कोणाच्या परिस्थितीवरून मनस्थितीचा अंदाज बांधू नका, तो चुकू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 08:00 AM2021-08-05T08:00:00+5:302021-08-05T08:00:12+5:30

कोणाच्या सांगण्यावरून किंवा ऐकीव माहितीवरून व्यक्ती समजून घेण्याआधी पूर्वग्रह करू नका.

Dont judge book by its cover, it may be wrong! | कोणाच्या परिस्थितीवरून मनस्थितीचा अंदाज बांधू नका, तो चुकू शकतो!

कोणाच्या परिस्थितीवरून मनस्थितीचा अंदाज बांधू नका, तो चुकू शकतो!

Next

एका श्रीमंत मुलाला त्याचा मोठा भाऊ वाढदिवसाच्या दिवशी त्याची आवडती महागडी कार भेट देतो. ती कार पाहून मुलगा खूपच खुश होतो. संध्याकाळी दिमाखात ही गाडी न्यायची आणि आपल्या मित्रपरिवारात ऐट मिरवायची असे तो मनोमन ठरवून टाकतो. भावाला घट्ट मिठी मारून वाढदिवसाची भेट खूपच आवडल्याचे सांगतो.

ठरवल्याप्रमाणे तो संध्याकाळी छान तयार होऊन आपल्या ब्रँड न्यू कारमध्ये बसतो. आरशात स्वत:ला न्याहाळतो आणि चावी फिरवत कार सुरू करतो. लाँग ड्राईव्हचा आस्वाद घ्यावा, म्हणून मुद्दाम वेगळे वळण घेत हायवेवरून कार सुसाट वेगाने नेतो. मित्रांचे फोन येतात, त्यामुळे अध्र्या वळणावरून कार परत शहराकडे फिरवावी लागते. 

एका सिग्नलला येऊन त्याची कार थांबलेली असताना गाडी साफ करण्याचे रूमाल विकणारा मुलगा त्याच्या कारजवळ येऊन थांबतो. त्याला बाहेरून आतले काही दिसत नसते म्हणून तो काचेवर कपाळ चिकटवून आत पाहण्याचा प्रयत्न करतो. आत बसलेला तरुण त्याला पाहत असतो. आज वाढदिवस असल्याने तो खुशीत असतो. कारची काच खाली करून त्याला विचारतो, `आवडली माझी कार? मला माझ्या मोठ्या भावाने दिली आहे. आज माझा वाढदिवस आहे.'
छोटा मुलगा हसून मान डोलावतो. त्याच्या डोळ्यातले कुतुहल पाहून कारमधून सफर करणार का असे विचारतो आणि त्याला आत बसवतो. मुलाचे डोळे विस्फारतात. तो म्हणतो, `इथून जवळच एका गल्लीत कार वळवाल का? माझे घर तिथेच आहे.'

कारमधला तरुण विचार करतो, `याला नक्कीच त्याच्या मित्रांसमोर आलिशान कारमधून उतरताना ऐट करायची असणार.' असा विचार करत तो मुलाने सांगितलेल्या ठिकाणी कार वळवतो आणि एका चाळीजवळ थांबवतो. मुलगा कारमधून उतरतो आणि दोन मिनिटात येतो सांगून वर जातो. तरुणाला त्याच्या मित्रांचे वारंवार फोन येत असतात. परंतु लहान मुलाने का थांबवले असेल या विचाराने तो फोनकडे दुर्लक्ष करतो.

काही क्षणात मुलगा खाली येतो, तेव्हा त्याच्याबरोबर आणखी एक छोटा मुलगा असतो. तो त्याचा धाकटा भाऊ असतो आणि अपंग असतो. मुलगा आपल्या धाकट्या भावाला म्हणतो, `बघ, तुला म्हटलं होतं ना, अशा पण आलिशान गाड्या असतात म्हणून. जेव्हा मी मोठा होईन, श्रीमंत होईन तेव्हा मी सुद्धा तुझ्यासाठी अशी कार भेट देईन, जेणेकरून तू त्यात बसून हवे तिथे फिरू शकशील. मलाही यांच्या मोठ्या भावासारखे बनायचे आहे आणि मी नक्की बनणार!'

हे ऐकून श्रीमंत तरुणाचे डोळे पाणवतात. त्याने लहान मुलाबद्दल केलेला पूर्वग्रह चुकीचा होता, हे त्याच्या लक्षात येते आणि त्या लहान मुलामध्ये त्याला भविष्यातला आपला मोठा भाऊ दिसू लागतो. तो त्या दोघा छोट्या मित्रांबरोबर वाढदिवस साजरा करतो आणि इथून पुढे कोणाबद्दल कधीही पूर्वग्रह करणार नाही, असा पण करतो.

Web Title: Dont judge book by its cover, it may be wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.