सर्व पापकर्मांचा नाश व इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या कामिका एकादशीचे व्रत असे करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:15 AM2021-08-03T11:15:37+5:302021-08-03T11:16:15+5:30
मनुष्याने मनातील मतभेद विसरून एकोप्याने प्रत्येक क्षणाचा आनंद स्वतः घ्यावा व दुसऱ्याला घेऊ द्यावा. हाच खरा कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे.
आषाढ कृष्ण एकादशीला कामिका एकादशी असे नाव आहे. उद्या म्हणजेच बुधवारी ४ ऑगस्ट रोजी ही एकादशी आहे. या एकादशीची पवित्रा एकादशी आणि कृष्णैकादशी अशी दुसरी नावेही आहेत. या एकादशीला नेहमच्या एकादशीसारखाच उपास आणि पूजा करायची असते. शिवाय श्रीधर या नावाने भगवान विष्णूंची पूजा करून चोवीस तास अखंड तेवता असा तुपाचा दिवा लावणे, हा विशेष विधी असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पंचामृत पूजा करावी. पूजेत तुळस असणे आवश्यक असते. तसेच आपल्याला शक्य होईल त्या गोष्टीचे दान द्यावे.
या एकादशीची एक कथा आहे -
पूर्वी एका शूर क्षत्रियवीराच्या हातून अपघाताने ब्रह्महत्या घडली. त्यावेळी त्याने त्या ब्राह्मणाचे तेरावे आणि पुन्हा चौदाव्या दिवशीचे अंत्यसंस्कार विधी करायचे असे ठरवले. परंतु ब्रह्महत्या घडली म्हणून सर्व ब्राह्मणांनी त्याच्याकडे जायचे नाकारले. मात्र त्यांनी या पापाचा नाश व्हावा म्हणून त्याला ही कामिका एकादशी करायचा सल्ला दिला. त्याने मनोभावे हे व्रत केले. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले. त्याची पापातून मुक्तता केली. व त्याला स्वर्गप्राप्ती झाली.
सद्यस्थितीत या व्रताचे महत्त्व -
आपल्याकडून दर दिवशी कळत नकळत अनेक पापं घडत असतात. व त्यात नित्यनेमाने भर पडत असते. पाप म्हणजे केवळ कोणाची हत्या असे नाही, तर अपमान, अपशब्द, फसवणूक, तिरस्कार अशा कृतीतूनही आपण समोरच्याचे मन दुखावतो. ते मोठे पाप आहे. शरीराला बसलेले घाव एकवेळ भरून निघतीलही, परंतू मनाला झालेले घाव भरून निघत नाहीत. याच पापाचे परिमार्जन व्हावे यासाठी अशा व्रताचे आयोजन केले आहे. यात उपास केवळ शरीराला नाही तर मनालाही घडवणे अपेक्षित आहे, तसे घडले तरच पापक्षालन होण्यास मदत होईल व पुढच्या वेळी कोणासही दुखवताना व्रतस्थ मन तसे करण्यास धजावणार नाही.
व्रत उत्सवाचा उद्देश मुळात हाच आहे, की मनुष्याने मनातील मतभेद विसरून एकोप्याने प्रत्येक क्षणाचा आनंद स्वतः घ्यावा व दुसऱ्याला घेऊ द्यावा. हाच खरा कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे. हे ज्यादिवशी आपल्याला कळेल, तेव्हा एकादशीचे व्रत खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. तो दिवस आपल्या आयुष्यात लवकर येवो, म्हणून भगवान विष्णूंना प्रार्थना करायची. त्यांना शरण जायचे. पवित्र तुळशी वाहून आपले आयुष्यही पवित्र होवो अशी प्रार्थना करायची. तसे झाले की आपोआप पापक्षय होईल आणि इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल. हीच या कामिका एकादशी व्रताची फलश्रुती.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।