Diwali 2023: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराची करूया शब्दसफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 10:33 AM2023-11-11T10:33:57+5:302023-11-11T10:34:27+5:30

Diwali 2023: भारतातील पुरातन मंदिरं हा अभ्यासाचा विषय आहे; त्याबद्दल जेवढे जाणून घ्यावे तेवढे त्याचे सौंदर्य अधिक उलगडत जाते. 

Diwali 2023: On the occasion of Lakshmi Puja let's take a word trip to Nagpur's 18th century Rukhmini Temple! | Diwali 2023: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराची करूया शब्दसफर!

Diwali 2023: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराची करूया शब्दसफर!

>>सर्वेश फडणवीस 

नागपूर शहराचा इतिहास, श्रीमंत राजे भोसले राजवंश व गोंड राजवंश यांच्या भोवतीचा आहे. या उभय राजवंशांनी नागपूरचे वैभव उभे केले होते. त्यातही विशेषतः द्वितीय रघुजी भोसले महाराजांच्या कारकीर्दीत नागपूरचा दर्जा सुशोभित अशा दिल्ली शहरासारखा होता. त्यावेळी बाग-बगीचे, पेठा, राजवाडे, मंदिर, मठ, स्थापत्य, स्मारक, स्तंभ यांच्या उभारणीची त्यांनी झपाट्याने सुरुवात केली होती. त्यातील त्यांनी बांधलेली मंदिरे आजही या सगळ्या वैभवाची साक्ष देत उभे आहे. 

खरंतर श्रीमंत भोसले यांचे मंदिरस्थापत्य हा एक स्वतंत्र विषय आहे. पण त्यालाही मर्यादा आहे. नागपूर शहरातील भोसल्यांनी बांधलेल्या या मंदिरात भोंडा महादेव, पार्डीचे श्रीकृष्ण मंदिर, सोनेगावचे मधुसूदन मंदिर, सक्करदऱ्याचे श्रीलक्ष्मीनारायण मंदिर, महालातील असंख्य मंदिरे यांचा समावेश होतो. या सर्व मंदिराच्या स्थापत्याचा मुकुटमणी ठरावे असे महालातील श्रीरुक्मिणी मंदिर आहे. हे मंदिर अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. गांधी गेट ते बॅ. अभ्यंकर पुतळ्याच्या मधोमध ही स्थापत्यकृती आहे, प्रवेशद्वार कमानी असून त्याकाळी बाजूच्या ओट्यावर द्वारपाल असत. त्यात हे मंदिरे आपल्या पूर्ण वैभवाने ऊन,वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आजही दिमाखात उभी आहेत. 

नागपूरमधील हे मंदिर म्हणजे स्थापत्यकृती, शिल्पप्रतिमा व सुशोभन यांचा परमोच्च बिंदू आहे. श्रीमंत राजे भोसल्यांनी साधारणपणे काही वर्षांपूर्वी ओरिसा, छत्तीसगड, बिहार व बंगाल जिंकला. साहजिकच तेथील कारागीर, शिल्पकार, मूर्ती कोरणारे स्थापती, तंत्रज्ञ, देवळे बांधणारे त्यावेळी नागपूरला आले आणि  स्वाभाविकच नागपूरच्या अनेक मंदिर स्थापत्यावर ओरिसा छत्तीसगड स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. श्रीरुक्मिणी मंदिर असेच आहे. श्रीमंत राजे भोसले यांच्या राजवाड्यास अगदी लागून असलेले हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या शिल्प परंपरेपेक्षा वेगळे स्थान असलेल्या श्रीरुक्मिणी मंदिरात संगमरवराचा गरुड मंडप असून त्यावर राजस्थानच्या कारागिरांचा प्रभाव जाणवतो. किंबहुना सर्व भारतात ही भोसले शैली म्हणून सर्वत्र ओळखली जाते. इ. स.१७८० ते १८०२ साली ही मंदिरे उभारलेली आहेत. श्रीमंत भोसलेंच्या काळात, चित्ताकर्षकता, विलोभनीयता आणि नेत्रदीपकता हे खास यांचे वैशिष्ट्य होते. सकाळी हे अनुभवताना मनात वेगळीच भावना होती. 

