आपल्या नावाचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर खरंच प्रभाव पडतो का? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 05:18 PM2021-11-30T17:18:11+5:302021-11-30T17:18:31+5:30

नावात काय ठेवले आहे, असे शेक्सपिअर म्हणतो, परंतु नावावरूनच पुढे ओळख बनते आणि नाम कमावले की नामाची दिगंत किर्ती पसरते. म्हणून पाळण्यातल्या बाळाचे नाव ठेवताना फार विचारपूर्वक ठेवायचे असते.

Does Your Name Really Affect Your Personality? Read this story! | आपल्या नावाचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर खरंच प्रभाव पडतो का? वाचा ही गोष्ट!

आपल्या नावाचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर खरंच प्रभाव पडतो का? वाचा ही गोष्ट!

googlenewsNext

नाव ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे, तसा नाव ठेवणे हा एक सोहळादेखील आहे. नाव ठेवण्याचा एक प्रकार आयुष्यभर सुरूच राहतो, तर नाव ठेवण्याचा दुसरा प्रकार आयुष्यभराची ओळख मिळवून देतो. कोऽऽहम, कोऽऽहम म्हणजे मी कोण, मी कोण असे विचारणाऱ्या बाळाला नाव ठेवले, की त्याचे रडणे थांबते. सोहम अशी त्याची ओळख पटते. या नामविधीला अतिशय महत्त्व असते. बाळ जन्माला आल्यापासून त्याचे नाव काय ठेवायचे, यावर घरात मोठी चर्चा सुरू असते. कधी ते राशीवरून ठेवले जाते, तर कधी रूपावरून, कधी आवडीवरून तर कधी पूर्वजांच्या आठवणीवरून. 

नावात काय ठेवले आहे, असे शेक्सपिअर म्हणतो, परंतु नावावरूनच पुढे ओळख बनते आणि नाम कमावले की नामाची दिगंत किर्ती पसरते. म्हणून पाळण्यातल्या बाळाचे नाव ठेवताना फार विचारपूर्वक ठेवायचे असते. अलीकडचे आई बाबा मॉडर्न नावांवर भर देतात, नावांची पुस्तक धुंडाळतात, पोथ्या-पुराणांतून `युनिक' नाव शोधून काढतात, थोडक्यात बरीच खटपट करतात.

पूर्वी तसे नव्हते. मुलांची नावे सरसकट ठेवली जात असे. त्यातही देवादिकांच्या नावावर जास्त भर असे. मुलांना हाक मारताना देवाचे नाव घेतले जावे, हा त्यामागचा हेतू असे. मात्र, अनेकदा बाळंतपणात, रोगराईत मुले जन्मत:च दगावत असत. मग जे मूल जिवंत राहत असे, त्याचे नाव दगडू, धोंडू असे ठेवले जात असे. 

अशाच एका धनिकाचा एक मुलगा होता. त्याचे नाव ठेवले होते ठणठणपाळ. अशा निरर्थक नावाचे ओझे त्याने ऐन तारुण्यातही पेलले. मात्र, बायको आली आणि ती त्याला नाव बदलून घेण्यावर रोज बोल सुनावू लागली. कंटाळलेला ठणठणपाळ घर सोडून निघून गेला. 

गावाची वेस ओलांडली. एका वडाच्या पारावर जाऊन बसला. तिथे एक फकीर आले आणि त्यांनी ठणठणपाळला त्याच्या दु:खाचे कारण विचारले. त्याने आपले दु:ख प्रगट केले. फकिर हसले, म्हणाले, नावाचे काय घेऊन बसलास? माणूस नावाने नाही, तर कामाने ओळखला गेला पाहिजे. तू चांगले काम केलेस तर लोक तुला ठणठणपाळ शेठ म्हणून ओळखतील. बायकोलाही तुझ्या कर्तृत्त्वाचा हेवा वाटेल. फकिरांचे बोलणे त्याला काही रुचले नाही. तो नाव बदल करण्यावर अडून राहिला. फकिराने त्याला सांगितले, `तुला काय वाटते, ज्यांचे नाव चांगले, त्यांचे कामही चांगलेच असते का? तुझ्याच गावात जाऊन जरा शोध घे, म्हणजे वस्तुस्थिती आणि विरोधाभास कळेल.'

फकिरांचे बोलणे ऐकून ठणठणपाळ निघाला. एक मावशी गोवऱ्या वेचत होती. तिचे नाव विचारले, तर ती म्हणाली, लक्ष्मी! एक भिकारी मंदिराबाहेर कटोरा घेऊन येणा-जाणाऱ्याला अडवत होता. त्याला नाव विचारले, तर तो म्हणाला- धनपाल! काही पावले पुढे गेल्यावर एक अंत्ययात्रा जात होती. गर्दीतल्या एकाकडे चौकशी केली, गेलेल्या व्यक्तीचे नाव विचारले, तर ते होते अमरसिंह! ठणठणपाळने कपाळाला हात लावला. फकिराजवळ येऊन म्हणाला, `तुम्ही म्हणालात, ते मला पटले आहे. माझे नाव चांगले नसले, तरी मी काम चांगले कमवेन.'

अशाप्रकारे ठणठणपाळचे पुन्हा बारसे झाले नाही, पण त्याने आपल्या कर्तृत्त्वाने ओळख मिळवली. मात्र, आपल्याकडे बाळाचे चांगले नाव ठेवण्याची संधी असेल, तर ते विचारपूर्वकच ठेवले पाहिजे. निरर्थक नाव ठेवण्यापेक्षा पराक्रमी, सद्गुणी, अवतारी व्यक्तीचे नाव ठेवले, तर ते नाव ज्याला ठेवले जाते, तोही ते नाव आणि नावाला साजेसे कर्तृत्त्व अभिमानाने मिरवू शकेल.

याबाबतीत विठ्ठलपंत कुलकर्णी यांचे कौतुक केले पाहिजे. कोण विठ्ठलपंत? तेच आळंदीचे. ज्यांच्या पोटी चार दिव्य रत्न जन्माला आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई! या नावांचा पारमार्थिक अर्थ असा, की अध्यात्ममार्गात विषयातून निवृत्ती घेतल्याशिवाय ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान मिळाल्याशिवाय अध्यात्माचा सोपान म्हणजे मार्ग सुलभ होत नाही. या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या तरच मुक्तता मिळते. 

आहे की नाही, नावाची करामत मोठी?

Web Title: Does Your Name Really Affect Your Personality? Read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.