Diwali 2024: दिवाळीसाठी उरले अवघे काही दिवस; यंदा साजरा करणार आहोत दीपोत्सव 'सप्ताह'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:02 AM2024-10-17T11:02:31+5:302024-10-17T11:03:07+5:30

Diwali 2024: सणांची महाराणी अशी ओळख असणारी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि यंदा तर ती पूर्ण सप्ताहभर साजरी करता येणार आहे!

Diwali 2024: Only few days left for Diwali; This year we are going to celebrate Deepotsav 'Saptah'! | Diwali 2024: दिवाळीसाठी उरले अवघे काही दिवस; यंदा साजरा करणार आहोत दीपोत्सव 'सप्ताह'!

Diwali 2024: दिवाळीसाठी उरले अवघे काही दिवस; यंदा साजरा करणार आहोत दीपोत्सव 'सप्ताह'!

वर्षभरात दिवाळीची वाट आपण सगळेच जण पाहतो. हा असा सण आहे ज्यात सर्व जण गुण्यागोविंदाने, उत्साहाने एकत्र येतात, दिवाळी साजरी करतात. मिठाई, फराळ, सुकामेवा, भेटवस्तूंचे आदान प्रदान करतात. एकमेकांच्या घरी जातात. ऋणानुबंध जपतात. दिवाळी पहाट सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. सणाचा मनमुराद आनंद घेतात. त्यामुळे दिवाळीबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. अनेकदा दिवाळीचे दोन सण एकाच दिवशी येतात आणि मुळात पाच दिवसाची दिवाळी दोन चार दिवसांत गुंडाळल्यासारखी वाटते. मात्र, यंदा प्रत्येक सणाला स्वतंत्र दिवस मिळाल्यामुळे दिवाळीची पुरेपूर मजा लुटता येणार आहे. चला तर जाणून घेऊया, कधी कोणता सण आहे आणि त्याचे शुभ मुहूर्त कोणते आहेत. 

कोजागरी संपताच दिवाळीचे वेध लागतात. फराळाची लगबग सुरु होते. घरात साफसफाई केली जाते. नवीन वस्तू, कपड्यांची खरेदी केली जाते. दिवाळी (Diwali 2024) अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे आता तर उत्साहाला उधाण येणारच! तुम्ही म्हणाल १२ दिवस कसे? तर, हिंदू धर्मानुसार दिवाळीचा सण रमा एकादशीपासून सुरु होतो तो भाऊबीजेला संपतो. यंदा २८ ऑक्टोबर रोजी रमा एकादशी आहे (Rama Ekadashi 2024) आणि त्यालाच जोडून गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस (Vasubaras 2024) आहे. त्यामुळे दिवाळीचा सण २८ ऑक्टोबर रोजी सोमवारपासून सुरु होणार आहे याची नोंद करून घ्या. 

यंदा वसुबारस ते भाऊबीज असा मूळ सहा दिवसांचा दीपोत्सव सात दिवसांचा झाला आहे. कारण ३० ऑक्टोबर रोजी सण नाही. त्यामुळे तो दिवस भाकड दिवस म्हटला जाईल. अर्थात त्या दिवसाच्या येण्याने अडचण काहीच नाही, उलट दिवाळीचा सप्ताहच पूर्ण झाला आहे. म्हणून यंदा २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर आपण दिवाळी साजरी करणार आहोत. दिवाळी वर्षभरातला हा सर्वात मोठा सण म्हटला जातो, मात्र या सगळ्या सणांचे एकामागोमाग एक येणे कशाचे सूचक आहे? चला जाणून घेऊ. 