नागपूरातील वास्तुकलेचे वेगळेपण म्हणजे दगडी बांधणी असलेली ही मंदिरे अनेक प्रकारच्या जाळीदार नक्षीने सुशोभित अशी आहेत. या मंदिरात काष्ठांचे काम पण भरपूर आहे, दोन्ही मंदिरांना भव्य प्रशस्त असा लाकडी सभामंडप असून गाभारा हे मुख्य मंदिराचे भाग ठरतात. नागपूरची मंदिरे सपाट छताची असून वर त्यांना गच्ची असते. गच्चीच्या सभोवताल सुरेख आणि मजबूत कठडा असतो. येथील सज्जा तर असा झोकदार आहे की पावसाचे पाणी क्षणभरही साचून रहात नाही. पानपट्टी नक्षीदार असून लाकडी पट्ट्यांचे तोरण म्हणजे एक नजाकत आहे व ती २००-२५० वर्षांपासून टिकून आहे. कठड्याखाली खास मराठी शैलीचे उमललेल्या कमळ कळ्या आणि केळी खांबाची नक्षी आढळते. सभामंडपाचा दगडी तळ गुळगुळीत आहे. नक्षीदार कमानींनी सभामंडपास नजाकत आणलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचा आकार चौकोनी, शिखरांची रचना वर निमुळती होत जाते. मंडोवरावर ओरिसाप्रमाणे मंदीर शिखरांच्या प्रतिकृती असून रचना भूमीज किंवा नागर वास्तुशिल्पकला परंपरेप्रमाणे आहे.

शिखरांच्या चारही कोनांवर रथ किंवा कलशापर्यंत उभे जाणारे पट्टे आहेत आणि त्यामुळे अक्षरशः प्रस्तरशिल्पांची अप्रतिम अशी रचना येथे बघायला मिळते. शिखरांच्या छोट्या प्रतिकृती त्यावर चिन्हांकित आहेत. सिंह, व्याघ्र वर्गातील प्राणी यावर हुबेहूब कोरलेले दिसतात. या पट्ट्यावर उपशिखरांची योजना आहे. त्यावर उंच टोकदार खास नागपूरी शिखर आणि त्यावर राजाने मढविलेले धातूचे तबक व त्याची धातुशिल्पे, बस्स पाहतच राहावे असे आहे. 

मंदिरासमोर दगडी जाळीच्या संगमरवरी खिडक्या, उलट्या कमलपुष्पासारखे शिखर असलेला सुरेख व टुमदार राजस्थानी थाटाचा गरुड मंडप पाहातच राहावा असा आहे. त्यात श्री नासिकाग्र मुद्रेचा टोकदार गरुड म्हणजे एक दिव्य अनुभवच आहे. मंडपात वर चढण्यास पायऱ्या असून चारीही बाजूस कठडे आहेत. मंडपाचा आकार चौकानी असून सभोवताल सज्जा आहे. त्यावर कमळ कलिकांची खास मराठा शैलीतील महिरप असून ती देखील सुशोभित आहे. उंच उंच होत जाणारी ही मंदिर मालिका म्हणजे श्रीमंत भोसल्यांनी भारतीय शिल्प परंपरेवर केलेले खूप मोठे स्थापत्य उपकारच ठरतात.

मंदिराच्या बाहेरील बाजूस भारतीय शिल्पविषयानुरुप रामायण, महाभारत, श्रीकृष्णलीला, भागवत, अप्सरा, यक्ष, गंधर्व, किन्नर, देवी-देवता, व्याल,पुराणकथा, पौराणिक मिथक, राम-रावण युद्ध, शिवतांडव, प्रत्यक्ष मानवाकृती,त्यांच्या केशभूषा, वेशभूषा, पोषाख, अलंकार, दागिने, वस्त्रप्रावरणे, फेटे, पगड्या, अंगरखे, या सर्व शिल्पांवरून श्रीमंत भोसले काळातील नागपूर ची संपूर्ण साक्ष पटते. हळूहळू एकेक शिल्प पाहात त्याचा सौंदर्यशास्त्रदृष्ट्या अभ्यास करत मन तृप्त होईपर्यंत हे वैभव लुटतच राहावे, असेच आहे. महाल भागातील असलेले हे श्रीरुक्मिणी मंदीर म्हणजे पूर्ण शिल्प विकसित प्रस्तर काव्य आहे, असेच म्हणावेसे वाटते. खऱ्या अर्थाने या अनोख्या पद्धतीची दिवाळी पहाट एकदा तरी अनुभवायला हवीच. 

 

Web Title: Diwali 2023: On the occasion of Lakshmi Puja let's take a word trip to Nagpur's 18th century Rukhmini Temple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.