वाईट विचार, भीती, द्वेष, मत्सर, राग एका कागदावर लिहून काढा. नीट वाचा. आणखी काही मुद्दे राहिले असतील, तर नोंद करा आणि सगळे काही लिहून झाल्यावर तो कागद शब्दश: जाळून टाका. असे केल्याने खरोखरच विचार जळतात का? नाही. मात्र, विचार काढून टाकण्याच्या प्रयत्नांना सुरुवात नक्कीच होते. या कृतीतून कोणालाही त्रास होणार नाही. उलट, झालाच तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून हा उपाय नक्कीच करून बघा.
२. मन मोकळे करा : अनेकांना प्रश्न पडतो, माझे दु:खं, माझ्या चिंता, माझे प्रश्न कोणाला सांगू? माझा कोणावरही विश्वास नाही. मात्र, मनातही साठवून ठेवता येत नाही. कोणालातरी सांगायचे, ही उर्मी स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी नि:संशयपणे तुमचे प्रश्न, काळजी, समस्या निसर्गाला सांगा. घरातल्या रोपट्यांशी, पाना-फुलाशी बोला, बागेतल्या झाडाकडे बघून त्याच्याशी संवाद साधा. अशा कृतीने लोक तुम्हाला वेड्यात काढतील, याची भीती बाळगू नका. तुम्हाला होणारा त्रास दूर करायला त्यांच्यापैकी कोणीही येणार नाही. परंतु, कोणीतरी मूकपणे आपले म्हणणे ऐकून घेतले, हा आनंद मनाला समाधान आणि शांतता देईल.
३. आध्यात्मिक शक्ती वाढवा : तुमच्या वाट्याला सुख आलेले असो, नाहीतर दु:खं, ते शाश्वत नाही. प्रत्येकाची वेळ बदलत असते. वेळेनुसार परिस्थिती बदलत असते. सुखात आनंद आणि संकटात दु:खं पेलण्याची मनाची क्षमता वाढावी, म्हणून सुरुवातीपासून मनाला ध्यानधारणेची, प्राणायामाची, योगसाधनेची सवय लावून घ्या. नाम:स्मरणातूनही आत्मिक आनंद प्राप्त होईल.
लक्षात ठेवा. पाण्याचा पेला किती भरलेला आणि किती रिकामा आहे, यापलीकडे तो पेला तुम्ही किती काळ पकडून ठेवता, यावर तुम्हाला होणारा त्रास अवलंबून आहे. मनाचेही तसेच आहे. कोणतीही गोष्ट मनात दीर्घकाळ ठेवू नका. ते निर्मळ राहू द्या.