Diwali 2023: कालौघात दिवाळीचे रुपडे पालटले असले, तरी शाश्वत आनंद तोच आहे; 'या' कवितेसारखा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:23 PM2023-10-31T12:23:48+5:302023-10-31T12:24:00+5:30
Diwali 2023: दिवाळीचा खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टीत दडला आहे, त्याचीच उजळणी करून देणारी सुंदर कविता नक्की वाचा.
आजची दिवाळी आणि पूर्वीची दिवाळी ही तुलना दरवर्षी रंगते. काळ बदललेला असला तरी दिवाळीचा आनंद तसूभरही कमी झालेला नाही. हा सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येकाची निराळी असली, तरी त्यात दडलेला आनंद कमी जास्त प्रमाणात सारखाच आहे. योगायोगाने त्याचवेळेस ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी शंभर वर्षांपूर्वीच्या दिवाळीचे वर्णन असलेली कविता दिली आहे.
दिवाळीमध्ये जशी आजची अमावस्येची रात्र आपण लाखो-कोटी दिवे लावून उजळून टाकण्याचा प्रयत्न करतो, तसेच मनातील निराशेचा अंधार आनंदाचे, आशेचे दीप लावून दूर करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करीत असतो. हा प्रयत्न, निराशा दूर करून मनात आनंद निर्माण करण्याची ही प्रवृत्ती, आपल्याला मराठी साहित्यातूनही प्रतिबिंबित झालेली दिसते.
१८९८ च्या 'मनोरंजन' मासिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात दत्तात्रय कोंडो घाटे म्हणजेच कवी दत्त यांची 'दिवाळी' नावाची एक कविता प्रसिद्ध झाली होती. त्यात दत्त कवी म्हणतात,
पौरजनही निजगृहा रंगवीती, द्वारकेशी सुमहार घालिताती,
नवी वस्त्रे भूषणे लेवुनी ही, घरे सजली जणु पुरुष भव्य देही।
१८९८ च्या 'मनोरंजन' मासिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात दत्तात्रय कोंडो घाटे म्हणजेच कवी दत्त यांची 'दिवाळी' नावाची एक कविता प्रसिद्ध झाली होती. त्यात दत्त कवी म्हणतात,
पौरजनही निजगृहा रंगवीती, द्वारकेशी सुमहार घालिताती,
नवी वस्त्रे भूषणे लेवुनी ही, घरे सजली जणु पुरुष भव्य देही।
सर्वधर्मसमभावाच्या दृष्टीने दिवाळी या सणाला सर्वधर्मियांनी मान्यता दिली आहे. अन्य कोणत्याही सणांत जेवढा एकोपा दिसून येत नाही, तेवढा दिवाळीत दिसून येतो. कवी दत्ता कवितेचा शेवट करताना लिहितात,
जधी जाइल दारिद्रय बांधवाचे, जधी जातिल हे दूत यमाजीचे,
जधी होइल जन्मणू पुण्यशाली, तदा माझी गे समज ती दिवाळी
असा आशावाद कवींच्या कवितेतून दिसून येतो. शंभर वर्षांपूर्वी समस्याप्रधान स्थिती होती, तशीच आजही आहे. समस्येचे रूप बदलले, परंतु प्रश्न तेच आहेत. ते सर्व प्रश्न निकाली निघो आणि सुबत्तेचा, आनंदाचा, हर तऱ्हेच्या सुखाचा वर्षाव सर्वांवर होवो, अशी प्रार्थना करूया.