यशाची वाट धुंडाळत बसू नका, नवीन पायवाट शोधून मार्गक्रमण सुरू करा; थांबला तो संपला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 04:43 PM2021-04-24T16:43:05+5:302021-04-24T16:43:50+5:30

आपण स्वतःला ओळखायला कमी पडतो. दुसरे आपल्याला मार्ग दाखवतील याची वाट पाहत बसतो. परंतु ज्याला यशस्वी व्हायचे असते, तो आपली पायवाट स्वतः बनवतो!

Don't wait for success, start a new path; Stopped it's over! | यशाची वाट धुंडाळत बसू नका, नवीन पायवाट शोधून मार्गक्रमण सुरू करा; थांबला तो संपला!

यशाची वाट धुंडाळत बसू नका, नवीन पायवाट शोधून मार्गक्रमण सुरू करा; थांबला तो संपला!

Next

एक तरुण मुलगा यशस्वी होण्याचा कानमंत्र शोधत सगळीकडे भटकत असे. त्याला कोणीतरी सांगितले. आपल्या गावापासून जवळच लांबच लांब पर्वतरांगा आहेत, त्याच्या पर्वतांच्या कुशीत एक साधू राहतात. एकदा तू त्यांच्याकडे जा, ते तुला नक्की कानमंत्र देतील. 

तरुण मुलगा सुखावला. एक दिवस घरी काहीच न सांगता तो पर्वतरांगांच्या दिशेने निघाला. वाटेत घोर अरण्य होते. परंतु तिथे पोहोचण्याचा ध्यास मनात होता. त्याने वाटेत आलेल्या सर्व अडचणींवर मात करत त्या साधूंचे निवास स्थान शोधून काढले. 

मजल दरमजल करत, ठेचकाळत, अडचणींवर मात करत तो तिथे पोहोचला. तिथे एक छोटेसे झोपडीवजा घर होते. त्याने दार ठोठावले. दार कोणीच उघडले नाही. एवढ्या दूर येऊन हाती निराशा येईल का, हा विचार करत असताना त्याने परत दार ठोठावले. काही वेळाने एक साधू दार उघडून बाहेर आले. तरुण मुलाने आपला परिचय दिला आणि त्यांना आपण का भेटायला आलो, त्याचे प्रयोजन सांगितले. 

साधू हसले. त्यांनी तरुणाला आत घेतले. बसायला आसन दिले. प्यायला पाणी दिले आणि मग विचारले, तू माझ्याकडे यशाचा कानमंत्र घ्यायला आलास? तो तर तुझ्याच जवळ आहे. 

तरुण चक्रावला. त्याने गडबडून साधुंकडे पाहिले, तर साधू त्याला घेऊन घराबाहेर आले आणि त्यांनी त्या उंच पर्वतरांगांवरून विहंगम दृश्य तरुणाला दाखवले. वाटेतल्या दऱ्या, खोरे दाखवले. त्याकडे बोट दाखवून साधू म्हणाले, 'मला भेटण्यासाठी तू इथवर आलास, तेही असंख्य अडचणींवर मात करून! कारण मला भेटायचं हे ध्येय तू ठरवून घेतलं होतं. म्हणून वाटेत शेकडो अडचणी येऊनही तू माघारी फिरला नाहीस. कानमंत्र याहून वेगळा काय असतो? तुला ज्या क्षेत्रात नाव कमवायचे आहे, ते क्षेत्र सुद्धा माझ्या घरासारखे पर्वतरांगांच्या शिखरावर असेल. तुला तिथवर न अडखळता प्रवास करायचा आहे. ते एकदा का जमले, की तुला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही, हाच कानमंत्र लक्षात ठेव आणि यशस्वी हो!

तरुणाचे डोळे उघडले. तुज आहे तुजपाशी म्हणतात ते हेच! आपण स्वतःला ओळखायला कमी पडतो. दुसरे आपल्याला मार्ग दाखवतील याची वाट पाहत बसतो. परंतु ज्याला यशस्वी व्हायचे असते, तो आपली पायवाट स्वतः बनवतो! जो खरे परिश्रम घेतो, त्याला खुद्द भगवंत कानमंत्र देतो!

Web Title: Don't wait for success, start a new path; Stopped it's over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.