तुळशीची वाळलेली पाने फेकू नका, त्या पानांचा सौभाग्यप्राप्तीसाठी वापर करा ; सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 02:50 PM2022-04-08T14:50:47+5:302022-04-08T14:51:02+5:30
तुळशीच्या वाळलेल्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या वाळलेल्या पानांचे चमत्कारिक फायदे.
तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते. दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. बहरलेली तुळस आपल्या दारात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण आहे. मात्र ऋतुमानानुसार तुळशीच्या रोपाची पानगळती झाली किंवा पाने वाळली, तरी काळजी करू नका. तुळशीच्या वाळलेल्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या वाळलेल्या पानांचे चमत्कारिक फायदे.
वाळलेल्या तुळशीच्या पानांचे फायदे
धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पानेही भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत. असे मानले जाते की देवाला नैवेद्य दाखवताना वाळलेल्या तुळशीच्या पानाचाही वापर केला तरी चालतो. पान वाळले तरी तुळशीचे महत्त्व किंवा तिचा औषधी गुणधर्म कमी होत नाही. म्हणून वाळलेल्या पानांचा पुर्नवापर करायला हरकत नाही.
देवपूजा करताना, देवाला स्नान घालताना तुळशीची वाळलेली पाने त्यात टाकता येतील. ते पाणी तीर्थ म्हणून चमचाभर प्राशन करता येईल. याशिवाय तुम्ही स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात वाळलेल्या तुळशीची पाने टाकू शकता. असे मानले जाते की यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पाने लाल कपड्यात ठेवून तिजोरीत किंवा अन्न धान्याच्या कणगीत ठेवल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. यासोबतच आर्थिक प्रगतीही होते.
तुळशीची वाळलेली पाने गंगेच्या पाण्यात टाकून घरात ते पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचबरोबर घरात आनंदाचे वातावरण राहते.
याशिवाय तुळशीची वाळलेली पाने खुडून टाकली तरी ती केराच्या टोपलीत किंवा निर्माल्यात टाकू नका तर तुळशीच्या कुंडीतच टाका. जेणेकरून त्या पानाचे खतामध्ये रूपांतर होईल आणि तुळशीचे बीज मातीत रोवले गेले तर आणखी एखादे तुळशीचे रोप कुंडीत तयार होईल. तसे होणे हे घरात भरभराट होण्याचे लक्षण आहे.
म्हणून तुळशीच्या वाळलेल्या पानांचे सुनियोजन करून ती पुनर्वापर करण्यावर भर द्या, फेकण्यावर नाही!