आनंदाचे डोही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:24 AM2020-09-03T04:24:30+5:302020-09-03T04:24:53+5:30
तैत्तिरीय उपनिषदात आनंदाच्या वर्णनात ब्रह्मानंदाचे मोजमाप सांगितले आहे. समजा, उत्तम आरोग्य, उत्तम अध्ययन, उत्तम सामर्थ्य आहे अशा सुंदर तरु णाला पृथ्वीचे राज्य मिळाले, तो पृथ्वीपती झाला, तर जो आनंद होईल, त्याला मानुषी आनंद म्हणतात.
- शैलजा शेवडे
‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे...’ हा तुकाराम महाराजांचा अभंग वाचताना मनात खरोखर आनंद निर्माण होतो. त्यांना ही अनुभूती आली, त्यांचे मन, शरीर आनंदाचा डोह तयार झाला. त्यातून आनंदाचेच तरंग निर्माण झाले. हा आनंद परमानंद असतो. ब्रह्मानंद असतो. हा विलक्षण आनंद ब्रह्मीभूत झालेल्या व्यक्तींनाच मिळू शकतो.
तैत्तिरीय उपनिषदात आनंदाच्या वर्णनात ब्रह्मानंदाचे मोजमाप सांगितले आहे. समजा, उत्तम आरोग्य, उत्तम अध्ययन, उत्तम सामर्थ्य आहे अशा सुंदर तरु णाला पृथ्वीचे राज्य मिळाले, तो पृथ्वीपती झाला, तर जो आनंद होईल, त्याला मानुषी आनंद म्हणतात. असे शंभर मानुषी आनंद एक केले, तर मनुष्य गंधर्वाचा आनंद. कामावर विजय मिळवलेल्या विद्वान व्यक्तीला हा आनंद मिळतो. मनुष्य गंधर्वाचे शंभर आनंद एक केले, तर श्रेष्ठ गंधर्वाचा आनंद. देव गंधर्वाचा एक आनंद ! श्रेष्ठ गंधर्वाचे शंभर आनंद म्हणजे पुत्रजन्माचा आनंद, पुत्रजन्माचे शंभर आनंद म्हणजे कनिष्ठ देवतांचा एक आनंद, कनिष्ठ देवतांचे शंभर आनंद म्हणजे देवांचा एक आनंद. देवांचे शंभर आनंद म्हणजे इंद्राचा एक आनंद, इंद्राचा एक आनंद म्हणजे गुरु चा एक आनंद. गुरु चे शंभर आनंद म्हणजे प्रजापतीचा एक आनंद. प्रजापतीचा एक आनंद म्हणजे ब्रह्मानंद. ईश्वर दर्शनाचा आनंद.
निष्काम कर्म करत वर जाता जाता कर्मयोग्याला हा आनंद मिळत जातो. शेवटी ईश्वर दर्शन होते. अद्वैत जाणवते. तो संपूर्ण आनंदमय बनतो. हा साक्षात्कार होतो, तेव्हा कसलेही भय उरत नाही. केवळ आनंदच आनंद ! जे आपल्यात आणि सर्व प्राण्यांमध्ये चैतन्य आहे, तेच सूर्यामध्येही आहे. जीव आणि सूर्यासारखे प्रचंड तारे यात एकच परमतत्त्व वास करत आहे.
हे जो जाणतो, तो अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश ओलांडून आनंदमय कोशापर्यंत जातो, पलीकडे जातो, ब्रह्मात मिसळतो. आत्मज्ञानी परमतत्त्व अनुभवू शकतो.