अति विचाराने स्वतःची होणारी प्रगती थांबवू नका, कारण.... सांगताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:00 AM2022-06-02T07:00:00+5:302022-06-02T07:00:01+5:30

अनेकदा असे घडते की अपयशाचे कारण आपल्याला कळत नाही, वास्तविक पाहता ते कारण कधी कधी आपल्यातच दडलेले असते. चला त्याचा शोध घेऊ!

Don't stop your own progress by thinking too much, because .... says Gaur Gopal Das! | अति विचाराने स्वतःची होणारी प्रगती थांबवू नका, कारण.... सांगताहेत गौर गोपाल दास!

अति विचाराने स्वतःची होणारी प्रगती थांबवू नका, कारण.... सांगताहेत गौर गोपाल दास!

Next

प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू यांनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले- आपली प्रगती कधी थांबते माहितीये? जेव्हा आपण चार गोष्टींचा अकारण विचार करतो. ते चार प्रश्न म्हणजे- मी अपयशी झालो तर? मी काही गमावून बसलो तर? माझा निर्णय चुकला तर? लोक काय म्हणतील? जेव्हा आपण या चारही प्रश्नांवर मात करायला शिकू, तेव्हा आपण प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकलेले असेल. यासाठी मी तुम्हाला माझे उदाहरण देतो.

एकदा मला माझ्या एका पायलट मित्राने त्याच्या खाजगी विमानातून सफर घडवायची असे ठरवले. विमानात याआधी देखील मी अनेकदा बसलो होतो, तरीदेखील तो विमान चालवत असताना त्याच्या बाजूला बसून सफर करणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. ज्या दिवशी आम्हाला सफारीवर जायचे होते, त्याच्या आदल्या दिवशी मी अकारण बेचैन होतो. जणू काही विमान मलाच उडवायचे होते! दुसऱ्या दिवशी त्याच अस्वस्थतेत विमानात बसलो. मात्र, माझ्या मनातले भाव मी चेहऱ्यावर येऊ दिले नाही, अन्यथा माझ्या मित्राचा हिरमोड झाला असता. तो आनंदात होता. आम्ही दोघे उडालो. काही क्षणात माझी भीती पळाली. जवळपास वीस मीनिटे आकाशात सैर करून जमिनीवर लँडींग करताना मला पुन्हा त्याच अस्वस्थतेने ग्रासले. मात्र माझ्या मित्राने अगदी शांतपणे लँडिंग केले आणि आमचा प्रवास पूर्ण झाला. माझी अस्वस्थता पूर्ण दूर झाली होती. 

असाच आणखी एक अनुभव होता स्काय डायव्हिंगचा! आकाशात उंचावर पोहोचल्यावर विमानातून उडी मारायची, अशा वेळी नेमके आपले पॅराशूट उघडले नाही तर? माझ्या प्रशिक्षकाकडून काही चूक झाली तर? माझा अपघात होऊन मी मेलो तर? जमिनीवर सुरक्षित उतरण्याऐवजी कुठे आदळलो तर? अशा सगळ्या नकारात्मक विचारांनी डोक्यात गर्दी केली. शेवटी एका क्षणी मीच मला समजावले...

'आपल्याबरोबर असणाऱ्या प्रशिक्षकाने आजवर हजारो लोकांना हा आनंददायी अनुभव दिलेला आहे. तो माझ्या सोबत असणार आहे. माझ्या पाठीला पॅराशूट असणार आहे. हा अनुभव सुखद व्हावा यासाठी एक यंत्रणा सुसज्ज असणार आहे. एवढे सगळे असूनही जर मी घाबरत राहिलो, तर मी एक सुंदर अनुभव घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याची चूक करणार आहे.' 

असा सारासार विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्काय डायव्हिंग केले आणि यशस्वीपणे विमानातून बाहेर झेप घेतली. माझ्या प्रशिक्षकाने मला व्यवस्थित सांभाळले. पॅराशूट वेळेत उघडले आणि आम्ही सुखरूप जमिनीवर आलो. माझ्या मनातले चारही प्रश्न मिटले. याचाच अर्थ मी अकारण काळजी करत होतो.

मित्रांनो, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण निर्णय घेताना अति विचार किंवा नकारात्मक विचारांनी स्वत:ची प्रगती थांबवू नका. 

Web Title: Don't stop your own progress by thinking too much, because .... says Gaur Gopal Das!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.