'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे', हे शिकवणारा बालपणीचा श्लोक!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 21, 2020 11:30 AM2020-11-21T11:30:00+5:302020-11-21T11:30:03+5:30

'हातातोंडाशी आलेला घास जाणे', असा आपल्याकडे एक वाकप्रचार आहे. म्हणजे चांगली संधी हुकणे, असा त्याचा अर्थ. परंतु, या वाकप्रचाराचा शब्दश: अर्थ घेतला, तरी वदनी कवळ घेताना हरीचे नाम का घ्यावे, याची जाणीव होईल. 

'Don't live to eat, eat to live', this is a childhood verse that teaches! | 'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे', हे शिकवणारा बालपणीचा श्लोक!

'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे', हे शिकवणारा बालपणीचा श्लोक!

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

आज सकाळी एक तरुण झपझप पावले टाकत रस्त्याने जाताना दिसला. तो नोकरीवर जाण्याच्या लगबगीत असावा.  मात्र, एवढ्या घाईतही त्याची एक छोटीशी कृती दखलपात्र ठरली. ती अशी, की चालता चालता, त्या तरुणाने जमीनिवर पडलेला भाकरीचा तुकडा उचलून एका झाडाच्या कट्यावर ठेवला आणि तो पुढे निघून गेला. तो तुकडा कोणाच्या पायदळी तुडवला जाऊ नये आणि एखाद्या भुकेल्या प्राण्याच्या तोंडी लागावा, ही उदात्त भावना त्या छोट्याशा कृतीमध्ये दडलेली होती. कोणी आपली दखल घेतली असेल, हे त्याच्या गावीही नसावे, कारण तो पुन्हा आधीच्या वेगाने नजरेआड झाला. मात्र, जाता जाता आपल्या कृतीचा ठसा मनावर उमटवून गेला. 

हेही वाचा : फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)

या कृतीनंतर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निरखून पाहिले, तर त्याचा चुरघळलेला शर्ट, मळलेली  जिन्स, खांद्यावर जुनाट सॅक दिसली.  बेताची परिस्थिती असलेला तो तरुण, स्वकष्टाच्या अन्नाचे मोल जाणत होता, हे लक्षात आले. याच जाणीवेतून त्याच्याही नकळत ही कृती घडली असावी. ती पाहता 'अन्न हे पूर्णब्रह्म' या श्लोकाची आठवण झाली. जेवणाआधी श्रीहरीस्मरण का करावे, हा बालवयात झालेला संस्कार आठवला. 

वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे,
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे,
जीवन करी जिवित्त्वा, अन्न  हे पूर्णब्रह्म,
उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म।

'हातातोंडाशी आलेला घास जाणे', असा आपल्याकडे एक वाकप्रचार आहे. म्हणजे चांगली संधी हुकणे, असा त्याचा अर्थ. परंतु, या वाकप्रचाराचा शब्दश: अर्थ घेतला, तरी वदनी कवळ घेताना हरीचे नाम का घ्यावे, याची जाणीव होईल. 

अन्न आहे, परंतु शिजवलेले नाही. शिजवलेले अन्न आहे, परंतु खाण्यासाठी हात नाहीत, अन्न आहे, हात आहेत, परंतु तब्येत ठीक नाही. तब्येत उत्तम आहे, परंतु अन्नच समोर नाही. अशा परिस्थितीत पोटात घास जाणार तरी कसा? मात्र, या गोष्टीची जाणीव कठीण प्रसंगात होते. जेव्हा दोन वेळच्या जेवणासाठी कोणाची लाचारी पत्करावी लागते. तेव्हाच, रोज न मागता ताटात वाढलेल्या भोजनाचे आणि विनासायास मुखात गेलेल्या अन्नाचे, अन्नपूर्णेचे आणि अन्नदात्याचे महत्त्व कळते. 

तोंडापर्यंत नेलेला घास तोंडात जाईलच असे नाही. गेलाच, तर तो पचेल, रूचेल असे नाही, पचलाच, तरी तो अंगी लागेलच असे नाही. म्हणून पूर्वजांनी सूचना केली आहे, वदनी कवळ घेत असतानाच श्रीहरीचे नाव घ्या, म्हणजे अन्नाचा घास तोंडात जाण्यापासून तो अंगी लागण्यापर्यंतची जबाबदारी श्रीहरी सांभाळेल. फुकाचे म्हणजे फुकट, विनामूल्य असलेल्या नामस्मरणाने, शरीररूपी यज्ञकुंडात अन्नरूपी टाकलेल्या समीधांचे यथायोग्य हवन होते. 

हेही वाचा : बाळा दुग्ध कोण करीतो उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही! भाग २

ज्याने चोच दिली, त्याने चारा दिला, त्या परमात्म्याचे स्मरण करायचे, कारण, त्याने केवळ आपली सोय लावून दिलेली नाही, तर सृष्टीतील प्रत्येक जीवात्मा त्याने तृप्त केला आहे. आपला अन्नदाता शेतकरी, आपला कष्टकरी कुटुंबप्रमुख आणि आपली आवड निवड जपणारी अन्नपूर्णा यांचेही त्यानिमित्ताने स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो क्षण आहे. त्याचवेळेस, सीमेवर आणि सीमेअंतर्गत रक्षण करणाऱ्या रक्षकांचेदेखील मनोमन आभार मानायचे. कारण, ते डोळ्यात तेल ओतून शत्रूपासून आपले संरक्षण करत आहेत, म्हणून आपण आपल्या घरात सुखेनैव भोजनाचा आस्वाद घेत आहोत. हे सगळे आपले पालक आहेत. श्रीहरीची रूपे आहेत. ते नसते, तर आपली उपासमार झाली असती. 

ब्रह्मज्ञान म्हणतात, ते हेच! ब्रह्म आपल्यात सामावले आहे. आपल्या आत वसलेल्या भगवंताला हा नैवेद्य अर्पण करून 'अन्न हे पूर्णब्रह्म' याची जाणीव करून द्यायची. जेणेकरून अन्नाची किंमत कळेल आणि त्याची नासाडी होणार नाही. जेवढे गरजेचे, तेवढेच पानात वाढून घेतले जाईल. अन्न आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करते. अतिरिक्त अन्न ग्रहण केल्यामुळे आळस चढतो, म्हणून ते ग्रहण करत असताना स्वत:लाच बजवायचे,

उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!

'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे.' पोट भरणे, हा जेवणाचा हेतू नाही, तर शरीर कार्यन्वित ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून कमावणे, हा त्यामागचा हेतू आहे. 

एवढ्या सगळ्या गोष्टी चार ओळीत सामावलेल्या आहेत. त्या तरुणाने बहुदा, हे महत्त्व जाणले असावे, अंगिकारले असावे. त्याने त्याचे काम केले, आता आपली पाळी आहे. 

हेही वाचा :तेणे तुझी काय नाही केली चिंता, राही त्या अनंता आठवोनि! (भाग ३)

Web Title: 'Don't live to eat, eat to live', this is a childhood verse that teaches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.