अशी करा गजानन महाराजांची मानसपूजा!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 11, 2021 08:00 AM2021-02-11T08:00:00+5:302021-02-11T08:00:06+5:30
दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून करूया मानसपूजा!
आपण पूजा करतो, ती देवासाठी नाही, तर आपल्या मन: शांतीसाठी. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाचिये द्वारी उभे राहायला दोन क्षणही सवड मिळत नाही. अशा वेळेस मनाला रुखरुख लागू न देता, शास्त्राने दिलेला मानसपूजेचा पर्याय निवडावा. यासाठी देवपूजेसाठी करतो, तसाच विधी करावा. मनाचा गाभारा स्वच्छ करून घ्यावा. आपल्या हृदयमंदिरात देवाला बसवावे. भक्ती भावाची फुले वाहावीत आणि श्रद्धेचा धूप दीप लावून प्रार्थना करावी. एवढी सोपी आहे मानसपूजा. आज गुरुवार, त्यानिमित्ताने गजानन महाराजांची मानसपूजा करूया.
गुरु गजानन सांगे, नाही सक्तीची मूर्तिपूजा,
भाव मनी ठेवून, करा मानसपूजा ।।
गुरु गजानन सांगे, नाही गेलात मंदिरी,
तरी हात जोडा मनोमनी, भक्ती असू द्या अंतरी।।
गुरु गजानन सांगे, नको पूजन अर्चन,
करा माझे स्मरण, करण्या मला आवाहन ।।
गुरु गजानन सांगे, नको पेटवू तो दीप,
सोडा अहंपणा येथ, जाळा मी पणाचा धूप ।।
गुरु गजानन सांगे, नको ती तेलवात,
मोह वासनेची वात, टाळा ओवाळून प्रपंचात ।।
गुरु गजानन सांगे, नसू दे दुर्वा हिरव्या,
नामजपाच्या जुड्या, तुम्ही मला वहाव्या।।
गुरु गजानन सांगे, नको मोदक एकवीस,
करा त्यास अन्नाने तृप्त, जो भुकेने असेल कासावीस।।
गुरु गजानन सांगे, नको पिठले भाकरी,
धावा त्यांच्यासाठी, ज्यांना मदत आहे जरुरी।।
असा माझा गुरु गजानन, आहे भावाचा भुकेला,
नाही कशाचीच अपेक्षा, काव्यपुष्पांनी पुजला।।
श्री गजानन, जय गजानन।।