Diwali 2024: ६४ कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश वात्सयन ऋषींना का करावासा वाटला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:00 AM2024-10-24T07:00:00+5:302024-10-24T07:00:02+5:30
Diwali 2024: सुंदर, सुबक रांगोळी काढता येणे हे कौशल्याचे काम आहे, पण म्हणून तिचा समावेश ६४ कलांमध्ये का केला गेला ते जाणून घ्या!
रांगोळी म्हणजे मन प्रसन्न करणारी कला. विशिष्ट दगडांचे शुभ्र चुर्ण चिमटीत धरून जमिनीवर सोडून आकर्षकपणे रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी असे म्हणतात. रांगोळी काढणे ही एक अनुपम कला असून तिचा मूळ उगम धार्मिक अनुबंध व रचनेतून आला आहे.
धार्मिक व मंगल कार्यात रांगोळीचे महत्त्व अग्रस्थानी आहे. सण, उत्सव, मंगल कार्य, धार्मिक कार्यक्रम, व्रतवैकल्ये इ. शुभ प्रसंगी सर्वप्रथम धर्मकृत्याच्या स्थानी रांगोळी काढण्याचा कुळाचार आहे. एखाद्याला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती रांगोळी रेखाटतात.
वाढदिवस, अभिष्टचिंतन, मुंज या व अशा समारंभांच्या भोजनप्रसंगी पाट-पानाभोवती रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या अर्थगर्भ रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. दिवाळीत जसे दीपोत्सव साजरे करतात, तसे आता विविध ठिकाणी रांगोळी प्रदर्शन भरवून रांगाळीचे आगळे दर्शन घडवतात.
पूर्वीच्या काळी प्रत्येक घरी नित्य नेमाने दारापुढे सडासंमार्जन करून रांगोळी काढण्याची प्रथा होती. रांगोळ्या शिरगोळ्याच्या चूर्णाने काढतात. कोकणात भाताची फोलपटे काढून ती जाळून त्यांची पांढरी राख रांगोळी म्हणून उपयोगात आणतात.
सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश आहेत. रांगोळीत ज्या आकृत्या रेखाटतात, त्या प्रतीकात्मक असतात. सरळ रेषेपेक्षा वक्र रेषा ही सौंदर्याची अनुभूती घडवते. अशा वक्ररेषा आणि बिंदू, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांतून विविध प्रकारे प्रतीकात्मक आकृत्या निर्माण करता येतात.
पाटाभोवती रांगोळीचा चौकोन काढला तर त्याला समोरच्या रेषेवर त्रिकोण काढतात. चौकोनाची आडवी रेघ हा त्या त्रिकोणाचा पाया असतो. त्रिकोणाच्या शिरोभागी एक वर्तुळ काढतात. त्यामुळे रेषेला मखराचे स्वरूप येते. चौकोनाचे कोपरे रिकामे ठेवण्याची चाल नाही. त्याच्या कोपऱ्यांवर रांगोळीची एक चिमूट ओढून तिथे त्रिदळाची प्रतिकृती काढतात. हे त्रिदळ त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था आणि त्रिकाल म्हणजे पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्त्वाचे प्रतीक असते.
रांगोळीचे आकृतीप्रधान व वल्लरीप्रधान असे मुख्य दोन भेद आहेत. आकृतिप्रधान रांगोळी राजस्थान, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दक्षिण भारत या प्रदेशात आढळते. तिच्यात रेखा, कोन आणि वर्तुळ प्रमाणबद्ध असतात. वल्लरीप्रधान रांगोळी हिंदुस्थानच्या पूर्व भागात आढळते. या प्रकारात फूलपत्री, वृक्षवल्ली, पशुपक्षी यांना प्राधान्य असते. अशी रांगोळी काढण्यात बंगाली स्त्रिया सिद्धहस्त असतात.
बंगालमधील अलिपना, मध्यप्रदेशातील चौकपूरना, गुजरातमधील साथिया, राजस्थानमधील मांडना, आंध्रप्रदेशातील मुगू, तामीळनाडूमधील कोलम, केरळ मध्ये पूविडल, कर्नाटकमध्ये रंगोळी हे सगळे रांगोळीचे प्रादेशिक प्रकार आहेत.
दिवाळीची रांगोळी, पूजेची रांगोळी, कासवाकृती, कमलाकृती, तुळशीवृंदावन असे रांगोळीचे नानाविध प्रकार आहेत. भाद्रपद मासात गौरीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी सडासंमार्जन झाल्यावर दारापासून ते घरापर्यंत सर्वत्र त्यांची पाऊले रांगोळीने काढतात. मग त्यावरून सुवासिनी त्यांचे मुखवटे घंटानाद करत घरात आणतात. याशिवाय चैत्रमासातअंगणाचा व दारासमोरचा एक कोपरा गोमयाने सारवण करून त्यावर सांकेतिक प्रतीक असलेली रांगोळी रेखाटून त्याला हळद, कुंकू आणि फुले वाहतात. त्याला चैत्रांगण म्हणतात. चैत्रांगणामध्ये तुळशी वृंदावन, राधाकृष्ण, स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, कमळ, शंख, हत्ती,सूर्य, मुलींच्या खेळांच्या विविध प्रकारच्या आकर्षक नाविन्यपूर्ण प्रतिमा रंगावलीने साकार करून स्त्रिया आनंदोत्सव साजरा करतात.
रांगोळी ही भारतीय संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब आहे. विविध कल्पनांचे, विचारांचे आणि श्रद्धांचे घडलेले आविष्कार म्हणजेच मानवी संस्कृती! रांगोळी हा असाच आविष्कार मानवी संस्कृतीने घडवलेला आहे. कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण जीवनाचे उत्कट भावदर्शन रांगोळीतून व्यक्त होते.
रांगोळी घालताना पाहून कवि केशवसूत लिहितात,
आधि ते लिहिले तिने रविशशी नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आलेखिले गोपदा।
भूमी व आकाशातील सर्व उपकारक गोष्टींची रांगोळीतली ही चित्रे बघून कवी शेवटी म्हणतात, `हे सुभगे, तू तुझ्या या रांगोळीत स्वर्ग आणि भूमी यांचा अपूर्व संगम केला आहेस. तो अजून कुणालाही जमला नव्हता.' रांगोळी घालणाऱ्या स्त्रिच्या प्रतिभेचे सहजसुंदर कौतुक आहे.
चौसष्ट कलांमध्ये रांगोळी कलाप्रकाराचा उल्लेख वात्सायनाच्या कामसूत्रात आढळतो. त्यात म्हटले आहे की, रांगोळी म्हणजे मन प्रसन्न करणारी कला. रांगोळी काढणे ही एक अनुपम कला असून तिचा मूळ उगम धार्मिक अनुबंध व रचनेतून आला आहे. फलांची रांगोळी, धान्यांची रांगोळी, पाण्यावरील रांगोळी असे हे रांगोळीचे नेत्रसुखद स्वरूप दर्शनीय आहे.
हिंदू, जैन व पारशी धर्मात रांगोळी शुभप्रद मानली जाते. रांगोळी अशुभापासून, दूषितापासून रक्षण करते. ही पूर्वापार चालत आलेली कलासंस्कृती आहे. म्हणून रांगोळीचे विलोभनीय रूपदर्शन पाहून ती मनामनाला भावते,
फुले स्वस्तिके रांगुलीची लिहावी,
अशी की, जने कौतुके ती पहावी!