जुने वस्त्र दान करताय? हरकत नाही; वस्त्रदान करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 06:11 PM2021-03-19T18:11:06+5:302021-03-19T18:11:37+5:30
नवीन कपडे घेताना जुने परंतु न फाटलेले कपडे वेळीच गरजू लोकांना दान केले, तर तुमची आणि त्यांची गरज नक्कीच पूर्ण होऊ शकेल.
दानाचे महत्त्व आपण सगळेच जण जाणतो. परंतु कधी परिस्थिती अभावी, तर कधी वेळेअभावी आपल्याकडून दान दिले जात नाही. दान देण्यासाठी आर्थिक श्रीमंती बरोबर मनाची श्रीमंती सुद्धा असावी लागते. दातृत्त्वाचा गुण अंगी असावा लागतो. दानाचे अनेक प्रकार आहेत. पैकी आपल्या सर्वांना सहज साध्य असलेला प्रकार म्हणजे वस्त्रदान!
आता काही पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत, की वर्षातून एकदा कपड्यांची खरेदी करावी. आता सण वाराची वाट न पाहता वरचेवर कपड्यांची खरेदी सुरू असते. अशा वेळी नवीन कपडे घेताना जुने परंतु न फाटलेले कपडे वेळीच गरजू लोकांना दान केले, तर तुमची आणि त्यांची गरज नक्कीच पूर्ण होऊ शकेल. नवे कोरे, न वापरलेले कपडे देणार असाल तर त्यालाही आपण काही निर्बंध लावून घेतले पाहिजे.
कपड्यांना द्या नवे रूप : थोडे फार फाटलेले कपडे फेकून देण्यापेक्षा रफ़ू करून गरजू लोकांना दान करा. आजच्या काळात अनेक कलाकार आहेत, जे जुन्या फाटलेल्या कपड्यांचे रूप पालटून त्याला नवीन साज देतात. कापडी पिशवी, गोधडी, ओढणी, पायपुसणी, चादर, पडदे असे नानाविध प्रकार जुन्या कपड्यांपासून शिवता येतात.
कपडे नेहमी धुवून द्या: कपडे देण्याआधी ते नेहमी धुवून नीट घडी करून मगच दान करा. कपड्यांमुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ नये, यासाठी कपडे धुवून वाळवून मगच दुसऱ्यांना दिले पाहिजेत.
ऋतूनुसार कपडे द्या : उन्हाळ्यात सुती कपडे, पावसाळ्यात छत्री, रेनकोट किंवा उबदार चादरी, हिवाळ्यात स्वेटर, शाली, गोधड्या, सोलापुरी चादरी यांचे दान केले पाहिजे. अन्यथा ऋतुमानानुसार कपडे नसतील तर त्या दानाचा काहीच उपयोग नाही.
सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी : अनेकदा आपल्याला दान करण्याची इच्छा असते. परंतु दान नेमके कोणाला करावे, हे उमगत नाही. किंवा आपल्या संपर्कात तसे लोक नसतात. अशा वेळी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी आणि ज्या संस्था मनापासून काम करत आहेत, त्यांना मदत करून खारीचा वाटा उचलावा.