उद्या कुष्मांड नवमीला करा कोहळ्याचे दान; मिळेल भगवान विष्णूंचे वरदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:46 PM2021-11-11T16:46:30+5:302021-11-11T16:47:00+5:30
या दिवशी गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न आणि मौल्यवान रत्नांसह तो दान द्यावा असा विधी सांगितलेला आहे.
कार्तिक शुक्ल नवमीला 'कुष्मांड नवमी' म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच या तिथीला कोहळ्याचे दान करण्याला महत्त्व आहे. १२ नोव्हेंबर रोजी कुष्मांड नवमी आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या व्रताविषयी!
या दिवशी गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न आणि मौल्यवान रत्नांसह तो दान द्यावा असा विधी सांगितलेला आहे. सद्यस्थितीत पंचरत्ने दान करणे शक्य नसले, तरी कोहळा दान करणे सहज शक्य आहे. तूपात बुडवून कोहळा देण्याऐवजी तूप आणि कोहळा असे दोन्ही जिन्नस वेगवेगळे देणे अधिक योग्य ठरेल. कोहळेपाक किंवा पेठासुद्धा भेट म्हणून देता येईल. हे दान देताना जो मंत्र म्हणतात, त्याचा अथर असा आहे, 'हे विष्णो, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला आणि अनेक बियांनी युक्त असलेला कोहळा मी तुला अर्पण करत आहे.' या भावनेनेच हा कोहळा दान करावा.
या व्रताशी निगडित अशी कथा स्कंदपुराणात सांगितली आहे-
द्वापर युगात सर्वांना त्रस्त करणाऱ्या कुष्मांड दैत्याचा या कार्तिक नवमीला भगवान विष्णूंनी वध केला होता. त्यावेळी कुष्मांड दैत्याच्या शरीरातून अनेक वेली उत्पन्न झाल्या. त्यांना फळे लगडलेली होती. ते कोहळे होते. हे कोहळे भगवान विष्णूंना विशेषत्वाने प्रिय झाले. म्हणून या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करावी मग कोहळ्याचे दान द्यावे.
कोहळ्याला सजीव प्राण्याच्या शिराचे प्रतीक मानतात त्यामुळे महाराष्ट्रात स्त्रिया कोहळा कापत वा चिरत नाहीत, तर पुरुषमंडळींकडून पहिला घाव घालून घेतात. यज्ञातही पशूबळीऐवजी कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळा हा पित्तशामक व बलवर्धक आहे. हे गुणधर्म लक्षात घेऊन त्याचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच भोजनातही वापर व्हावा यादृष्टीने त्याचा समावेश या व्रतात केला गेला असावा.