३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:38 AM2024-10-21T10:38:27+5:302024-10-21T10:39:27+5:30
Diwali 2024: दिवाळीचा सण प्राचीन असला, तरी आधुनिक काळात त्याबाबतचा उत्साह, आनंद तसुभरही कमी झालेला पाहायला मिळत नाही. दीपोत्सवाची काही वैशिष्ट्ये जाणून घ्या...
Diwali 2024: दीपमाला उजळवून, दिव्यांची आरास करून, अंधार दूर सारण्याचा सामूहिक प्रयत्न म्हणजे दिवाळी. चिंता-विवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण म्हणजे दिवाळी. प्रत्येक दिवशी आरोग्य, पराक्रम, धनसंपदेची उपासना, व्यापार, उद्योग आणि भाऊ-बहिणीच्या गोड पारिवारिक नात्याचा मधुर संगम म्हणजे दिवाळी. दिवाळी सण आणि दीपोत्सवाला भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये विलक्षण अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवाळी ही देशभरात साजरी केली जाते. दिवाळीशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत. सन २०२४ मध्ये २८ ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशी ते ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी यम द्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दिवाळी आहे.
दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, अशी ख्याती या दीपोत्सवाची आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास स्थलकालानुसार सण साजरे करण्यात वैविध्य दिसून येते. मुख्य सण हे साधारणपणे एकाच पद्धतीने साजरे केले जातात. परंतु, त्या त्या ठिकाणानुसार, तेथील परंपरेनुसार दिवाळीच्या सणांना एक वेगळाच साज चढलेला दिसतो. मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेक दीप उजळी॥ ते योगिया पाहे दिवाळी॥ निरंतर॥, असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. तर, साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥ दसरा-दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥ तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण॥, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. आनंदाची दिवाळी। घरी बोलवा वनमाळी॥ घालीते मी रांगोळी। गोविंद गोविंद॥, असे संत जनाबाई म्हणतात. आधुनिक काळात कवी, गीतकार यांनी दिवाळी आणि दीपोत्सव यांवर असंख्य काव्य केलेली दिसतात. त्यांच्या काव्य प्रतिभेने शब्दातून दिवाळी साजरी होताना दिसते.
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव अन् तेजाची उपासना
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. तसेच ही एक तेजाची उपासना असल्याचे म्हटले जाते. दिवाळीच्या पाच दिवसांतील पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे दिवा लावून आणि आरोग्याकरिता धन्वंतरीची जयंती साजरी करून आपण या सणाचा शुभारंभ करतो. आयुष्याचा उपभोग व्यवस्थित घ्यायचा असेल, दारिद्र्य, चिंता, अस्वस्थता अशा गोष्टींचा काळोख दूर करावयाचा असेल, तर आधी प्रकृती चांगली असली पाहिजे, पुरेसे आयुष्य लाभले पाहिजे. दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशीच्या प्रभाती भगवान श्रीकृष्णाचा एक महान पराक्रम आपण आठवतो, नरकासुराचा वध करून! अमंगल, अशुचि प्रवृत्तीच्या दुष्टदुर्जनांचे निर्दालन करण्याचा संकल्पच आपण एक प्रकारे मनोमन सोडतो. चिरकाल अर्थसंपन्नता लाभावी, लक्ष्मीची कृपा आपल्यावर निरंतर राहावी म्हणून आपण लक्ष्मीचे पूजन करतो, प्रार्थना करतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी नव्या वर्षाचा शुभारंभ करीत असताना ज्याला शेतकऱ्याचा राजा म्हणून गौरविले आहे त्या बळीराजाचा बलिप्रतिपदा हा उत्सवदिन आपण मानतो. बलिप्रतिपदेच्या नंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊ-बहिणीचे नाते समृद्ध, वृद्धिंगत करणारा सण.
तीन हजार वर्षांची अखंड परंपरा अन् विविध प्रचलित मान्यता
काही मान्यता आणि उपलब्ध दाखल्यांनुसार दिवाळी हा सण सुमारे ३ हजार वर्षे जुना आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते, असे मानले जाते. तसेच समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात.
किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि मेळघाटात लक्ष्मीपूजनाने दिवाळी
दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात. दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी, असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात. मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते.
दिवाळी अंक आणि जागतिक स्वरुप
दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते. दिवाळी सण केवळ भारतात नाही, तर जगभरात साजरा केला जातो. जगभरातील भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. फटाक्यांच्या आतषबाजीचा देखणा कार्यक्रम होतो.