जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर; वाचा दोन जिवलग मित्रांची कहाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 09:03 AM2021-05-19T09:03:06+5:302021-05-19T09:03:50+5:30
कशीही परिस्थिती असली, तरी चांगलीच कर्मे करावीत. कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते.
जिवबा आणि महादबा नावाचे दोन तरुण मित्र होते. गावात त्यांना कोणताही कामधंदा नव्हता. आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे, त्याशिवाय लग्न करायचे नाही असे त्यांनी ठरवले.
ठरल्याप्रमाणे जिवबा आणि महादबा शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले. शहरात गेल्यावर काही दिवस त्यांनी घरगडी म्हणून काम केले. हळूहळू साठलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला. सुदैवाने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला. हातात पैसा खेळू लागला. बरेच सोने नाणे खरेदी केले. आता आपल्या गावी जाऊन लग्न करून सुखाने संसार करु, असा विचार करून दोघेही आपल्या गावी जायला निघाले. त्यावेळी वाहतुकीची साधने नसल्याने पायीच प्रवास करावा लागे.
मजल दरमजल करत भरपूर धनदौलत घेऊन ते प्रवासाला निघाले. एका नदीकिनारी आले. जेवून थोडी विश्रांती घ्यावी असे त्यांनी ठरवले. जिवबा हात पाय धुण्यासाठी नदीवर गेला. महादबाने जेवणाचे डबे उघडले. त्याचवेळी महादबाच्या मनात दुष्ट विचार आला, की जिवबा जर पाय घसरुन नदीत वाहून गेला तर...! त्याच्याजवळची संपत्तीही आपल्यालाच मिळेल. गावात आपल्याएवढा श्रीमंत कोणीच नसेल. तेवढ्यात जिवबा शांतपणे उपरण्याला हात पाय पुसत येत होता.
महादबाने ताबडतोब विषारी झाडपाला आणून तो जिवबाच्या जेवणात मिसळला. जेवण झाल्यावर जिवबाला कसेसेच होऊ लागले. थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला. महादबाने जिवबाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले. जिवबा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला. महादबाने त्याची धनाची थैली आपल्या गाठोड्यात लपवून तो पुढे निघाला. गावात पोहोचताच जोराने हंबरठा फोडून रडू लागला.
आपला मित्र जिवबा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून सांगू लागला. मलापण मरायचे आहे. मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू? असे खोटे खोटे रडू लागला. त्याचे रडण्याचे नाटक इतके बेमालूम होते, की कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही.
सर्व काही शांत झाल्यावर महादबाने मोठे घर बांधले. लग्न केले. गडीमाणसे दारात राबू लागली. पुढे तो सावकारी करू लागला. वर्ष लोटले. महादबाच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले. एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचे कोडकौतुक होऊ लागले. बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर एकाएकी आजारी पडले. डॉक्टर, वैद्य, हकीम त्याच्यावर इलाज करु लागले. पण बाळाचा आजार काही बरा होईना. महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारेना. कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला. पण आजार बरा होण्याचे चिन्ह काही दिसेना.
एका गावात फार मोठे सिद्धपुरुष आले. ते त्रिकाल ज्ञानी होते. त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून महादबा बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला. सिद्धपुरुषाला आपली व्यथा सांगितली. थोडा वेळ ध्यानस्थ होत ते म्हणाले, `आतापर्यंत मुद्दल वसूल झाली, परंतु व्याज अजून बाकी आहे. ते फिटले की बाळाला बरे वाटेल.' महादबा म्हणाला, `महाराज मी नाही समजलो.' सिद्धपुरुष म्हणाले, `महादबा, अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जिवलग मित्र जिवबा आहे. त्याला कपटाने मारून त्याची संपत्ती तू हडप केलीस, ती व्याजासह वसूल करायला तो आलाय. प्रारब्धाचे भोग आहेत हे!'
मनुष्य आज जे कर्म करेल ते संचित कर्म पुढे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येईल. त्यालाच कर्माचे फळ म्हणतात. चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे वाईट फळ भोगावेच लागते. म्हणून कशीही परिस्थिती असली, तरी चांगलीच कर्मे करावीत. कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते.