नवजात बालकाच्या मुठी बंद का असतात माहितीय का? जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 02:01 PM2021-10-16T14:01:19+5:302021-10-16T14:01:42+5:30

एकतर अशी ठिणगी शोधा किंवा दुसऱ्यांमधील ऊर्जा प्रज्वलित करणारी ठिणगी बना! एकदा का ही ठिणगी पेटली, की निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून केवळ विश्वकल्याण होईल.

Do you know why the fists of a newborn baby are closed? Find out ... | नवजात बालकाच्या मुठी बंद का असतात माहितीय का? जाणून घ्या... 

नवजात बालकाच्या मुठी बंद का असतात माहितीय का? जाणून घ्या... 

Next

महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे यांनी एकदा हा किस्सा सांगितला होता. त्यांना एका लहान मुलीने विचारलं, 'बाळाच्या मुठी बंद का असतात?' दवणे विचार करतात, आजवर कितीतरी नवजात शिशु पाहिले, पण आपल्याला हा प्रश्न कधी पडला नाही. मात्र या लहान मुलीच्या शंकेचं निरसन करायला हवं, म्हणून ते मुलीला म्हणाले, 'विचार करून सांगतो.' त्यांचे विचारचक्र सुरू झाले. त्यांना काय उत्तर सापडले, ते लेखाच्या पाहूच. त्याआधी या प्रश्नाशी निगडित आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी...

कागदात आग आहे का असे कोणी विचारले तर उत्तर नाही असे येईल. परंतु काडेपेटीच्या छोट्याशा काडीने कागदाला आग लावली तर कागद पेट घेईल, म्हणजे कागदातून आग येईल. याचाच अर्थ आग प्रत्येक वस्तूत आहे, त्यात ठिणगी पडणे महत्त्वाचे असते. मानवाच्या बाबतीत ही आग म्हणजे ऊर्जा आणि ती ठिणगी म्हणजे विश्वास असतो. 

एकदा एका लहान मुलाला शाळेतून चिट्ठी देऊन घरी पाठवले. मुलाने चिठ्ठी आईकडे दिली. आईने ती वाचली. मुलगा म्हणाला, 'आई काय लिहिले आहे त्यात?'
आई म्हणाली, 'बाळा तुझ्या शिक्षकांनी या चिठ्ठीत लिहिले आहे, की तुमच्या मुलाची बुद्धी अनन्यसाधारण आहे. त्याला आम्ही शिकवू शकणार नाही कारण त्याची प्रतिभा अफाट आहे.' 

आईच्या शब्दांनी मुलगा भारावला. शाळेत न जाता ही खूप अभ्यास करू लागला. तो मोठा वैज्ञानिक बनला. वृद्धापकाळाने आईचे निधन झाले, तेव्हा आईपश्चात तो घरी गेला. तिथे एका कपाटात त्याला चिठ्ठी सापडली, ज्यात लिहिले होते, 'तुमचा मुलगा अतिशय ढ आहे, त्याला शिकवून, समजावून आम्ही थकलो, म्हणून त्याला शाळेतून बेदखल करत आहोत, पुन्हा त्याला शाळेत पाठवू नका! हे वाचणारा तो वैज्ञानिक मुलगा होता थॉमस एडिसन! त्याचे डोळे पाणावले. त्याला आईची खूप आठवण आली. मनोमन आईचे त्याने आभार मानले, कारण आई हीच त्याच्यातली ऊर्जा प्रज्वलित करणारी ठिणगी होती!

अशी ऊर्जा प्रत्येकात आहे. गरज असते ती ऊर्जा चेतवणाऱ्या ठिणगीची. त्यामुळे एकतर अशी ठिणगी शोधा किंवा दुसऱ्यांमधील ऊर्जा प्रज्वलित करणारी ठिणगी बना! एकदा का ही ठिणगी पेटली, की निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून केवळ विश्वकल्याण होईल. हीच ताकद भगवंताने प्रत्येकाच्या बंद मुठीत दिलेली आहे. हे ओळखून दवणे यांना उत्तर सापडले, की 'या बंद मुठीतून भगवंताने प्रत्येकाला प्रतिभा दिली आहे. योग्य ठिणगी पडताच ती प्रतिभा उजळून निघते. वाढत्या वयानुसार, समज आल्यावर अनेकांना बंद मुठीत दडलेले ऐश्वर्य गवसते, तर अनेकांची मूठ शेवट्पर्यंत झाकलेली राहते. म्हणून स्वतःची मूठ उगडून पहा आणि देवाने आपल्याला काय वैशिष्ट्य दिले आहे याचा शोध घ्या...!

Web Title: Do you know why the fists of a newborn baby are closed? Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.