Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:58 AM2024-09-23T11:58:12+5:302024-09-23T12:05:45+5:30

Sant Dnyaneshwar Mauli Maharaj Dnyaneshwari Jayanti: तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम तसेच पसायदानाचे अक्षय वैभव देणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आहे.

dnyaneshwari jayanti 2024 know significance of sant dnyaneshwar mauli maharaj dyaneshwari on birth anniversary in marathi | Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

Sant Dnyaneshwar Mauli Maharaj Dnyaneshwari Jayanti: वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर ह्यांनी गीतेवर रचिलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. भाद्रपद वद्य षष्टी ही ज्ञानेश्वरीची जयंती मानली जाते. शके १२१२ किंवा इ. स. १२९० मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, असे म्हटले जाते. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी ह्या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. संत नामदेवांनी ह्या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे पुढीलांनी रूढ केली असावीत, असे सांगितले जाते. 

ज्ञानेश्वरीतील पसायदान ही एक अत्युत्कट प्रार्थना आहे. विश्वात्मक देवाला म्हणजेच श्रीविश्वेश्वरावाला ज्ञानेश्वरांनी पसायदान देण्याची विनवणी केलेली आहे. पसायदान म्हणजे कृपाप्रसादाचे दान. हे दान ज्याच्याकडून अपेक्षित आहे तो विश्वात्मक देव वा श्रीविश्वेश्वराव म्हणजे ज्ञानेश्वरांचे गुरू प्रत्यक्ष निवृत्तिनाथ होत. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणजे प्रसाददान किंवा कृपेचे दान असून ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञहोता. ह्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे, अशी प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. ह्या पसायदानात विश्वात्मक देव, श्रीविश्वेश्वराव ह्या शब्दांनी ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुरू निवृत्तिनाथ ह्यांचा निर्देश केला आहे, असे दिसते. ह्या पसायदानात ज्ञानेश्वरांनी व्यक्तिशः स्वतःसाठी म्हणून काहीच मागितलेले नाही. विश्वकल्याणासाठी केलेली ही प्रार्थना विश्वेश्वरावाने मान्य केल्याचे म्हटल्यामुळे ‘ज्ञानदेवो सुखिया झाला’ असे त्यांनी म्हटले आहे. ज्ञानेश्वरांचे हे पसायदान म्हणजे मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे, असे म्हटले जाते.

तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम 

ज्ञानेश्वरी ही गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टीका आहे. ज्ञानेश्वरीची एकनाथपूर्वकालीन विश्वसनीय प्रत अद्याप मिळालेली नाही. तिची जुन्यात जुनी प्रत मिळविण्याचे अनेक प्रयत्न झाले. निवृत्तिनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेले हे काव्यमय प्रवचन केले. ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय, असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. ज्ञानेश्वरी हा एक श्रोतृसंवाद आहे. ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांपैकी नऊ अध्यायांत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी प्रकट संवाद साधलेला आहे. ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वर आपल्या अगदी निकट येऊन आपल्याशी बोलत आहेत, असे आपल्याला वाटते पण असे असूनही ज्ञानेश्वरी कधी बहिर्मुख होत नाही तिची अंतर्मुखता ती सोडत नाही. 

गीतेवरील सर्वश्रेष्ठ टीका ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी ही गीतेवरील सर्वश्रेष्ठ टीका होय. ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांचे सृष्टिनिरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते, हेही त्यातून दिसून येते, असे मत अभ्यासक व्यक्त करतात. ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरी सांगितली. तसेच श्रोत्यांशी वेळोवेळी संवादही साधला. त्यांच्या या श्रोतृसंवादाची काही वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येतात. श्रोतृसंवाद हा खऱ्या अर्थाने श्रोतृसंवाद आहे. यातील संवाद सविस्तर आणि मनापासूनचे आहेत. यातून ज्ञानेश्वरांच्या अलौकिक, आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार झालेला दिसून येतो. ज्ञानेश्वरांच्या श्रोतृसंवादात अंतर्मुखता असल्यामुळे त्यांचा श्रोता हा ज्ञानेश्वरीच्या आशयाचाच एक भाग होतो, असे अभ्यासक सांगतात.

