Diwali 2024: रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी या एकत्र मुहूर्तावर वसुबारस साजरी कशी करावी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:00 AM2024-10-28T07:00:00+5:302024-10-28T07:00:02+5:30

Diwali 2024: २८ ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होत आहे, त्यात वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस, त्याचे महत्त्व जाणून घ्या!

Diwali 2024: How to celebrate Vasubaras on Rama Ekadashi and Govats Dwadashi together? Read on! | Diwali 2024: रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी या एकत्र मुहूर्तावर वसुबारस साजरी कशी करावी? वाचा!

Diwali 2024: रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी या एकत्र मुहूर्तावर वसुबारस साजरी कशी करावी? वाचा!

दिवाळी (Diwali 2024) आली म्हणता म्हणता, २८ ऑक्टोबर रोजी ती सुरूही होतेय. दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारसेचा म्हणजेच गोवत्स द्वादशीचा! यंदा रमा एकादशी (Rama Ekadashi 2024)आणि गोवत्स द्वादशी हे दोन्ही मुहूर्त एका दिवशी आले आहेत.  रमा एकादशी सकाळी तर वसुबारस (Vasubaras 2024) दुपारी साजरी केली जाईल व दुसऱ्या दिवशी अर्थात २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी (Dhan Teras 2024) साजरी केली जाईल. या सणाचे महत्त्व जाणून घेऊया. 

वसुबारस व्रत : आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्‍त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स म्हणजेच वासरासहित असलेल्या गायीची पूजा करतात.

गोवत्स द्वादशीचे महत्त्व :-

१. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावयाचा आहे.

२. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे, अशी योग्यता असलेल्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय रहात नाही. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.

‘वसुबारस’च्या निमित्ताने, गोपालनाचे महत्त्व !

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टीची निर्मिती झाली आणि तिचे चलनवलनही चालू आहे. या पंचमहाभूतांची गाय ही माता आहे. काळाच्या ओघात तिचीच अवहेलना झाल्याने आज सर्वतर्‍हेचे प्रदूषण गंभीररित्या वाढले आहे. हे वेळीच रोखायचे असेल, तर गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन याला पर्याय नाही. एकप्रकारे गोमाता पंचमहाभूतांच्या कुपोषणाची अधिकारिणी आहे. वसुबारसच्या निमित्ताने येथे गोमातेचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

१. वेदांनी वर्णिलेले गायीचे महत्त्व !
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’प्रमाणे विश्वाच्या ग्रंथालयातील सर्वांत पहिले ग्रंथ वेद आहेत. अशा वेदांनी हिंदूंच्या पाच सांस्कृतिक मानबिंदूत जननी, जन्मभूमी, गंगा आणि गायत्री यांसह ‘गोमाते’ला अनन्यसाधारण स्थान दिले आहे. 

२. गायीमुळे होणारी पंचमहाभूतांची पर्यायाने पर्यावरणाची शुद्धी !
‘त्वंमातासर्वदेवानाम् ।’ अर्थात ‘गाय ही सर्व देवतांची माता आहे’, असे म्हटले जाते. परमपित्याने सृष्टीच्या उत्पत्तीकाळात मनुष्याच्या हितासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्त्वरूपी देवतांची निर्मिती केली. गाय या पंचतत्त्वांची माता आहे; कारण गोमाता भूमी, पाणी आणि वायू यांची पुढीलप्रकारे शुद्धी करते.

गोमय (शेण) आणि गोमूत्र हे भूमातेचे स्वाभाविक अन्न आहे. हे अन्न भूमातेला योग्य प्रमाणात मिळाले, तर भूमीही आरोग्यदायी होऊन पुष्कळ प्रमाणात अन्नाचे उत्पादन करील. आज केवळ रासायनिक निक्षेप (शिल्लक राहिलेले अवशेष) आणि कीटकनाशके यांमुळे अन्न, पाणी अन् वायू यांमध्ये प्रदूषण होत आहे. गोमय आणि गोमूत्र यांमध्ये कीटक प्रतिबंधक गुण असतात; मात्र ते मानव, पशू, पक्षी, कीटक-पतंग आणि पर्यावरण यांसाठी बाधक नाहीत. गोमयाच्या साहाय्याने कोणत्याही प्रकारच्या कचर्‍यापासून ‘कंपोस्ट’ पद्धतीने उत्तम खत बनवले जाऊ शकते.

आप : गोमय आणि गोमूत्र भूमीवरील पाणी अन् पावसाचे पाणी यांची शुद्धी करते. गोमयामुळे जलाशयासारख्या पाण्याच्या मोठ्या स्रोतांचे स्थलांतर रोखले जाऊन त्याची शुद्धी होत असते.

तेज : गायीचे तूप हवनाच्या माध्यमातून अग्नीरूपी देवतेच्या मुखामध्ये प्रवेश करून तेजतत्त्वाची शुद्धी करण्यासह आकाशादी सर्व देवतांची तृप्ती करते.

वायू : दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानाची वृद्धी आणि कार्बनचे उत्सर्जन यांवर नियंत्रण केवळ गोमय अन् त्यापासून निर्माण होणारे इंधन यांचा वापर केल्यानेच होऊ शकेल.

आकाश : आज प्रदूषणामुळे मानवाला रासायनिक पाऊस, अतीवृष्टी आणि अनावृष्टी, यांसारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.

पंचमहाभूतनिर्मित मनुष्याच्या शरीराला होणारे गायीचे लाभ !

गोमूत्र : हे पावित्र्य निर्माण करणारे आहे. गोमूत्र काही रोगांना सरळ नष्ट करते, तर काही रोगांना शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून नष्ट करते.
गायीचे दूध : हे बुद्धीवर्धक, चापल्यवर्धक (स्फूर्तीदायी), रोगप्रतिबंधक आणि शरिराचे पोषण करण्यास संवर्धक आहे.
गायीचे तूप, ताक आणि पंचगव्य : हे सर्व पदार्थ गायीच्या माध्यमातून मानवाला मिळालेला ईश्वरनिर्मित उत्तम आहार आहेत.
गायीचे लाभ ओळखून सर्वांनी तिच्या पालनाची प्रतिज्ञा करणे, ही काळाची आवश्यकता !

Web Title: Diwali 2024: How to celebrate Vasubaras on Rama Ekadashi and Govats Dwadashi together? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.