देवाकडे काहीही मागू नका, तो नेहमीच आपल्या ऐपतीपेक्षा जास्त देतो; वाचा ही बोधकथा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 03:37 PM2021-02-05T15:37:59+5:302021-02-05T15:39:25+5:30
पली मागायची देखील कुवत नसते, एवढे दान भगवंत आपल्या झोळीत टाकत असतो. हे लाखमोलाचे दान म्हणजे मनुष्य जन्म!
देवाने आपल्याला बरेच काही देऊन पाठवले आहे. तरीदेखील आपली मागण्याची वृत्ती काही केल्या सुटत नाही. जे आहे, त्यात आपण समाधान मानत नाही. जे नाही, त्याबद्दल सतत रडत असतो आणि देवाला दोष देत राहतो. परंतु, विश्वास ठेवा, आपली जेवढी ऐपत नसते, त्याहीपेक्षा जास्त मिळवून देण्याची व्यवस्था भगवंताने करून ठेवलेली असते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाकडे कुरबुरी न करता, प्रामाणिकपणे काम करत राहा, योग्य वेळी योग्य फळ देव देतोच!
एका खेडेगावात एक चित्रकार होता. व्यक्तीचित्रे काढण्यात त्याचा हातखंडा होता. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याच्यात ही कला आली होती. जणू काही दैवी प्रसादच. ही कलाच त्याच्या उत्पन्नाचे साधन होती. परंतु गावपातळीवर उत्पन्न असे किती मिळणार? यात्रेच्या वेळी चार पैसे अधिक मिळत, त्याहून जास्त आवक नाहीच. कोणीतरी त्याला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. मुंबई स्वप्ननगरी, सर्वांचे स्वप्न पूर्ण करते, हे तोदेखील ऐकून होता. पण राहणार, खाणार, झोपणार कुठे हा प्रश्न होताच.
दैवावर भार टाकून तो चित्रकलेच्या तुटपुंज्या साहित्यासह मुंबापुरीत पोहोचला. इथल्या गर्दीने भांबावून गेला. पोटात भूकेचा आगडोंब उसळला होता, परंतु तो स्वाभीमानी असल्याने कोणासमोरही त्याने हात पसरले नाहीत. उपाशी पोटी एक दोन दिवस गेले. रात्री रस्त्याच्या फूटपाथवर झोपले असता पोलिसांचे दांडुके पडत असत. ही मुंबापुरी जगू देईना आणि मरूही देईना, अशी स्थिती निर्माण झाल्यावर त्याने परतीचा मार्ग धरायचा असे ठरवले. एका पोलिस दादांना त्याची दया आली. त्याची विचारपूस केली. तो चित्रकार असल्याचे लक्षात येता, त्यांनी मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसून चित्रकला सुरू कर असा सल्ला दिला.
दिवसभर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत, उंच इमारती, प्रशस्त रस्ते, वेगवान वाहतूक आणि लोकांची वर्दळ पाहता आपला निभाव लागेल का, अशा विचारात सायंकाळी त्याने झोळीतून साहित्य बाहेर काढले. कागदावर उभ्या आडव्या रेघांनी जादू दाखवायला सुरुवात केली. कट्ट्यावर एकमेकांत गुंग झालेली जोडपी त्याच्या कागदावर कैद झाली. मोठे धैर्य करून त्याने आपण काढलेली चित्रे संबंधित लोकांना दाखवायला सुरुवात केली. कोणी नाराजी, तर कोणी कुतुहल व्यक्त केले. कोणी शाबासकी देत शंभर, पाचशेची नोट हातावर टेकवत प्रोत्साहन दिले.
चित्रकाराची भीड चेपली. तो निर्भयपणे चित्रे काढू लागला. त्याच्याभोवती लोकांची गर्दी जमू लागली. लोक आपले चित्र काढण्यासाठी त्याला विनवू लागले, हवी ती किंमत देऊ लागले. पाहता पाहता, तो वृत्तपत्रात, टीव्ही चॅनेलला झळकू लागला. कल्पनाही केली नव्हती तेवढी प्रसिद्धी मिळू लागली. लक्ष्मीचा ओघदेखील सुरू होता.
वास्तविक, एवढ्यावर त्याने समाधान मानायला हवे होते. मात्र, त्याला छोट्या कामांचा कंटाळा येऊ लागला आणि तो मोठ्या कामाच्या प्रतीक्षेत हातात घबाड लागेल, या प्रतिक्षेत होता.
त्याची बातमी वाचून एक श्रीमंत बाई आपले चित्र काढून घेण्यासाठी तिथे आली. चित्रकार खुष झाला. कारण, तो अशाच संधीची वाट पाहत होता. त्याने मन लावून त्या श्रीमंत बाईचे हुबेहुब चित्र काढले आणि तिला सुपुर्द केले. श्रीमंत बाई खूप खुष झाली. 'या चित्राची किती किंमत देऊ सांग?' असे म्हणत तिने चित्रकारासमोर प्रस्ताव टाकला.
चित्रकार गोंधळला, किती मागावेत? जास्त मागितले तर हाव दिसेल, कमी मागितले तर नुकसान होईल, नाही मागितले, तर आलेली संधी निसटून जाईल. म्हणून अगदीच कमी नाही आणि जास्तही नाही, म्हणत पंचवीस हजार रुपयांची मागणी केली. श्रीमंत बाईने काही न बोलता एक बंद लिफाफा त्याच्या हाती सोपवून निघून गेली. त्याने तो लिफाफा उघडून पाहिला, तर त्यात सही केलेला पाच लाख रुपयांचा चेक होता.
कुठे पंचवीस हजार आणि कुठे पाच लाख? म्हणजेच आपली मागायची देखील कुवत नसते, एवढे दान भगवंत आपल्या झोळीत टाकत असतो. हे लाखमोलाचे दान म्हणजे मनुष्य जन्म! आणखी काही मागणे न मागता मिळालेले दान सत्कारणी लावुया.