गर्दीमागे धावू नका, स्वत:ला योग्य वाटेल तो मार्ग निवडा;वाचा ही अकबर बिरबलाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 08:00 AM2021-07-22T08:00:00+5:302021-07-22T08:00:07+5:30

अनुकरण करा पण अंधानुकरण नको. आपल्या मनाचा आणि बुद्धीचा कौल घ्या!

Don't run after the crowd, choose the path that suits you; read this Akbar Birbal's story! | गर्दीमागे धावू नका, स्वत:ला योग्य वाटेल तो मार्ग निवडा;वाचा ही अकबर बिरबलाची गोष्ट!

गर्दीमागे धावू नका, स्वत:ला योग्य वाटेल तो मार्ग निवडा;वाचा ही अकबर बिरबलाची गोष्ट!

googlenewsNext

एकदा अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला, `बिरबला, अविद्या कशाला म्हणतात?'
बिरबल म्हणाला, `बादशहा, मला चार दिवसांची सुटी द्या, आल्यावर उत्तर देतो.'
अकबर म्हणाला, `एवढ्या छोट्याशा प्रश्नाचे उत्तर शोधायला चार दिवसांची सुटी कशाला?'
बिरबल म्हणाला, `बादशहा, रोज रोज तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊन आता डोकं चालेनासे झाले आहे. त्याला थोडी विश्रांती दिली तर ते पुन्हा नीट काम करेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.'

बादशहाने रजा मंजूर केली. बिरबल एका मोच्याकडे गेला. त्याला रत्नहिऱ्यांनी जडलेली छानशी मोजडी बनवायला सांगितली. मोच्याने माप विचारले, त्यावर बिरबल म्हणाला साधारण मोठ्या माणसांच्या पायात बसेल अशा बेताने बनव आणि ती बनवून मला दिलीस, की तू ही मोजडी बनवली आहेस हे विसरून जा.'

मोच्याने कलाकुसर पणाला लावून छानशी मोजडी बनवून दिली. त्याला त्याचा मोबदलाही मिळाला. ती मोजडी घेऊन बिरबल एका मशिदीजवळ गेला आणि त्याने तिथे एक मोजडी टाकली व दुसरी मोजडी घेऊन तो घरी आला. 

दुसऱ्या दिवशी पहाटे नमाज पढायला आलेल्या मौलवींनी ती मोजडी पाहिली आणि ते म्हणाले, ही अनन्यसाधारण मोजडी नक्कीच सामान्य माणसाची नाही. ती एकतर बादशहाची असू शकते नाहीतर परवरदिगारची!

शहरभर त्या मोजडीची चर्चा झाली. अकबराने कुतुहलाने ती मोजडी मागवली आणि मौलवींच्या सांगण्यानुसार त्यालाही ती अद्भूत शक्तीची खूण वाटली. त्याने ती मस्तकी लावून शहराच्या मध्यभागी एक चौथरा उभारून काचेच्या पेटीत ठेवायला सांगितली. लोक जाता येता त्या मोजडीचे दर्शन घेऊ लागले.

चौथ्या दिवशी सुटी संपवून बिरबल परत आला. त्याचा दु:खी चेहरा पाहून अकबर म्हणाला, सुटी संपवूनही तुझा चेहरा असा का?
त्यावर बिरबल म्हणाला, `बादशहा, दोन दिवसांपूर्वी आमच्या घरात चोरी झाली आणि चोराने नेमकी आमच्या पूर्वजांची जतन करून ठेवलेली मोजडी नेली. आयत्या वेळेस आम्ही त्याला पकडणार तर तो निसटला पण जाताना एक मोजडी घेऊन गेला आणि एक घरात पडली.'

अकबराने ती मोजडी बघायला मागवली, तर ती हुबेहुब मौलवींनी दाखवलेल्या मोजडीसारखी होती. बादशहाने दुसरी मोजडी मागवून बिरबलाला सुपूर्द केली आणि तो स्वत: सकट सगळ्या शहरातल्या लोकांच्या झालेल्या फजितीवर हसू लागला. त्यावर बिरबल म्हणाला, `बादशहा, यालाच म्हणतात अविद्या! एखादी गोष्ट माहित नसताना, तिची शहानिशा करण्याऐवजी सगळे सांगतात ते ऐकून अनुकरण करणे, यालाच अविद्या म्हणतात!' 

म्हणून गर्दीमागे धावणे सोडा. सगळे करतात म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करायला जाऊ नका. तुमच्या मनाचा आणि बुद्धीचा कौल घ्या. मोठ्यांचे मार्गदर्शन घ्या आणि मगच कृती करा. 

Web Title: Don't run after the crowd, choose the path that suits you; read this Akbar Birbal's story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.