कोणालाही कमी लेखू नका, अगदी भिकाऱ्यालाही नाही; वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:00 AM2021-08-16T08:00:00+5:302021-08-16T08:00:07+5:30
कधी कोणावर वेळ सांगून येत नाही. म्हणून शक्य तेवढी दुसऱ्यांना मदत करा, तरच तुमच्या गरजेच्या वेळी तुम्हालाही मदत मिळू शकेल.
एक गरीब होतकरू मुलगा कष्टात दिवस काढून आपले शिक्षण पूर्ण करतो. नोकरीसाठी शेकडो अर्ज केल्यावर एके ठिकाणी त्याला बोलावणे येते. दुसऱ्या शहरात मुलाखतीला जायचे होते. त्यासाठी मुलाकडे पुरेसे पैसे नव्हते. तो देवावर विश्वास ठेवून खिशात जेमतेम ५० रुपये घेऊन, नीटनेटके कपडे घालून मुलाखतीला जायला निघाला.
मुलाखतीला जाण्याआधी मंदिरात जावे, देवाचा आशीर्वाद घ्यावा, म्हणजे काही मार्ग मिळेल अशा विचाराने मुलगा मंदिरात गेला. देवाला सांगितले, `तूच काहीतरी मार्ग दाखव आणि काहीही करून मला आज मुलाखतीला पोहोचू दे.'
देवाला नमस्कार करून मुलगा निघाला. चपला पायात अडकवत तो मंदिराच्या पायरीवर बसला. तिथे एक भिकारी बसला होता. त्याच्या समोर बरेच पैसे, नोटा पडल्या होत्या. त्या पैशांकडे केविलवाण्या नजरेने बघत तो देवाकडे पाहू लागला. त्याचे भाव ओळखून भिकारी म्हणाला, `दादा, चिंतेत दिसता, तुम्हाला काही मदत करू शकतो का?'
मुलगा म्हणाला, `तुम्ही स्वत: भिक मागून जगताय, तुम्ही मला मदत काय करणार? मला मुलाखतीला जायचे आहे, खिशात फक्त पन्नास रुपये आहेत आणि तुमच्या पुढे....असो!'
यावर भिकारी म्हणाला, `दादा, हे पैसे तुम्ही घेऊन जा. मला एवढे पैसे लागणार नाहीत. मी रोज एकवेळ जेवतो आणि औषधपाणी सुरू आहे म्हणून भीक मागतो. एक दिवस नाही घेणार औषध, पण तुमचे काम झाले तर मला आनंदच होईल. तसेही मी रोज उरलेले पैसे दानपेटीत टाकतो. आज ते सत्कारणी लागले याचा आनंद होईल. हे सगळे पैसे घेऊन जा...!'
असे म्हणत भिकाऱ्याने मुलाला मोठ्या मनाने पैसे देऊन टाकले. मुलाने आभार मानले. तो मुलाखतीला गेला. त्याला नोकरी मिळाली. तो परतला. येताना त्याला भिकाऱ्याची आठवण झाली. त्याला ही आनंदाची बातमी सांगावी म्हणून तो मंदिरात गेला. तेव्हा एक शववाहिनी बेवारस मृतदेह घेऊन जात होती. थोडी चौकशी केल्यावर मुलाला कळले, की तो मृतदेह भिकाऱ्याचा होता, ज्याने सकाळी आपल्याला त्याच्या रोजच्या औषधाचे पैसे दिले आणि आज नेहमीचा डोस पोटात न गेल्याने तो मृत्यूमुखी पडला...
तरुणाचे डोळे पाणावले. लोक म्हणत होते, बरे झाले गेला, तसाही बिनकामाचा होता. पण एकमेव त्या तरुणाला माहित होते, की जाता जाता त्या भिकाऱ्याने मुलाचे आयुष्य सावरले होते.
कधी कोणावर वेळ सांगून येत नाही. म्हणून शक्य तेवढी दुसऱ्यांना मदत करा, तरच तुमच्या गरजेच्या वेळी तुम्हालाही मदत मिळू शकेल.