दोन अक्षरी राम हा जप परम, न लगे तू नेम नाना पंथ!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:02 AM2021-04-22T11:02:39+5:302021-04-22T11:03:22+5:30

Shriram : ‘राम’ या दोन अक्षरी रामजपाला इतर धार्मिक नेमनियम आणि विविध पंथ यांची आवश्यकता नाही.

Doon akshari ram ha jap param, na lage tu nem nana panth !! | दोन अक्षरी राम हा जप परम, न लगे तू नेम नाना पंथ!!

दोन अक्षरी राम हा जप परम, न लगे तू नेम नाना पंथ!!

googlenewsNext

जन्मास आल्यानंतर जर मनुष्य रामनामाचे पठण करील तर तो एकाच फेरीत वैकुंठास प्राप्त होईल. या इहलोकात जो ‘राम राम’ असे जिव्हेने उच्चारण करील, त्याच्या जिभेवर रामनामाचा ठसा उमटेल, तो आपोआप उध्दरून जाईल. ‘राम’ या दोन अक्षरी रामजपाला इतर धार्मिक नेमनियम आणि विविध पंथ यांची आवश्यकता नाही. श्रीरामाचे चरित्र असून ते  आपल्या गोत्रातील पूर्वजांचा उध्दार करते. इतकच नव्हे तर कसं जगल पाहीजे, याची शिकवण प्रभु रामाच्या जीवन चरित्रातून मिळते. रामायण त्रेतायुगात घडले. त्यानंतर द्वापर युग झाले. आता कलियुग सुरू आहे. त्रेता युग संपण्याला हजारो वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र,कलियुगातही हजारो वर्षांचा इतिहास असलेले प्रभु श्रीराम  त्यागभावनेमुळे श्रेष्ठ ठरतात.
- जीवन कसं असलं पाहीजे? जीवन हे स्वत:साठी नव्हे तर ज्योतीसारखं...,  पाण्यासारखं..., आकाशासारख... आणि मेघासारखं  दुसºयासाठी जगणारं असलं पाहीजे. समाजात जो स्वत:साठी जगतो. तो आयुष्य जगला असे अजिबात म्हणता येणार नाही. पुत्र, भाऊ, पती, मित्र, राजा, एव्हढेच नव्हे तर शत्रुही कसा असावा, हे भगवान श्रीरामांच्या जीवनचरित्रातून शिकायला मिळते. प्रभुश्रीराम दुसºयासाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगले. म्हणूनच चांगलं जगण्यासाठी प्रभु श्रीरामाच्या जीवन चरित्राचं श्रवण आणि अनुकरण करणे आवश्यक आहे. समाजात चांगल जगण्याची इच्छा असेल तर आदर्शही चांगले असणे काळाची गरज असून त्रेता युगातील प्रभु रामाचे जीवन चरित्र कलियुगातील प्रत्येकाचं जीवन सुकर करण्यासाठी उपयोगी असेच आहे.

-संकटात सामान्य मनुष्य हतबल होऊन कोसळतो. तो पिचून संपून जातो. परंतु रामायणातील प्रत्येकच पात्र संकटांना घाबरत नाही. बुजतही नाहीत. याउलट  संकटांसमोर दोन हात करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडतात. रामायणातील प्रत्येकच पात्रं, माणसे कशाच्या उर्जेवर संकटांवर मात करतात? त्यांना कुठून उर्जा आणि शक्ती मिळते? हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. मात्र, आजच्या मनुष्याच्या मनात निर्माण होणाºया प्रत्येक प्रश्नाचं रामायणाचा  त्यागाधिष्ठित पाया! हेच एकमेव उत्तर आहे.
- प्रभु श्रीराम राज्यत्याग करतात, भरत सिंहासनाचा त्याग करतात. लक्ष्मण-सीता सुखासीनतेला नाकारतात. उर्मिला पतीसुख त्यागत, सासू सासºयाची सेवा करते.  हनुमंत त्यागमूर्तीच असतो. बिभीषण लंकेचा त्याग करतो. सारी वानरसेना जीवितत्याग करते, सागर अहंकाराचा त्याग करतो! तात्पर्य या सूर्यकालाच्या छायेत व प्रभु श्री रामाच्या संपर्कात जे जे येतात ते ते सर्व त्यागनगरीचे नागरिक होऊन जातात!
-प्रभु श्रीरामाने सिंहासनाचा मोह सोडून पित्राज्ञा स्वीकारून थेट वनवासाचा रस्ता धरताच, कीतीर्ने त्याक्षणी त्याच्या गळ्यात जी माळ घातली ती आज व अजूनही प्रभु रामाच्याच गळ्यात टवटवीतपणे विराजित आहे. प्रभु श्रीरामाने सत्ता-संपत्ती-सुखाविलास यांचा त्याग करताच ते लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसलेत! प्रभु श्री रामाने पितृज्ञा म्हणून अयोध्येची वेस ओलांडली आणि रामकीर्ती कालातीत व शब्दातीत होऊन गेली. प्रभु श्रीरामांनी अयोध्येची मर्यादित भूमी सोडली व तो अमर्याद असा विश्वमानव होऊन गेले! श्रीरामाने सत्तात्याग केला, आणि ते कीर्तीसंपन्न झालेत.

-भगवान राम हे आचरणाचे दैवत आहे, हे समजून बोध घेतला पाहिजे.भगवान श्रीराम देव होते. साधू होते. मात्र, त्याही पलिकडे भगवान राम एक आदर्श मानव होते.  त्यागमय जीवनातून त्यांनी त्रेतायुगातील समाजव्यवस्थेसह आजच्या कलियुगातील समाजातील प्रत्येकाला एक बोध दिला आहे. त्यामुळे मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाचे संपूर्ण जीवनच आदर्शवत आहे.


- संत कबीर यांनी कणा-कणात रमतो तो राम. संत कबिरांच्या मते राम शब्द इतका व्यापक आहे की, परमात्मासाठी ‘राम’ हाच एकमेव शब्द आहे. -रमते इति राम:


सबमें रमै रमावै जोई, ताकर नाम राम अस होई ।
घाट झ्र घाट राम बसत हैं भाई, बिना ज्ञान नहीं देत दिखाई।
आतम ज्ञान जाहि घट होई, आतम राम को चीन्है सोई।
कस्तूरी कुण्डल बसै , मृग ढूंढ़े वन माहि।
ऐसे घट झ्र घट राम हैं, दुनिया खोजत नाहिं ।

तर प्रसिध्द उर्दू शायर अल्लामा इकबाल यांनी भगवान श्रीरामाला इमाम-ए-हिंद म्हटले आहे.
है राम के वजूद पे हिंदोस्तां को नाज,!
अहल-ए-नजर समझते हैं उस को इमाम-ए-हिंद!!


- अनिल गवई, तिरूपती नगर, खामगाव.

Web Title: Doon akshari ram ha jap param, na lage tu nem nana panth !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.