ज्ञानेश्वरी जयंती: ज्ञानेश्वरीच्या नित्य वाचनाने मनुष्य अंतर्बाह्य कसा बदलतो, हे सांगणारे एका शिष्याचे उदाहरण वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 03:21 PM2023-10-03T15:21:14+5:302023-10-03T15:21:56+5:30

माउलींनी ज्ञानेश्वरी लिहिण्यास प्रारंभ केला ती तिथी म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठी; या प्रासादिक ग्रंथाचा अनेकांनी अनुभव घेतला, त्यातलाच एक किस्सा वाचा!

Dnyaneshwari Jayanti: Read a disciple's example of how regular recitation of Dnyaneshwar changes a person from within! | ज्ञानेश्वरी जयंती: ज्ञानेश्वरीच्या नित्य वाचनाने मनुष्य अंतर्बाह्य कसा बदलतो, हे सांगणारे एका शिष्याचे उदाहरण वाचा!

ज्ञानेश्वरी जयंती: ज्ञानेश्वरीच्या नित्य वाचनाने मनुष्य अंतर्बाह्य कसा बदलतो, हे सांगणारे एका शिष्याचे उदाहरण वाचा!

googlenewsNext

>> रोहन विजय उपळेकर

४ ऑक्टोबर रोजी भाद्रपद कृष्ण षष्ठी आहे, ही तिथी श्रीज्ञानेश्वरी जयंती म्हणून ओळखली जाते. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी शके १२१२ अर्थात् इ. स.१२९०-९१ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथील श्रीमोहिनीराजाच्या मंदिरात श्री ज्ञानेश्वरी प्रथम सांगितली. पण ती कोणत्या तिथीला लिहायला सुरवात केली व कोणत्या तिथीला पूर्ण केली हे इतिहासाला ज्ञात नाही. पण त्यावेळचे काही प्रसंग मात्र नोंदवलेले आहेत.

शके १२१२ मधील पौष अमावास्येला (साधारणपणे १२९० चा डिसेंबर किंवा ९१ चा जानेवारी महिना ) पैठण येथे अर्धोदय पर्वणी होती. त्याचवेळी माउलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले होते. तो रेडा सलग पाच दिवस अखंड वेद म्हणत होता. माघ शुद्ध पंचमीला त्याने वेदपठण थांबवले. हा अलौकिक चमत्कार पाहून पैठणच्या तत्कालीन ब्रह्मवृंदाने माउलींना 'शुद्धिपत्र' अर्पण केले. यात एकूण सव्वीस श्लोक असून त्यात माउलींचे तोवर घडलेले चमत्कार नोंदवलेले आहेत. या शुद्धिपत्रावर बोपदेव व रामशास्त्री आदी इतर पंडितांच्या सह्या आहेत. त्यानंतर पैठणात काही दिवस राहून माउली व बाकीची भावंडे आळंदीकडे निघाली. त्यावेळी त्यांचे माता पिता देखील बरोबर होते. नेमके गोदावरीच्या तीरावर सद्गुरु श्री रामानंदस्वामी उपस्थित झाले. त्यांना भगवान श्रीपांडुरंगांनी स्वत:च्या गळ्यातील तुळसीमाळा देऊन पैठणला पाठविले होते. ती माळ माउलींच्या गळ्यात घालून भक्तिप्रसार करण्याची आपली आज्ञा त्यांना पोचती करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी माउलींना तुळसीमाळ घालून आज्ञा दिली. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना बदरीकाश्रमात जाऊन उर्वरित आयुष्य साधनेत व्यतीत करण्यास तात्काळ पाठवून दिले व स्वत: काशीला परत निघून गेले. 

तेथून मग ही भावंडे मजल दरमजल करीत नेवासे येथे आली. त्या जागी प्रवरा नदीच्या तीरावरील मोहिनीराजाच्या मंदिरातील खांबाला टेकून बसून, भगवान पंढरीनाथांच्या आज्ञेनुसार भक्तिप्रसार करण्याच्या उद्देशाने, सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथांची अनुज्ञा घेऊन माउलींनी श्री ज्ञानेश्वरी सांगितली. त्यावेळी तेथील ज्या सच्चिदानंदबाबा थावरे या देशस्थ ब्राह्मणाला माउलींनी मेलेला जिवंत केले होते, त्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहून घेण्याचे कार्य केले. श्री ज्ञानेश्वरी रचनेचा हा प्रसंग शके १२१२ मधील माघ व फाल्गुन म्हणजेच इ.स. १२९१ च्या जानेवारी - फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये घडलेला आहे. पण तिथीची नेमकी नोंद उपलब्ध नाही.

