Tulsi Plant Tips: तुळशीच्या बाजूला चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; लक्ष्मी देवी होईल नाराज, बसेल मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:19 PM2022-04-09T15:19:11+5:302022-04-09T15:20:12+5:30
बहरलेली तुळस घराच्या भरभराटीचे लक्षण मानले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या...
आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाला धार्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. घरात तुळशीचे रोप ठेवणे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण केली जातात. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते.
तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. बहरलेली तुळस आपल्या दारात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. मात्र, घरातील तुळशीच्या बाजूला काही गोष्टी चुकूनही ठेवू नये, असे सांगितले जाते. अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी ओढावली जाऊ शकते. लक्ष्मी देवी घरातून निघून जाऊ शकते, असे म्हटले जाते. याचे मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असेही सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घेऊया...
तुळशीचे रोप चुकीच्या दिशेने ठेवल्याने फायदा होत नाही
तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. तुळशीचे रोप चुकीच्या दिशेने ठेवल्याने फायदा होत नाही. घरात तुळशीचे रोप लावणे पुरेसे नाही, तर त्याची रोज पूजा आणि सेवाही करावी. यासाठी रोज सकाळी आंघोळ करून तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा, असे सांगितले जाते. तसेच घरातील स्त्रीने तुळशीला जल अर्पण करताना केस कधीही मोकळे ठेवू नयेत. सुवासिनींनी नेहमी तुळशीला केस बांधून जल अर्पण करावे. शक्य असल्यास दुधात जलार्पण करावे.
अनेक समस्याही येऊ शकतात
तुळशीच्या आजूबाजूला केर, अस्वच्छ भांडी, पादत्राणे किंवा कचरा चुकूनही ठेवू नका. तसेच तुळशीच्या झाडावर घाण पाणी कधीही पडणार नाही, याचीही व्यवस्था करावी. अन्यथा तुम्हाला धनहानी सहन करावी लागू शकते. याशिवाय अनेक समस्याही येऊ शकतात, असे सांगितले जाते. तुळशीभोवती काटेरी झाडे लावू नका. अन्यथा घरात नकारात्मकता वाढू शकते. जेथे तुळशीचे रोप लावले असेल, त्या कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नये. तसेच तुळशीचे रोप टेरेसवर ठेवू नका. ते घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत ठेवावे. दिवेलागणीला तुळशीला सांजवात केल्यानंतर विझलेला दिवा काढायला विसरू नका, असा सल्ला दिला जातो. सदर माहिती गृहीतके आणि सामान्य मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते.