Diwali 2023: यंदा दिवाळी सात दिवस, दोन भाकड दिवसांचाही समावेश; कसा तो पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 11:46 AM2023-11-03T11:46:40+5:302023-11-03T11:47:10+5:30

Diwali 2023: दिवाळीच्या मधले दिवस जेव्हा काही सण नसतात त्याला आपण भाकड दिवस म्हणतो, ११ आणि १३ नोव्हेंबरमुळे दिवाळी मोठी झाली आहे; सविस्तर वाचा!

Diwali 2023: This year Diwali is seven days, including two extra days; See how it is! | Diwali 2023: यंदा दिवाळी सात दिवस, दोन भाकड दिवसांचाही समावेश; कसा तो पहा!

Diwali 2023: यंदा दिवाळी सात दिवस, दोन भाकड दिवसांचाही समावेश; कसा तो पहा!

यंदा वसुबारस ते भाऊबीज असा मूळ पाच दिवसांचा दीपोत्सव सात दिवसांचा झाला आहे. कारण ११ आणि १३ नोव्हेंबर रोजी सण नाहीत. त्यामुळे ते दिवस भाकड दिवस म्हटले जातील. अर्थात त्यांच्या येण्याने अडचण काहीच नाही, उलट दिवाळीचा सप्ताहच पूर्ण झाला आहे. म्हणून यंदा ९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर आपण दिवाळी साजरी करणार आहोत. दिवाळी वर्षभरातला हा सर्वात मोठा सण म्हटला जातो, मात्र या सगळ्या सणांचे एकामागोमाग एक येणे कशाचे सूचक आहे? चला जाणून घेऊ. 

'दिवाळी म्हणजे दीपोत्सव. बाहेर तर दिवे पेटवायचे, पण खरा दिवा हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल, तर बाहेर पेटवलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेन दिवाळीचा सण साजरा करणे', असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर लिहितात - 

धनत्रयोदशीच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नरकासुरांना मारायचा. दिवाळीच्या दिवशी 'तमसो मा ज्योतिर्गमय' मंत्राची साधना करता करता जीवनपथ प्रकाशित करायचा. जीवनाच्या वहीचा आढावा घेत, जमेच्या बाजूला ईशकृपा राहावी ह्यासाठी प्रभुकार्याच्या प्रकाशाने जीवन भरून टाकायचे.  नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे. नवे वर्ष म्हणजे शुभसंकल्पांचा दिवस. 

नरकचतुर्दशीला कालीचतुर्दशी देखील म्हणतात. नरकचतुर्दशीची कथा अशी आहे.

प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर शक्तीमुळे सैतान बनला होता. स्वत:च्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता. एवढेच नाही, तर सौंदार्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही सतावित होता. त्याने स्वत:च्या जनानखान्यात सोळा हजार कन्यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला. स्त्री-उद्धाराचे हे काम असल्यामुळे सत्यभामेने नरकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला. भगवान श्रीकृष्ण मदतीला राहिले. चतुर्दशी दिवशी नरकासुराचा नाश झाला. त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून तिला त्यांनी प्रकाशित करून टाकले. असुरांच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्रे नेसून फिरायला निघाले.

 दिवाळी म्हणजे व्यापाऱ्यांचा वह्या पूजनाचा दिवस. संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा दिवस. या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे. राग, द्वेष, वैर, ईर्ष्या , मत्सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी जुने प्रेम, श्रद्धा व उत्साह वाढावा याकडे लक्ष दिले पाहिजे. 

नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात. तेजस्वी वैदिक विचारांची अपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्था उध्वस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला. त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतीपदेचा उत्सव साजरा केला जातो. बलि दानशूर होता. त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते. कनक व कांता यांच्या मोहात अंध बनलेला माणूस असुर बनतो. म्हणून बलीचा पराभव करणाऱ्या विष्णुने कनक व कांता यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आसपास जोडून तीन दिवसांचा उत्सव करण्याचा आदेश दिला. 

दिवाळीच्या दिवशी कनक महणजे लक्ष्मीकडे पाहण्याची पूज्य दृष्टी जोपासण्याचे शिक्षण व भाऊ बीजेच्या दिवशी समस्त स्त्रीजातीकडे आई किंवा बहीण ह्या दृष्टीने पाहण्याचे शिक्षण दिले आहे. स्त्री ही भोग्य नाही, तशी त्याज्यदेखील नाही. ती पूज्य आहे. ही मातृदृष्टी देणारी संस्कृतीच मानवाला विकारांसमोर स्थिर राहण्याची शक्ती देऊ शकते. भाऊबीजेच्या दिवशी स्त्रीकडे बंधूच्या निर्व्याज प्रेमाने तिचा बहिण म्हणून स्वीकार करायचा. 
 
मोह म्हणजे अंधकार. दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्या गाढ अंधकारातून ज्ञान व प्रकाशाकडे प्रयाण! सुंदर ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला, तर आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सव बनेल.

Web Title: Diwali 2023: This year Diwali is seven days, including two extra days; See how it is!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.