अपयशाने खचून जाऊ नका, कारण तीच यशाची पहिली पायरी असते; वाचा ही मार्मिक कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:53 PM2023-03-02T13:53:33+5:302023-03-02T13:54:44+5:30

यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत, त्यामागे असलेले कारण या गोष्टीतून जाणून घेऊ!

Don't be discouraged by failure, because it is the first step to success; Read this poignant story! | अपयशाने खचून जाऊ नका, कारण तीच यशाची पहिली पायरी असते; वाचा ही मार्मिक कथा!

अपयशाने खचून जाऊ नका, कारण तीच यशाची पहिली पायरी असते; वाचा ही मार्मिक कथा!

googlenewsNext

शंभर प्रकारचे अपयश पचवल्यानंतर यशाची गोडी चाखायला मिळते. मात्र त्यासाठी शंभर वेळा पडूनही पुन्हा उभं राहण्याची तयारी, जिद्द मनात असावी लागते. यश मिळवण्यासाठी मेहनत, दृढता, निश्चय पक्के असावे लागतात. एवढे करूनही अपयश आले, तरी निराशा झटकून पुन्हा उभे राहावे लागते. तेवढे जर आपण केले नाही, तर आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. एका निराशेमुळे शंभर वेळा केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरते. म्हणून निराशा आली, की जिराफाचे पिल्लू लक्षात ठेवा. 

जिराफ आपल्या पिल्लाला जन्माला घालते, तेव्हा ते पिल्लू दाणकन जमिनीवर आढळते. एका सुरक्षित कवचातून बाहेर येत आपण कुठे येऊन आपटलो, हे उमगायच्या आत त्याला आईची एक लाथ बसते. आधीच आपण जोरात आपटलो गेलो, त्यात वरून पाठीत जोरात दणका बसला. हे पाहून पिलू बिथरते. जन्मदात्री आई आपल्याला मारायला धावतेय पाहून घाबरते. आई पुन्हा एक लाथ मारायच्या तयारीत अंगावर धाव घेते. कोवळ्या पायाचे पिलू घाबरून उठू लागते. तोवर त्याची आई येऊन त्याला लाथ मारून जाते. पिलाला कळून चुकते. आपण नुसते उभे राहून उपयोग नाही, तर आपण इथून पळ काढला पाहिजे, नाहीतर आपल्याला लाथा खाण्यावाचून पर्याय राहणार नाही. पिलू धावण्याचा प्रयत्न करणार तोच तिसरी लाथ बसते आणि पिलू धावत सुटते. मग त्याचा पाठलाग करत त्याची आई त्याच्या जवळ जाते आणि त्याला गोंजारते, प्रेम करते. 

आईला माहीत असते, जंगलात एकापेक्षा एक हिंस्त्र प्राणी आहेत. त्यांना नवजात पिलाचे कोवळे मास आवडते. आपण आपल्या पिल्लाचे कुठवर रक्षण करणार? म्हणून ती पिल्लाला जन्मतः स्वावलंबी बनवते. संकट कधीही येईल. उठ...नुसता विचार करू नको, स्वतःच्या पायावर उभा राहा. आपल्याकडे संरक्षणाचे दुसरे माध्यम नाही, म्हणून उभं राहायला शिकताच धावत सूट. आईचा मनोदय पूर्ण होतो. पिलू चपळ बनते. स्वावलंबी बनते आणि स्व संरक्षण शिकते. 

या पिलाकडून आपणही हेच शिकायचे, की अपयश आले, तरी उठून उभे राहायचे. दुसरे अपयश येण्याआधी धावत सुटायचे आणि तिसरे अपयश येण्याआधी आपल्या यशाचे शिखर गाठायचे. ही जिद्द आपण बाळगली नाही, तर आपल्यालाही नशिबाच्या लाथा खाव्या लागतील. म्हणून काहीही झालं, तरी निराश होऊ नका. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहा. यश मिळेलच!

Web Title: Don't be discouraged by failure, because it is the first step to success; Read this poignant story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.