दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करू नका, जे आहे त्यात समाधानी राहा;  वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 08:00 AM2021-07-03T08:00:00+5:302021-07-03T08:00:06+5:30

दुसऱ्याच्या सुखाशी तुलना करू नका. सुखाच्या मागे दडलेले दु:खं आपल्याला दिसत नाही. आपण सुखाचे मोजमाप आणि तुलना करत दु:खी होत राहतो. म्हणून समाधानी राहायला शिका, तरच आनंदी राहाल.'

Do not compare yourself with the happiness of others, be content with what you have; Read this parable! | दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करू नका, जे आहे त्यात समाधानी राहा;  वाचा ही बोधकथा!

दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करू नका, जे आहे त्यात समाधानी राहा;  वाचा ही बोधकथा!

googlenewsNext

एक कावळा उडत उडत एका तळ्याकाठी जाऊन बसला. तिथे हंसांचा समुह बसला होता. कावळ्याला त्यांच्या पांढऱ्या शुभ्र रंगाची असुया वाटली. तो म्हणाला, देवाने आपल्या कसा काळा ठिक्कर बनवला आहे. माझ्यापेक्षा ते हंस कितीतरी पटीने सुंदर आहेत. ते नक्कीच आनंदी असतील. असे म्हणत कावळा हंसांजवळ गेला व त्यांचे कौतुक करू लागला.

कावळ्याचे बोलणे ऐकून हंस म्हणाला, मित्रा आपण समदु:खी आहोत रे, देवाने तुला काळा तर मला पांढरा रंग दिला, एवढाच काय तो फरक. पण तू पोपट पाहिला आहेस का? त्याला देवाने दोन रंग दिले आहेत, अंगावर पोपटी आणि गळ्याभोवती लाल. 

त्या दोघांचे बोलणे सुरू असताना पोपट तिथे आला. कावळा आणि हंस दोघे तोंडभरून त्याची स्तुती करू लागले. पोपट म्हणाला, दोन रंगाचे काय घेऊन बसलात, देवाने मोराला कितीतरी रंग दिले आहेत. म्हणून तर लोक त्याच्याकडे आकर्षित होतात, नाहीतर आपल्याला कोण एवढं विचारतंय...!

असे म्हणत तिघेही जण मोराला भेटायला गेले. एका पक्षी उद्यानात एका मोठ्या पिंजऱ्यात मोराला ठेवले होते. हे तिघे तिथे जाऊन मोराला पाहू लागले. त्याला बघायला येणारे लोक मोराबरोबर फोटो काढत होते. गर्दी थोडीशी पांगल्यावर हे तिघे मोराला भेटायला गेले आणि त्याच्या सौंदर्याचे गुणगान करू लागले. 

परंतु एवढे कौतुक करूनही मोराच्या चेहऱ्यावर उदासिनता होती. कावळ्याने मोराला त्यामागचे कारण विचारले. त्यावर मोर म्हणाला, `मित्रांनो, कधी कधी अति सौंदर्याची मोठी किंमत चुकवावी लागते. आता हेच बघा ना, तुम्ही तिघे पिंजऱ्याबाहेर मुक्त आहात आणि मी इथे कैद आहे. लोक मला बघायला येतात, पण मला काय बघायचे आहे, याचे स्वातंत्र्य त्यांनी मला दिलेच नाही. म्हणून देवाने तुम्हाला जे दिले आहे, त्यात समाधानी राहा. दुसऱ्याच्या सुखाशी तुलना करू नका. सुखाच्या मागे दडलेले दु:खं आपल्याला दिसत नाही. आपण सुखाचे मोजमाप आणि तुलना करत दु:खी होत राहतो. म्हणून समाधानी राहायला शिका, तरच आनंदी राहाल.'

Web Title: Do not compare yourself with the happiness of others, be content with what you have; Read this parable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.