पुढे कालौघात ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये पाठांतरामुळे अशुद्धी निर्माण झाली. ते शोधून मूळ शुद्ध प्रत तयार करण्याचे कार्य सद्गुरु श्री माउलींच्या आज्ञेने श्रीसंत एकनाथ महाराजांनी शके १५१२ म्हणजे इ.स.१५९१ साली आजच्याच तिथीला, कपिलाषष्ठीच्या सुमुहूर्तावर गोदावरीच्या काठी पैठण क्षेत्री पूर्ण केले. म्हणून आजच्या तिथीला "श्रीज्ञानेश्वरी जयंती" म्हणतात. ( श्री माउलींनी ज्ञानेश्वरी आजच्या तिथीला सांगितलेली नाही, हे लक्षात घ्यावे.) काही प्रतींमध्ये शके १५०६ मध्ये हे शुद्धिकार्य केले असाही उल्लेख आहे. परंतु बहुसंख्य लोक शके १५१२ हेच साल मानतात.

'श्री ज्ञानेश्वरी' हा भगवान श्री माउलींचा साक्षात् 'वाङ्मय-विग्रह' आहे. माउलीच श्री ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुम्हां-आम्हां भक्तांवर कृपा करण्यासाठी अतिशय सुलभ होऊन प्रकटलेले आहेत. म्हणून जो श्रद्धेने व निष्ठेने जशी जमेल तशी भगवती श्री ज्ञानदेवीची सेवा करेल तो हमखास उद्धरून जाईलच, यात तिळमात्र शंका नाही. तसा प्रत्यक्ष श्रीगुरु निवृत्तिनाथ महाराजांचा आशीर्वादच आहे या दिव्य-पावन ग्रंथाला.

श्री ज्ञानेश्वरी ही साक्षात् भगवती पराम्बिका आहे. श्रीसंत जनाबाई तर श्री ज्ञानेश्वरीला 'माय माहेश्वरी'  म्हणतात. भगवान श्रीमहेश्वरांपासून चालत आलेल्या कृपासंप्रदायाचे परिपूर्ण प्रकटीकरण या अलौकिक ग्रंथात माउलींनी उदार अंत:करणाने करून ठेवलेले आहे. वेदोपनिषदादी सर्व वाङ्मय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सहज सोपे शब्दरूप घेऊन प्रकटल्याने, सर्वांनाच त्या आत्मानंदाचा सुखलाभ शक्य झालेला आहे. श्री ज्ञानेश्वरी हा भगवान श्री माउलींचा तुम्हां-आम्हां भक्तांवरचाच नव्हे तर उभ्या जगावरचा कधीही आणि कोणत्याही उपायाने न फिटणारा अद्वितीय उपकार आहे.

भगवती श्री ज्ञानदेवीला माउली स्वत:च 'भावार्थदीपिका' म्हणतात. ही ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्णांचे हृद्गत जसेच्या तसे, भावपूर्ण शब्दांमध्ये साकारणारी, अलौकिक तेजाने तळपणारी, अकल्पनाख्य कल्पतरुसम फल देणारी सुवर्ण-सुगंधी दीपकलिका आहे. पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'श्रीज्ञानदेवांची शब्दकळा' या अद्भुत रसपूर्ण ग्रंथात म्हणतात, "या 'भावार्थदीपिका' नामक अद्भुत उद्यानातील हे एक एक असे शब्दशिल्प, अनंत दैवी वोडंबरीकळा स्वतःमध्ये सामावून स्थिरावलेले आहे. हे शिल्प नेत्रांना सुखविते, कर्णांना रिझविते, जिव्हेला तृप्ती आणते, त्वचेला हळुवारपणे गोंजारते आणि घ्राणेंद्रियाला दिव्यगंधानुभूतीच्या उत्तुंग झुल्यावर अनिवार आकर्षणाचे हिंदोळे देऊ लागते. हे शब्दशिल्पांचे उद्यान म्हणूनच सजीवांनाही संजीवनी देणारे आहे, अनाथांच्या शिरी अखंड स्वानंद मातृसाउली धरणारे आहे; आणि साक्षात् सरस्वतीलाही 'माउली होऊन' आपल्या निगूढार्थओटीच्या पाळण्यात जोजविणारे आहे ! सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांची अमृतवाणी वेदांनाही फिके पाडणारी आहे. श्रीभगवंतांची नित्यानंद-वर्षिणी प्रेमशक्तीच या वाणीच्या रूपाने प्रसन्न होऊन, सगुण-साकार झालेली आहे !"

यच्चयावत् सर्व संतांनी एकमुखाने श्री ज्ञानेश्वर महाराजांना 'माउली' म्हणून गौरविलेले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणेच त्यांचे अभिन्न-स्वरूप असणारी श्री ज्ञानेश्वरी देखील त्यांचे 'माउलीपण' समर्थपणे मिरविते. पूजनीय शिरीषदादा म्हणतात, "माउलींचे माउलीपण, त्यांच्या लेकरांच्या हृदयात मृदुस्पर्शाने जागविणारी ही अक्षरकिमया, अक्षरशः अंतःकरण भारावून, वेडावून टाकणारी आहे; आस्वादकालाच निरपेक्षतेने मातृहृदय बहाल करणारी आहे. एवढे दातृत्वाने बहरून दरवळलेले मातृत्व या पोरक्या जगाने कधी अनुभवलेच नव्हते."
भगवान श्री माउली स्वतःच श्रीगीता-ज्ञानेश्वरी विषयी म्हणतात,

म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवक होईल इयेचा ।
तो स्वानंदसाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥ज्ञाने.१८.७८.१६६८॥

"जो सद्भक्त मनाने, शरीराने व वाणीने भगवती पराम्बिका श्री ज्ञानेश्वरीचा अनन्य सेवक होईल, तो तिच्या परमकृपेने स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राटच होऊन ठाकतो !"

हे सेवकपण देखील विविधांगी आहे. श्री ज्ञानेश्वरीला साक्षात् माउलींचे स्वरूप जाणून तिची प्रेमभावे पूजा करणे, तिला उच्चासनावर ठेवून प्रदक्षिणा घालणे, तिला प्रेमादरपूर्वक वंदन करणे, दररोज क्रमाने ओव्या स्वहस्ते लिहून काढणे, जमतील तेवढ्या ओव्या वाचणे, त्यांचे चिंतन करणे, ओव्यांचा किंवा ओवीगटांचा जप करणे, वारंवार म्हणणे, पारायणे करणे ही सर्व श्री ज्ञानेश्वरी-सेवेच्याच संतांनी सांगितलेल्या विविध पद्धती आहेत. या सर्व सेवनाने माउलींची परमकृपा होऊन तो भक्त ज्ञानेश्वरीरूपी अमृताच्या आस्वादनाने अखंड आनंदमयच होऊन जातो. म्हणून आपण सर्वांनी या सेवा-पद्धतींचा अवलंब करून आपले परमकल्याण साधणेच इष्ट आहे.

श्री ज्ञानेश्वरी ही अत्यंत अद्भुत आहे, ती काय अनुभव देईल हे सांगता येत नाही. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी समक्ष पाहिलेली एक घडलेली हकिकत सांगतो. श्री माउलींचे पूर्णकृपांकित सत्पुरुष पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांकडे एकदा एक गृहस्थ आले व म्हणाले की, "माझे एका स्त्रीवर प्रेम आहे. ती मला प्राप्त होईल का?" पू.मामांनी गंभीरपणे त्यांच्याकडे पाहिले व म्हणाले, "तुझी तशी इच्छा राहिली तर होईल प्राप्त." तो म्हणाला, "उपाय काय त्यासाठी?" पू.मामा म्हणाले, "ज्ञानेश्वरी वाच ! " मग त्यांनी कशा पद्धतीने वर्षभर वाचायची तेही सांगितले. सहा महिन्यांनीच ते गृहस्थ पू.मामांसमोर येऊन ढसढसा रडू लागले. पू.मामांनी विचारले, "काय झाले रे, वाचतोस ना ज्ञानेश्वरी?" ते म्हणाले, "वाचतो ना. पण आता ती वासनाच शिल्लक राहिलेली नाही." पू.मामा मिश्किलपणे म्हणाले, "अरे, वाटोळेच झाले की तुझे. आता काय करणार तू?" त्यावर ते म्हणाले, "आता मी जन्मभर ज्ञानेश्वरीच वाचणार !" हे ऐकून पू.मामांना गहिवरून आले, त्यांच्या नेत्रांमधून प्रेमाश्रू वाहू लागले व ते म्हणाले, "पोरा, आमच्या माउलींनी कृपा केली बघ तुझ्यावर !" पूजनीय श्री.शिरीषदादा सांगतात, "पू.मामांनी केवळ 'ज्ञानेश्वरी वाच' असे सांगून आयुष्याचे कल्याण झालेली अनेक उदाहरणे आम्ही पाहिलेली आहेत. ज्ञानेश्वरीची ही किमया आहे की, ती अंतःकरणच बदलून टाकते. ऐहिक वासनाही नष्ट होऊन ते साधक विनासायास मोक्षप्रत जातात. ज्ञानेश्वरीला मनापासून शरण जाऊन तिला साक्षात् माउलींचेच स्वरूप मानून सेवा केल्यास ती शाश्वत कल्याणच करते !"

