तुम्हालाही या कथेतल्या राजासारखे अमर व्हायचे आहे? मग त्याला आलेला अनुभव वाचाच...!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:01 PM2022-07-26T17:01:41+5:302022-07-26T17:06:07+5:30
मृत्यू ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते? वाचा ही मार्मिक गोष्ट!
मृत्यू येऊच नये असे प्रत्येकाला वाटते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला, तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव-दानवांमध्ये चढाओढ लागली होती, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा! मृत्यूचे भय वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, मृत्यू टाळणे अशक्य आहे. जन्म-मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे. तो कोणालाही चुकलेला नाही. तो आवश्यकही आहे. अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती. कशी? ते पहा.
एका राजाने शहराबाहेरील एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, `साधूमहाराज, मला अमर करू शकेल, अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?' साधू म्हणाला, `हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास, की तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील.'
ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. तो त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर वाकला, तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला,
'या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिाकणी पूर्ण दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही.'
त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, `छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, `ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्याजर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल.'
साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला.
तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, `आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेल तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू?' राजाने युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या युवकाला विचरले, तर तो म्हणाला, `अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडे तीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा.
साडे तिनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक पाहिले असता, तो म्हणला मी तरी संपत्ती कुठून देणार? `ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत.' यावर पणजोबा म्हणतात, `मी यांना संपत्ती देऊ केली, तर हे लोक माझा नटसम्राट मधला अप्पासाहेब बेलवलकर करून टाकतील.'
यावर राजा म्हणाला, `पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय?
यावर पणाजोबा म्हणाले, `आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाल इथे राहावे लागले.
तो प्रकार पाहून राजा म्हणाला, 'म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे.' राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, 'तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत. मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती.
म्हणून मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घ्या.