Diwali 2024: अयोध्येत प्रथमच बालकलाकारांकडून रामरक्षा आणि गीत रामायणाचे होणार सादरीकरण!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:22 AM2024-10-25T10:22:48+5:302024-10-25T10:23:37+5:30
Diwali 2024: भाऊबीजेला सारसबागच्या बाप्पासमोर रामरक्षा आणि गीत रामायण सादरीकरण, अयोध्येकडे कूच आणि १३ लक्ष रामरक्षा पठणाची संकल्पपूर्ती!
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भाऊबीजेच्या दिवशी बालचमूकडून गीत रामायण व सामूहिक रामरक्षा पठणाचा भव्य कार्यक्रम सारसबाग येथे ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. कलायन कल्चरल सेंटर, पुणे यांच्या ८ ते १४ वयोगटातील बाल कलाकारांकडून गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व प्रसिद्ध गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात हा गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे तसेच या मुलांच्या व ब्रह्मवृंदाच्या नेतृत्वात भव्य सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे... देवाप्रती, देशाप्रती आणि धर्माप्रती सामाजिक संकल्प करून हे रामरक्षा पठण होणार आहे.
रामरक्षा पठणाचे सामाजिक संकल्प पुढीलप्रमाणे :
• राष्ट्रमंदिर पुनर्निर्माणासाठी
• असुर-अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी
• संघटित शक्तीच्या हुंकारासाठी
• दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्याच्या हेतूने
• वसुंधरा व सर्व प्राणिमात्रांसह विश्वकल्याणाच्या हेतूने
अशा पाच संकल्प द्वारे पाच वेळा रामरक्षा पठण केले जाणार आहे.
पुण्यातील विविध मंदिरांमध्ये गेले वर्षभर सुरू असलेल्या १३ लक्ष रामरक्षा पठणाची पुण्यातील सांगता अयोध्येत होणार आहे त्याआधी श्रीगणेशाचा आशीर्वाद या पुण्यातील सारसबाग येथील गणपतीच्या मंदिरात रामरक्षा पठण करून घेतला जाणार आहे.
रामरक्षेची ही संकल्पपूर्ती करताना अयोध्येत २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी गायिका भाग्यश्री केसकर व पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात बालचमूकडून मराठी गीत रामायण सादरीकरण तसेच गोव्यातील दत्तप्रसाद जोग व समूह यांच्या स्वरात हिंदी गीत रामायण होणार आहे.... असा एकत्रित हिंदी आणि मराठी गीत रामायणाचा कार्यक्रम अयोध्येत प्रथमच होत आहे तसेच अयोध्येतील राम मंदिरात प्रथमच सामूहिक रामरक्षा पठण होत आहे. या सर्व कार्यक्रमांद्वारे १३ लक्ष रामरक्षांची संकल्पपूर्ती श्रीरामचरणी समर्पित केली जाणार आहे.
या संघटित शक्तीच्या हुंकाराने धर्मजागर करण्यासाठी हा सामूहिक रामरक्षा पठणाचा उपक्रम ग्रंथ पारायण दिंडी, पुणे, भक्तिसुधा फाऊंडेशन पुणे व समर्थ व्यासपीठ पुणे यांनी आयोजित केला आहे. तेव्हा मोठ्या संख्येने या सोहळ्यात भाऊबीजेच्या मुहूर्तावर जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.