माता पार्वतीची सवत कोण माहीत आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 08:11 PM2020-12-09T20:11:15+5:302020-12-09T20:25:41+5:30
गंगा आणि पार्वती म्हणजे गौरी या दोघी हिमालय कन्या. या दोघींनी शंकराला पती म्हणून वरल्यामुळे त्या बहिणी असूनही सवती झाल्या.
आपल्या नद्यांच्या नामावलीत गंगेला अग्रस्थानाचा मान आहे. देवपूजेत कलशपूजनाच्या वेळी गंगे च यमुनेचैव गोदावरी सरस्वती यात गंगेचे नाव प्रथम घेतले जाते. मंगलाष्टकात नेहमी म्हटला जाणारा नद्यांच्या नावाचा जो श्लोक आहे, त्यातही गंगा सिंधु सरस्वती च यमुना असा गंगेचा उल्लेख प्रथम आहे. गंगेला पुण्यसलीला, मोक्षदायिनी अशी नावे आहेत. ही नावे तिचे महत्त्व सांगणारी आहेत. भगवंतांनी गीतेत सर्व नद्यांमध्ये आपण गंगा आहोत, असे म्हटले आहे.
हेही वाचा : दृष्ट लागण्याजोगे सारे...!
गंगेचे उल्लेख ऋग्वेदापासून सापडतात. भविष्यपुराण, आदित्यपुराण, स्वंâदपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण इ. पुराणात गंगेच्या पापहारक-पुण्यारक शक्तीबद्दल अनेक कथा अंतर्भूत आहेत. गंगा पतितांचा उद्धार करते. अशी श्रद्धा भारतवर्षात शतकानुशतके दृढपणे बाळगली जाते. गंगेमध्ये केलेले स्नान पुण्यकारक आहे. गंगेचे पूजन हेही पुण्यकारक आहे. गंगेचे पूजन करण्याचे विविध मार्ग आणि विविध प्रकार पुरातनकाळापासून रूढ आहेत. गंगेचे विविध मंत्र अस्तित्वात आहेत. गंगादशहऱ्याच्या दहा दिवसात अनेक ठिकाणी पंडितराज जगन्नाथाच्या गंगालहरीवर प्रवचने केली जातात.
प्रत्यक्ष शिवशंकराने गंगेला मस्तकी धारण केल्यामुळे गंगेचे महत्त्व वाढले आहे. हरद्वार, काशी, प्रयाग अशी अनेक क्षेत्रे गंगेच्या काठावर वसली आहेत. गंगेसारखे तीर्थ नाही आणि विष्णुसारखा देव नाही. न गंगासदृशं तीर्थ, न देव: केशवात् पर: असे महाभारताच्या वनपर्वात म्हटले आहे.
गंगा भगवान कृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यापासून निघाली. पृथ्वीवर अवतरताना तिने शंकराच्या जटेत उडी घेतली. अशा कथांमुळे शैव आणि वैष्णव अशा दोन्ही प्रमुख पंथांनी गंगेचे महात्म्य मान्य केले आहे.
गंगा आणि पार्वती म्हणजे गौरी या दोघी हिमालय कन्या. पार्वती हा शब्दच मूळात पर्वताची कन्या या नावाने रूढ झाला. तर गंगा ही हिमालयातून उगम पावते. या दोघींनी शंकराला पती म्हणून वरल्यामुळे त्या बहिणी असूनही सवती झाल्या. आपल्याकडे गंगा आणि पार्वती यांच्यातील सवतीची भांडणे सांगणारी अनेक लोकगीते प्रचलित आहेत. शंकराने गंगेला डोक्यावर बसवून घेतले असले, तरी शंकर आणि पार्वती यांच्याच भावमधुर प्रेमकथा अधिक रूढ आणि लोकप्रिय आहेत. गंगा शिवशंकराच्या डोक्यावर बसलेली असली, तरी धार्मिक आणि इतर वाङमयात तिला पार्वतीसारखे मानाचे आणि महत्त्वाचे स्थान नाही हेही खरे!
अर्थात हा सगळा भेदाभेद रुपक कथांमध्ये वाचायला, ऐकायला मिळतो. वास्तविक या दोन्हीही हिमालय कन्यकांनी सदैव आपले ब्रीद पाळले आहे. गंगेने तृषारुपेण संस्थिता म्हणत समस्त जीवमात्रांची तहान भागवली आणि शेवटच्या गंगोदकाने मोक्ष मिळवून दिला, तर माता पार्वतीने शक्तीरुपेण संस्थिता म्हणत चराचराला चैतन्य बहाल केले. आदर्श संसाराचा वस्तुपाठ घालून दिला. त्यामुळे दोघीही कायमस्वरूपी वंदनीयच असणार आहेत.
गंगा मैय्या की जय।
पार्वती मैय्या की जय।
देवाधिदेव महादेव की जय।
हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?