व्यक्तीच्या मृत्यूपश्चात लावलेला दिवा तिचे पुनर्जन्माचे संकेत दर्शवतो का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 03:05 PM2022-03-19T15:05:54+5:302022-03-19T15:06:49+5:30
मृत्यपश्चात दहा दिवस दिवा लावतात हे आपण जाणतो परंतु त्या क्रियेशी संबंधित समजुतींबद्दलही सविस्तर माहिती घेऊया.
जगामध्ये हिंदू हा एकमेव असा धर्म आहे, की ज्यामध्ये पुनर्जन्मसिद्धांत व परलोकविद्या या दोन्हींची परिपूर्णता दिसून येते. याच कारणास्तव गर्भप्रविष्ट आत्म्याचे जन्म होण्यापूर्वीच विविध संस्कारांनी स्वागत केले जाते. तर, त्याचे निर्गमन होताच अंत्येष्टीच्या रूपाने तितक्याच सन्मानाने निरोप दिला जातो.
प्राणोत्क्रमणानंतर अर्थात मृत्यूनंतर शवाला ओवाळण्यात येणाऱ्या पणतीच्या ज्योतीमध्ये गतव्यक्तीचा चैतन्यमय आत्मा संक्रमित होतो अशी संकल्पना आहे. ज्याप्रमाणे नैमित्तिक पूजेध्ये ताम्हनातील तांदुळाच्या ढिागावर देवतांना स्थान दिले जाते, त्याप्रमाणे धान्याच्या गोलाकार पिठावर ही पणती दहा दिवस ठेवतात. दिव्याशेजारी पहिल्या दिवशी जलपात्र व दुसऱ्या दिवसापासून जलपात्राबरोबरच भोजनाच्यावेळी भाताचा पिंड वा दुधाची वाटीदेखील ठेवली जाते.
ही एकप्रकारे मृतात्म्याला प्रवासासाठी दिलेली शिदोरी असते. दहा दिवसांपर्यंत केल्या जाणाऱ्या अवयव श्राद्धांनी लिंगदेहाची परिपूर्ती होते. दहाव्या दिवशी उपरोक्त दिवा नदीवर क्रियाकर्माच्या ठिकाणी नेऊन तेथे विसर्जन केला जातो. त्यामुळे नऊ दिवसामध्ये पूर्णत्वास आलेला लिंगदेह चैतन्यमय होऊन प्रेतातम्याचा पुढील परलोकप्रवास सुरू होतो, अशी संकल्पना आहे.
दिवा लावण्यामागे उपरोक्त मूळ संकल्पना असून याविषयी समाजामध्ये काही समजुती प्रचलित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दहाव्या दिवशी दिवा उचलल्यावर त्याखाली उमटलेल्या ठशावरून तो आत्मा कोणत्या योनीत जन्मास गेला, हे ठरवले जाते. ही समजूत योग्य नाही. कारण पणतीखाली पिठावर उमटलेली आकृती पणतीच्या खडबडीत तळामुळे तयार झालेली असते. त्या आकृतीत परलोकाशी वा पुनर्जन्माशी काही संबंध नसतो.
परठिकाणी निधन पडल्यास वा अपरिहार्य कारणास्तव दहा दिवसांऐवजी एक दिवसच दिवा ठेवावा लागला, तरी हरकत नाही. दहा दिवसांच्या काळात दिवा चुकून विझला, तरी पुन्हा प्रज्वलित करावा. त्यात कोणताही दोष वा अपशकुन नसतो.