स्वभावाला औषध असते का? हो नक्कीच असते, फक्त ते वेळेवर घ्यावे लागते!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:21 PM2021-07-13T15:21:57+5:302021-07-13T15:22:16+5:30

आपणही मनाला मुरड घालून समोरच्याचे केवळ दोष न पाहता त्याची चांगली बाजू पाहण्याची तयारी ठेवली, तर स्वभावात बदल नक्कीच होतील.

Does nature have medicine? Yes, of course, just take it on time! | स्वभावाला औषध असते का? हो नक्कीच असते, फक्त ते वेळेवर घ्यावे लागते!

स्वभावाला औषध असते का? हो नक्कीच असते, फक्त ते वेळेवर घ्यावे लागते!

googlenewsNext

परिस्थितीनुसार लोकांच्या वागणुकीत बदल होतो, पण स्वभावातला बदल क्वचितच बघायला मिळतो. स्वभावाला औषध नाही असे म्हणतात, पण एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक बदलण्याचा प्रयत्न केला, तर असाध्य काहीच राहत नाही.

एक राजा होता. तो खूप चांगला होता. फक्त त्याचा दोष एवढाच की तो शीघ्रकोपी होता. लोक त्याला रागाला घाबरून राहत असत. चूक छोटी असो वा मोठी, राजाकडे शिक्षा एकच होती, अपराध्याला पाळीव दहा रानटी कुत्र्यांच्या तोंडी देणे. या एका दोषामुळे प्रजेच्या मनात त्याच्याबद्दल आदर असला, तरी त्याच्या रागाची भीतीसुद्धा होती. 

राजाचा विश्वासू मंत्रीसुद्धा डोक्यावर तलवार ठेवल्यासारखे भीत भीत चाकरी करत असे. एक दिवस या मंत्र्याच्या हातून छोटीशी चूक झाली. शिघ्रकोपी राजाने मंत्र्याला कुत्र्यांच्या तोंडी देण्याचे फर्मान काढले. मंत्री गयावया करू लागला. म्हणाला, `राजेसाहेब एवढी वर्षे आपल्याकडे इमाने इतबारे चाकरी करत आहे, म्हणून तरी दया करा.'

राजा म्हणाला, `जो नियम सगळ्यांना तो तुलासुद्धा!'
मंत्र्याला काही सुचेना, तो म्हणाला, `ठीक आहे राजा, मला दहा दिवसांची मुदत द्या, मग मी आपणहून ही शिक्षा भोगायला जाईन.'
राजाने मुभा दिली. मंत्री दहा दिवस कुठे गेला कोणालाही पत्ता लागेना. तो न सांगता गायब झाल्याने राजा आणखनीच रागवला. त्याला शोधण्याचा फतवा काढणार, तोच अकराव्या दिवशी मंत्री हजर झाला आणि शिक्षा भोगायला गेला. राजासुद्धा त्याच्या पाठोपाठ गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय आश्चर्य? ते रानटी कुत्रे मंत्र्यावर धावून यायचे सोडून त्याच्या पायाशी घुटमळू लागले. राजाला आश्चर्य वाटले. त्याने या बदलाचे कारण विचारले.

मंत्री म्हणाला, `राजा, मी दहा दिवस या कुत्र्यांची मनापासून सेवा केली. त्यांना माझा लळा लागला आता ते मला मारणार नाहीत. परंतु इतकी वर्षे तुमची चाकरी करूनही केवळ रागाच्या भरात येऊन तुम्ही माझे सगळे चांगले कार्य विसरलात आणि मला कुत्र्यांच्या तावडीत दिले. हे ऐकून राजा वरमला आणि त्याने ही शिक्षा कायमची रद्द केली. 

अशा प्रकारे आपणही मनाला मुरड घालून समोरच्याचे केवळ दोष न पाहता त्याची चांगली बाजू पाहण्याची तयारी ठेवली, तर स्वभावात बदल नक्कीच होतील. म्हणून तर म्हणतात ना, `स्वभावाला औषध असते, फक्त ते वेळोवेळी घेतले पाहिजे.

Web Title: Does nature have medicine? Yes, of course, just take it on time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.