श्री ज्ञानेश्वरीबद्दल प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या चरित्रपर श्रीगुरुसाहस्री या पोथीत प.पू.श्री.शिरीषदादा म्हणतात,

ज्ञानेश्वरी माउली माय । एक पुस्तकी ग्रंथालय ।
ब्रह्मसाम्राज्य निलय । मामा म्हणती ॥१३.१७॥

श्री ज्ञानेश्वरी हे एकपुस्तकी ग्रंथालयच आहे, त्यामुळे यच्चयावत् सर्व गोष्टी ज्ञानेश्वरीत सापडतात. ब्रह्मसाम्राज्याचे प्रत्यक्ष विश्रांतिस्थानच असणारी ही ज्ञानेश्वरी, शरणागत भक्ताला परिपूर्ण ब्रह्मानुभूती देणारी अत्यंत अद्भुत आणि अलौकिक अशी साक्षात् मायमाउलीच आहे !

अशा या अद्वितीय ग्रंथाची निर्मितीच माउलींनी जगाविषयीच्या अपार करुणेने केलेली आहे. कलियुगात भयंकर परिस्थिती आल्यावर जीवांनी करायचे तरी काय? त्यांचा उध्दार कसा व्हावा? असा आपल्या मनीचा कळवळा माउलींनी श्रीसद्गुरूंकडे व्यक्त केला. त्यावर श्री निवृत्तिनाथ महाराजांनी हा ग्रंथ रचण्याची आज्ञा केली. माउलींनी जीवांच्या करुणेने याद्वारे जगाची कायमचीच सोय करून ठेवली. म्हणून श्री ज्ञानेश्वरी ही साक्षात् श्रीगुरुकृपाच आहे. तिला शरण जाऊन निष्काम भावनेने जो तिची सेवा करेल, त्याचे सर्वार्थाने कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही !

प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचेही श्री ज्ञानेश्वरीवर निरतिशय प्रेम होते. त्यांनी आजन्म ज्ञानेश्वरीचे चिंतन केले. ते सदैव हातात ज्ञानेश्वरी घेऊन पेन्सिलने खुणा करीत चिंतन-मनन करीत बसलेले असायचे. नुसते चिंतनच नाही तर त्यांचे प्रत्येक आचरणही त्यानुसारच होते. ते प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी जगत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी आपल्या हयातीत अनेक भक्तांना ज्ञानेश्वरीची गोडी लावून तिची सेवा करायला लावली व त्यांचे जीवन धन्य केले.
आज श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या या पावन प्रसंगी, भगवती श्री ज्ञानदेवीचे प्रेम हृदयात सर्वांगांनी निर्माण होऊन, तिच्या सेवेची अाणि सेवनाची सुबुध्दी प्राप्त होऊन अंतिमतः अपार आनंदाची सर्वांना अनुभूती येवो; अशी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या आणि त्यांचेच अभिन्न स्वरूप असणा-या या करुणावरुणालय श्री ज्ञानेश्वरी-माउलीच्या श्रीचरणीं सर्वांच्या वतीने मी सादर प्रार्थना करतो !!

भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥
तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे ।  भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥
एका जनार्दनीं संशय सांडोनी ।  दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥

https://rohanupalekar.blogspot.com/

संपर्क  - 8888904481

Web Title: Dnyaneshwari Jayanti: Read a disciple's example of how regular recitation of Dnyaneshwar changes a person from within!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.