संकट येताच भांबावून जाऊ नका, थोडं थांबून विचार करा मार्ग नक्की सापडेल; वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:30 AM2022-05-25T07:30:00+5:302022-05-25T07:30:02+5:30
ज्याप्रमाणे शांत डोहात पाय टाकताना भीती वाटत नाही, कारण त्याचा तळ दिसत असतो, त्याचप्रमाणे शांत मनातूनच मार्ग सापडतो!
संकट कधी सांगून येत नाही. त्यामुळे कधी, कोणते, कसे संकट ओढावेल आणि आपण त्याला कसे तोंड देऊ याची पूर्वतयारी करणे शक्य नाही. परंतु, अशा कठीण प्रसंगी मन शांत ठेवण्याची तयारी आतापासून करता येईल. रोजच्या छोट्या मोठ्या प्रसंगाना आपण कसे तोंड देतो, यावरून कठीण प्रसंगाला आपण कसे सामोरे जाणार आहोत, याचे स्वत:च स्वत:ला परीक्षण करता येईल.
एक राजा होता. त्याला अनेक पूत्र होते. राजा वृद्धत्त्वाकडे झुकला होता. राज्याचा पदभार उचित हाती सोपवून त्याला राज्यकारभारातून निवृत्त व्हायचे होते. परंतु, आपल्या अनेक पूत्रांपैकी नेमकी कोणच्या हाती राज्यपदाची सूत्रे द्यावीत, असा राजासमोर संभ्रम निर्माण झाला. राजा आणि राणीचे आपल्या सर्व पूत्रांवर समान प्रेम होते. तरी राज्य सिंहासनावर कोणा एकालाच बसवता येणार होते. ते पद योग्य हातीच गेले पाहिजे असा राजाचा आग्रह होता. राजाने आपल्या पुत्रांची परीक्षा घ्यायची असे ठरवले.
राजाने शाही भोजनाची घोषणा केली. सर्व पूत्रांसाठी भव्य सभामंडपात स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पकवान्नयुक्त भोजन, नृत्य, गाणी, मनोरंजन असा एकूणच माहोल धुंद झाला होता. राजा त्या सभेला हजर न राहता आपल्या राजमहालातून तेथील दृष्याचे अवलोकन करत होता.
राजाच्या सांगण्यावरून त्या सभामंडपात जंगली कुत्री सोडण्यात आली. पहारेकरी घाबरून इतरत्र पळू लागले. उपसस्थित सगळेच जीव वाचवत पळू लागले. काही राजकुमार त्या जंगली कुत्र्यांची शिकार करायला निघाले, तर काही राजकुमार घाबरून राजवाड्याच्या दिशेने पळाले. सगळे चित्र पाहून राजाने घोषणा केली. 'उद्या दरबारात नव्या राजाच्या हाती राज्याची सूत्रे सोपवली जातील.'
सर्व लोकांमध्ये कुतुहल होते, नवीन राजा कोण असेल? दुसऱ्या दिवशी दरबार भरला. सगळे राजपुत्र हजर होते. राजाने विचारले, `सर्वांना भोजन आवडले का?'
दोघा तिघांनी उठून राग व्यक्त केला, काल घडलेला प्रसंग सांगितला. राजा निराश होऊन म्हणाला, याचा अर्थ भोजनाचा आनंद कोणीच घेऊ शकले नाही?' तेवढ्यात एक राजकुमार उठून म्हणाला, 'पिताश्री भोजन खूप स्वादिष्ट होते. पंगतीपैकी मी एकटा जेवलो. जी कुत्री मला चावण्यासाठी अंगावर येत होती, त्यांना मी माझ्या भोजनावरून उठलेल्या भावांची ताटे पुढे केली. कुत्री जेवली, मी ही जेवलो! भरल्या पोटी ती सुस्तावली आणि मी जेवणावर यथेच्छ ताव मारला.'
राजा खुष झाला, म्हणाला, `याला म्हणतात प्रसंगावधानता! संकट काळात न डगमगता जो मार्ग काढतो, तोच स्वत:चा आणि इतरांचा बचाव करू शकतो. माझ्या या राजपुत्राने छोट्याशा प्रसंगातून मोठी प्रसंगावधानता दाखवली. तोच उद्या राज्यावर आलेले संकट सहज दूर करेल असा विश्वास वाटतो, म्हणून त्यालाच आपण भावी राजा बवनत आहोत.
असा राजयोग आपल्याही नशीबात यावा असे वाटत असेल, तर मन सदासर्वदा शांत ठेवायला शिका. जे हवे ते सर्व मिळेल.