आज गोपाष्टमीच्या निमित्ताने गोमातेची सेवा करायला आणि गाय-वासराला चारा घालायला विसरू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:03 PM2021-11-11T14:03:12+5:302021-11-11T14:03:29+5:30
भगवान श्रीकृष्णाने गायीला जवळ केले, तिच्यासाठी वेणुवादन केले, गायींना चरण्यासाठी नेले, त्यांचे रक्षण केले, तसे आपणही गोमातेच्या ऋणात राहूया आणि गोसेवेस सुरुवात करूया.
भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावयाचा आहे. आज गोपाष्टमी आहे. यानिमित्ताने वसुबारसेला आपण जशी गाय वासराची पूजा केली, तशीच पूजा किंवा त्यांची सेवा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अभिप्रेत आहे.
सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणार्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणार्या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे, अशी योग्यता असलेल्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय रहात नाही. अशा गौमाता तसेच गौपालक, गौसेवक, गौरक्षक यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गोपाष्टमी होय!
गोपाष्टमी दिवशी:
>>गोशाळेत जा. गाय वासरांना चारा खाऊ घाला त्यांची सेवा करा.
>>गोमातेचे पूजन करा तसेच गोसेवकांचा मान सन्मान करून त्यांच्या गोपालन उपक्रमाबद्दल आभार माना.
>>गायीच्या पावलांचे प्रतीक म्हणून दारात किंवा देवघरासमोर गोपद्म काढून त्यांवर हळद कुंकू फुले वाहून पूजा करा.
>>अधिक मासात ३० + ३ गोपद्म काढतात तसेच गोपाष्टमीला देखील ३३ गोपद्म काढून त्यांची पूजा करतात.
>>गायीला भिजवलेली डाळ गूळ, तिळ गूळ, पोळी, हिरवा चारा किंवा भाजीपाला द्या, मात्र भात देऊ नका कारण त्यांना भात पचवण्यास त्रास होतो.
>>यथाशक्ती गोशाळेला दान करा. गाय दत्तक घेता आली नाही तरी निदान आठवड्यातून, महिन्यातून, पंधरा दिवसांनी शक्य होईल तेव्हा गोशाळेत जाऊन सेवा द्या. ही केवळ भूतदया नाही तर गोमातेची सेवा आहे, हे लक्षात घ्या.
भगवान श्रीकृष्णाने गायीला जवळ केले, तिच्यासाठी वेणुवादन केले, गायींना चरण्यासाठी नेले, त्यांचे रक्षण केले, तसे आपणही गोमातेच्या ऋणात राहूया आणि गोसेवेस सुरुवात करूया.