तेणे तुझी काय नाही केली चिंता, राही त्या अनंता आठवोनि! (भाग ३)
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 8, 2020 10:26 PM2020-10-08T22:26:10+5:302020-10-08T22:27:00+5:30
जन्म-मृत्यू हा एक न संपणारा प्रवास; आणि प्रवास म्हटला, की अडचणी आल्याच! हा प्रवास सुखरूप व्हावा, म्हणून देवाने मोठी शिदोरी आपल्या बरोबर दिलेली असते.
ज्योत्स्ना गाडगीळ
बाळ जन्माला आले, की तो मुलगा आहे की मुलगी, हे पाहण्याआधी आई, बाळ सुखरूप जन्माला आले ना? ते आधी पाहते. बाळाला नखशिखांत पाहिले, की तिचा जीव भांड्यात पडतो आणि मग सगळीकडे आनंदवार्ता दिली जाते, 'बाळ-बाळंतीण सुखरूप आहे.'
जन्म-मृत्यू हा एक न संपणारा प्रवास; आणि प्रवास म्हटला, की अडचणी आल्याच! म्हणून तर, प्रवासाला निघालेल्या पाहुण्यांना आपण शुद्ध मराठीत 'हॅप्पी जर्नी' अर्थात 'प्रवास सुखरूप होवो' अशा शुभेच्छा देतो. जन्माला येतानाचा प्रवास सर्वात अवघड आणि मृत्यू म्हणजे एका प्रवासातून सुटका, परत पुढचा प्रवास सुरू...!
हेही वाचा: फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)
हा प्रवास सुखरूप व्हावा, म्हणून देवाने मोठी शिदोरी आपल्या बरोबर दिलेली असते. मात्र, त्याने आपल्याला रिकाम्या हाती पाठवले, असे म्हणत आपण आयुष्यभर देवाकडे तक्रार करत राहतो. या बाबतीत एक दृष्टांत-
दोन मित्र असतात. एक अतिशय श्रीमंत आणि दुसरा अतिशय गरीब. त्यांच्यात घट्ट मैत्री असते, परंतु सुख-दु:खाचा विषय निघाला, की गरीब मित्र नेहमी श्रीमंत मित्राला म्हणत, 'तुझ्यासारखे माझे नशीब कुठे, माझ्या पदरात अठरा विश्वे दारिद्रय भगवंताने टाकले आहे, तू मात्र चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आलास. सगळ्यांनाच असे भाग्य लाभत नाही.'
मित्राचे नेहमीचे रडगाणे ऐकून श्रीमंत मित्राने एकदा त्याला धडा शिकवायचा, असे ठरवले. तो मित्राला म्हणाला, 'तुझे अठरा विश्वे दारिद्रय दूर करण्याची मी तुला एक संधी देतो. त्या मोबदल्यात तू मला काय देशील?
गरीब मित्र म्हणतो, 'मी फकीर काय देणार तुला?'
श्रीमंत मित्र म्हणतो, 'देण्यासारखे खूप काही आहे तुझ्याकडे, पण मला फक्त तीनच गोष्टी हव्या आहेत. देतोस का सांग. त्या मोबदल्यात मी माझी अर्धी संपत्ती तुझ्या नावे करतो.'
हे ऐकून गरीब मित्राचे डोळे विस्फारले. अट ऐकण्याआधीच तो 'हो' म्हणत शब्द देऊन बसला. श्रीमंत मित्राने संपत्तीचे कागदपत्र तयार केले आणि मित्राला देऊ केले. मात्र, ते कागदपत्र हातात देण्याआधी आपल्याला हव्या असलेल्या तीन गोष्टी मागून घेतल्या. त्या म्हणजे,
'एक हात, एक पाय आणि एक डोळा'
मित्राचे हे मागणे ऐकून गरीब मित्र थबकला. तो म्हणाला, `तुला एक हात, एक पाय, एक डोळा दिला, तर माझा देह विद्रुप होईल, शिवाय तू दिलेली संपत्ती तरी मी कशी उपभोगू शकेन. अशी माझी अवहेलना करण्यापेक्षा, नको तुझी संपत्ती. माझ्याकडे जेवढे आहे, त्यात मी खुष आहे.'
श्रीमंत मित्राने गरीब मित्राच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, 'मित्रा, तुला तुझ्याजवळ असलेल्या श्रीमंतीचीच जाणीव करून द्यायची होती, ती तुला झाली. यापुढे देवाने मला काहीच दिले नाही, असे अजिबात म्हणू नकोस. उलट दर दिवशी त्याने दिलेल्या सुदृढ, निरोगी देहाबद्दल आभार मान. त्याने काय नाही दिले, यापेक्षा काय दिले, याचा विचार कर आणि रोज त्याचे आभार मान. म्हणून बालपणी आपल्याला श्लोक शिकवला होता,
डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो,
जिव्हेने रस चाखतो, मधुमुखे वाचे आम्ही बोलतो,
हाताने बहुसार काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो झोप,
सुखे फिरूनी उठतो, ही ईश्वराची दया।।
या संपत्तीची आठवण करून देताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, 'तेणे तुझी काय, नाही केली चिंता, राही त्या अनंता आठवुनि!'
आपल्याकडे काय नाही, याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे 'काय' आहे (काय शब्दाचा दुसरा अर्थ शरीर) याचा विचार केला, तर आपण नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकू. हेच ध्यानात ठेवून ईश्वरचिंतन करा, असे तुकाराम महाराज म्हणतात.
तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर
त्याचे निरंतर ध्यान करी।।
का रे नाठविसी कृपाळू देवासी,
पोषितो जगासी, एकलाचि।।
समाप्त.
हेही वाचा: बाळा दुग्ध कोण करीतो उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही! भाग २