नाहक हव्यास नको; मनावर नियंत्रण ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:32 AM2020-10-09T04:32:46+5:302020-10-09T04:34:13+5:30

तुम्हाला जे पाहिजे असेल ते जरूर घ्या, त्याचा उपयोग करा, उपभोग घ्या; पण ते जर मिळाले नाही तर त्याचा अजिबात खेद मानू नका. कारण तो खेद वाटला, म्हणजे त्या वस्तूने तुमचा काबू मिळवलाच, असे समजा !

Dont be greedy Control your mind | नाहक हव्यास नको; मनावर नियंत्रण ठेवा

नाहक हव्यास नको; मनावर नियंत्रण ठेवा

Next

- धनंजय जोशी

एकदा मनामध्ये हव्यास जागृत झाला, की त्याच्या पाठोपाठ मनाचा पाठलाग सुरू होतो. आपल्याला समज येईपर्यंत संसार वाढतच जातो. नको त्या गोष्टी आपण जमा करत राहतो. सान सा निम आम्हाला सांगायचे, ‘यू कॅन हॅव थिंग्ज बट डोण्ट लेट द थिंग्ज हॅव यू’ - तुम्हाला जे पाहिजे असेल ते जरूर घ्या, त्याचा उपयोग करा, उपभोग घ्या; पण ते जर मिळाले नाही तर त्याचा अजिबात खेद मानू नका. कारण तो खेद वाटला, म्हणजे त्या वस्तूने तुमचा काबू मिळवलाच, असे समजा !’ माझ्या तीन खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही झेन शिबिर घेत असू. सान सा निम रोज संध्याकाळी व्याख्यान देत असत.
एका शिबिराला युनिव्हर्सिटी ऑफ मॅडिसन, विस्कॉन्सिन या ठिकाणाहून एक जोडपे आले होते. व्हिक्टर त्याचे नाव. तो डिपार्टमेंट चेअरमन होता आणि त्याची पत्नी लायब्ररीमध्ये काम करायची. व्हिक्टरला सान सा निमची शिकवण आवडत असे. आमची नंतर मैत्री जमली आणि मी त्याच्याकडे एकदा राहायला गेलो. तो म्हणाला, ‘धनंजय, माझे सगळे आयुष्य बदलून गेले तुझ्याकडच्या शिबिरानंतर. आम्ही आमच्याकडच्या नको असलेल्या किंवा गरज नसलेल्या सगळ्या गोष्टी दान करून टाकल्या. आता आम्ही जर घर बदलायचे ठरवले, तर फार सोपे आहे आमच्यासाठी. आम्ही आमचे सगळे सामान आमच्या टोयोटा गाडीमधून हलवू शकतो.’ व्हिक्टरच्या घरामध्ये रेफ्रीजरेटरसुद्धा नव्हता. बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी एक छोटासा प्लॅस्टिक ग्लास होता मला खूप आनंद झाला ते बघून. त्याचे घर बघून मला एक नवीन मंत्र सुचला- ‘नो, थँक यू - आभारी आहे, पण नको !’- जेव्हा जेव्हा एखादी इच्छा आपल्या मनामध्ये उभी राहते तेव्हा आपण म्हणू शकतो का, ‘नो, थँक यू!’... आभारी आहे पण नको!

छोटीशी परीक्षा : तुमच्या घरातल्या रेफ्रीजरेटरसमोर उभे रहा. दोन तीन शांत श्वास घ्या. दार उघडा आणि समोर दिसलेल्या आइस्क्रीमला हसून म्हणा, ‘नो, थँक यू - आभारी आहे, पण नको..!’

Web Title: Dont be greedy Control your mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.