'दिवाळी म्हणजे दीपोत्सव. बाहेर तर दिवे पेटवायचे, पण खरा दिवा हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल, तर बाहेर पेटवलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेन दिवाळीचा सण साजरा करणे', असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर लिहितात - 

२९ ऑक्टोबर धनत्रयोदशी (Dhan Teras 2024): धनत्रयोदशीच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नरकासुरांना मारायचा. दिवाळीच्या दिवशी 'तमसो मा ज्योतिर्गमय' मंत्राची साधना करता करता जीवनपथ प्रकाशित करायचा. जीवनाच्या वहीचा आढावा घेत, जमेच्या बाजूला ईशकृपा राहावी ह्यासाठी प्रभुकार्याच्या प्रकाशाने जीवन भरून टाकायचे.  नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे. नवे वर्ष म्हणजे शुभसंकल्पांचा दिवस. 

३१ ऑक्टोबर नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024) : नरकचतुर्दशीला कालीचतुर्दशी देखील म्हणतात. नरकचतुर्दशीची कथा अशी आहे - प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर शक्तीमुळे सैतान बनला होता. स्वत:च्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता. एवढेच नाही, तर सौंदार्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही सतावित होता. त्याने स्वत:च्या जनानखान्यात सोळा हजार कन्यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला. स्त्री-उद्धाराचे हे काम असल्यामुळे सत्यभामेने नरकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला. भगवान श्रीकृष्ण मदतीला राहिले. चतुर्दशी दिवशी नरकासुराचा नाश झाला. त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून तिला त्यांनी प्रकाशित करून टाकले. असुरांच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्रे नेसून फिरायला निघाले.

१ नोव्हेम्बर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2024):  दिवाळीच्या दिवशी कनक महणजे लक्ष्मीकडे पाहण्याची पूज्य दृष्टी जोपासण्याचे शिक्षण व भाऊ बीजेच्या दिवशी समस्त स्त्रीजातीकडे आई किंवा बहीण ह्या दृष्टीने पाहण्याचे शिक्षण दिले आहे. स्त्री ही भोग्य नाही, तशी त्याज्यदेखील नाही. ती पूज्य आहे. ही मातृदृष्टी देणारी संस्कृतीच मानवाला विकारांसमोर स्थिर राहण्याची शक्ती देऊ शकते. भाऊबीजेच्या दिवशी स्त्रीकडे बंधूच्या निर्व्याज प्रेमाने तिचा बहिण म्हणून स्वीकार करायचा. 

२ नोव्हेम्बर बलिप्रतिपदा (Diwali Padwa 2024) : नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात. तेजस्वी वैदिक विचारांची अपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्था उध्वस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला. त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतीपदेचा उत्सव साजरा केला जातो. बलि दानशूर होता. त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते. कनक व कांता यांच्या मोहात अंध बनलेला माणूस असुर बनतो. म्हणून बलीचा पराभव करणाऱ्या विष्णुने कनक व कांता यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आसपास जोडून तीन दिवसांचा उत्सव करण्याचा आदेश दिला. शिवाय हा दिवस व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असतो. दिवाळी म्हणजे व्यापाऱ्यांचा वह्या पूजनाचा दिवस. संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा दिवस. या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे. राग, द्वेष, वैर, ईर्ष्या , मत्सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी जुने प्रेम, श्रद्धा व उत्साह वाढावा याकडे लक्ष दिले पाहिजे. 

३ नोव्हेंबर भाऊबीज (Bhai Dooj 2024) : भावा-बहिणीच्या गोड नात्याची वीण घट्ट करणारा सण. यादिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या यशाची, दीर्घायुष्याची मागणी देवाजवळ करते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची, प्रेमाची, मायेची ओवाळणी घालतो. 
 
या संपूर्ण सणात आपण दिव्यांनी घर दार उजळून टाकतो. कंदील लावतो. ही प्रकाश पूजा असते. मोह म्हणजे अंधकार. दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्या गाढ अंधकारातून ज्ञान व प्रकाशाकडे प्रयाण! त्यामुळे दिवाळी नुसती साजरी न करता तिचा आशय समजून घेत साजरी केली तर सुंदर ज्ञानदीप हृदयात तेवत राहील आणि आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सव बनेल.

Web Title: Diwali 2024: Only few days left for Diwali; This year we are going to celebrate Deepotsav 'Saptah'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.