ज्ञानेश्वरीचे मुख्य अधिष्ठान भक्ती हेच आहे

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्र सारस्वताचे अक्षय वैभव आहे. ज्ञानेश्वरी ही केवळ भगवद्गीतेची टीका नाही, तर प्राकृत वाणीचा अलंकार घेऊन गीतातत्त्वाचे विस्तृत भाष्य ज्ञानदेवांच्या प्रतिभासामर्थ्याने आणि सखोल तत्त्वचिंतनाने विस्तारले आहे. ज्ञानेश्वरांवर नाथसंप्रदाय आणि भागवत संप्रदाय या दोन संप्रदायांचे संस्कार होते. या दोन्ही संप्रदायांतील विचारसरणींचे ऐक्य ज्ञानेश्वरांनी घडवून आणले आणि ज्ञानभक्तीचे एक नवे तत्त्वज्ञान जगाला दिले. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीच्या संदर्भात जे विवेचन केले आहे, ते सर्व नाथपंथातील विचारसरणीचे आहे. नवव्या अध्यायात आलेल्या हठयोगाच्या विषयाकडे ज्ञानेश्वर नाथपंथीयांच्या दृष्टीनेच पाहतात. नाथपंथाच्या अशा काही खुणा ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी दिसतात. भक्तीचे तत्त्व वारंवार मांडलेले दिसते. ज्ञानेश्वरीचे मुख्य अधिष्ठान भक्ती हेच आहे, असे प्रकर्षाने दिसते, असेही अभ्यासकांचे मत आहे.

संत एकनाथ महाराजांनी शुद्ध केली ज्ञानेश्वरीची प्रत

काव्य, भाषासौष्ठव, प्रासादिकता, व्यावहारिक दृष्टान्त, सिद्धान्त, रसाळता आणि तत्त्वचिंतन या सर्वच भूमिकेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्र सारस्वतात आणि मराठी लोकजीवनातही शिखरावर जाऊन बसला आहे. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत. गीतेच्या सातशे श्लोकांवर ज्ञानदेवांनी विस्तारपूर्वक नऊ हजार तेहतीस ओव्या लिहिल्या आहेत. संत एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वरीचे आद्य संपादक असून, आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती एकनाथांनी शुद्ध केलेली प्रत आहे. एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या तत्कालीन शेकडो प्रति जमा करून शुद्ध प्रति तयार केल्याचे सांगितले जाते. ज्ञानेश्वरीच्या जुन्या प्रती शोधून काढून त्यांच्यावर अनेकांनी संशोधन केले आहे. गीतेवरील विषयांबरोबरच ज्ञानदेवांच्या स्वयंप्रज्ञेने व विविधांगी चिंतनाने ज्ञानेश्वरी नटली आहे. ‘अर्जुन विषाद’, ‘निष्कामकर्मयोग’, ‘स्थितप्रज्ञलक्षण’, कर्मसंन्यास आणि नैष्कर्म्य अवस्था ज्ञानयोग, ज्ञान-विज्ञान, ब्रह्म अध्यात्म आणि कर्म अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ, समग्र भक्तिदर्शन, ज्ञानी भक्त, विश्वरूपाचा आविष्कार, ज्ञान्याची लक्षणे, ज्ञेय-परबह्म, भगवंताच्या विभूती आणि शेवटी ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांजवळ विश्वात्मक देवाकडे मागितलेले पसायदान या अंतरंग दर्शनांनी ज्ञानेश्वरी स्वयंपूर्ण असल्याचे म्हटले जाते.

 

Web Title: dnyaneshwari jayanti 2024 know significance of sant dnyaneshwar mauli maharaj dyaneshwari on birth anniversary in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.