जेवणाचा शेवट 'गोड' पदार्थाने नाही, तर 'ताक भातानेच' करा आणि सुदृढ आरोग्य मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 12:39 PM2022-03-31T12:39:04+5:302022-03-31T12:39:39+5:30
ताकाला पृथ्वीवरचे 'अमृत' म्हणतात ते उगीच नाही! पूर्वजांचे अनुकरण करा आणि जेवणाचा शेवट ताक भाताने करा. वाचा ताकाचे अनेक फायदे!
गोड पदार्थाने जेवणाचा शेवट करण्याची पद्धत पाश्चात्यांची, आपली नाही! पूर्वीचे लोक जेवणाच्या शेवटी ताक भात खात असत. याचे कारण म्हणजे याआधी खाल्लेले सगळे जिन्नस पोटात गेल्यावर त्याचे व्यवस्थित पचन व्हावे आणि पोट शांत राहावे. आता आपण जेवणाचे साधे सोपे नियम पाळत नाही आणि आयुष्यभर जेवणाच्या बरोबरीने वेगवेगळ्या गोळ्यांचे सेवन करत राहतो. यापेक्षा गरजेच्या गोष्टींना प्राधान्य दिले आणि त्यांचा आहारात समावेश केला तर निरोगी आणि दीर्घायुष्याचे वरदान आपल्याला मिळू शकते. म्हणून तर ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे.
समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नावाचा शेष गुंडाळून देव आणि दानवांकडून मंथन झाले, त्यातून अनेक हिरे, रत्न, कामधेनु, कल्पवृक्ष आणि अमृत निघाले. ते मिळवण्यासाठी देव दानवांमध्ये चढाओढ झाली. शेवटी मोहिनी रूपात येऊन भगवान विष्णू यांनी देवांना अमृत प्राशन घडवले. त्यानुसार आपल्या घरात दही घुसळले जाते, त्यातून लोण्याचा गोळा वर येतो आणि शिल्लक राहिलेलं लोणकढं ताजं ताक पानात वाढलं जातं, तेव्हा तृप्ततेची अनुभूती येते. ते केवळ जिभेला आनंद देत नाही, तर आरोग्याला अनेक फायदे देते. असे अमृत इंद्राला स्वर्गात मिळणार नाही. म्हणून एका सुभाषितात म्हटले आहे,
भोजनांते च किं पेयम्। जयंत: कस्य वै सुत:।
कथं विष्णुपदं प्रोक्तम्। तक्रं शक्रस्य दुर्लभम्
स्वर्गात कल्पवृक्षापासून कामधेनूपर्यंत सर्वकाही मिळेल, परंतु अमृततुल्य असे ताक मिळणार नाही. म्हणून मनुष्या हे अमृत तुला उपलब्ध होत आहे, तर जेवणानंतर रोज ताक पीत जा, कारण ते इंद्रालाही मिळत नाही. असा त्याचा अर्थ आहे. आता जाणून घेऊ ताक पिण्याचे मुख्य फायदे -
- ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे, रायनॉप्लेरीन व्हिटॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
- ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. थोडक्यात नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.
- ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करतात.
- नियमितपणे ताकाचे सेवन केल्यास अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
- भाजलेल्या जिऱ्याची पूड, हिंग, सैंधव आणि काळे मीठ घालून तयार केलेले ताक सदैव हितकर आहे . असे ताक बाराही महिने पिता येते.
- ताक हे सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींना पिण्यास उत्तम मानले जाते. परंतु काही ठिकाणी पाच वर्षाखालील लहान मुलांना दही हे चांगले मानले जाते.
- अपचन म्हणजे जेवणाची वेळ होऊनही भूक न लागणे, पोटात जडपणा वाटणे यांसारखी लक्षणे असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस, पाव चमचा पुदिन्याचा रस व चवीनुसार सैंधव मीठ लोणी काढून घेतलेल्या वाटीभर ताकात टाकून घोट घोट घेण्याने बरे वाटते.