अर्धा किलो कणिक दान करून, शेठजींनी केली आठ पिढ्यांची सोय; वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 08:00 AM2021-04-21T08:00:00+5:302021-04-21T08:00:07+5:30
भविष्याची काळजी सोडा, आजचा क्षण भरभरून जगा.
अर्धा किलो कणिक दान करून, शेठजींनी केली आठ पिढ्यांची सोय; वाचा ही गोष्ट!एक शेठजी, जे पिढीजात गर्भश्रीमंत होते. हाताखाली नोकर चाकर काम करत होते. शेठजींना कसली काळजी नव्हती. सगळे काही सुरळीत सुरू होते. एक दिवस शेठजींनी आपल्या लेखापालाला बोलावून घेतले आणि आपल्या संपत्तीची मोजदाद करायला सांगितली. सगळे व्यवहार कागदोपत्री लिहून लेखापालाने शेठजींना हिशोब देत म्हटले, `शेठजी तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे, की तुमच्या पुढच्या सात पिढ्या घरी बसून आरामात खातील. तुम्ही निश्चिंत राहा.' एवढे बोलून लेखापाल गेला. शेठजींना काळजी लागली, आठव्या पिढीची!
शेठजी विचार करू लागले, सात पिढ्या मला दुवा देतील, पण आठवी पिढी माझ्या नावाने शंख करेल त्याचे काय? काहीतरी उपाय केला पाहिजे. शेठजी दिवसरात्र अस्वस्थ राहू लागले. एक दिवस ते जवळच्या एका मंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांना फार शांत वाटले. परंतु, कीर्तन संपताच मनातल्या काळजीने डोके वर काढले. शेठजींनी महाराजांना प्रश्न विचारला आणि समस्येचे समाधान विचारले.
महाराज म्हणाले, `सोपा उपाय सांगतो. आपल्या गावात एक भाग गरीब वस्तीने व्यापलेला आहे. तिथल्या झोपड्यांमध्ये सर्वात शेवटची झोपडी आहे, तिथे एक आजी राहते. तिला तू अर्धा किलो कणीक दान कर. तुझे सगळे प्रश्न सुटतील.'
शेठजी आनंदात निघाले. अर्धा किलो काय, तर एक क्विंटल कणिक त्यांनी नोकराकडून मागवून घेतली आणि ते दोघे आजीच्या घरी पोहोचले. शेठजींनी आजीला म्हणाले, `आजी मी तुम्हाला एक क्विंटल कणीक दान करायला आलो आहे. तुमच्या महिनाभराचा पोळ्यांचा प्रश्न सुटेल. याचा स्वीकार करा.'
आजी नको म्हणाल्या. शेठजी म्हणाले, `माझे मन मोडू नका. एक नाही तर अर्धा क्विंटल कणीक घ्या.' त्यावरही आजीने नकारार्थी मान फिरवली. शेठजींनी पुन्हा आग्रहक केला, `किमान एक किलो नाहीतर अर्धा किलो तरी कणीच घ्याच!' आजींनी हात जोडून सांगितले, `शेठजी माझे आजचे जेवण झाले आहे. माझ्या आजच्या जेवणाची सोय भगवंताने लावून दिली आहे. उद्याची काळजी करायला तो समर्थ आहे. मला या मोहात अडकायचे नाही. तो काय करायचे ते बघून घेईल. तुम्ही हे दान दुसऱ्या कोणा गरजवंताला द्या!'
शेठजींना कळले, की महाराजांनी या स्वाभीमानी आजीकडेच मला का पाठवले, तर माझ्या डोळ्यात अंजन पडावे म्हणून! शेठजींनी आजीला नमस्कार केला. त्यांची सगळी चिंताच मिटली. ते यथाशक्ती दान धर्म करू लागले आणि त्यातून त्यांच्या आठ पिढ्याच काय, तर सगळ्या पिढ्यांना भरभरून आशीर्वाद मिळाला!'
म्हणून भविष्याची काळजी सोडा, आजचा क्षण भरभरून जगा. आपली काळजी घ्यायला भगवंत आहे.