Dussehra 2021 : दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा; जाणून घ्या दसऱ्याचे शुभ मुहूर्त आणि विधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 08:00 AM2021-10-12T08:00:00+5:302021-10-12T08:00:07+5:30
Vijayadashami 2021: दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ.
नवरात्रीची सांगता, रावण दहन आणि दिवाळीची चाहूल घेऊन येणारा दसरा यंदा १५ ऑक्टोबर रोजी आहे. या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या दिवशी शिक्षणाची, नवीन कार्याची, मंगल कार्याची नांदी सुरू होते. दिवाळीचे वेध लागतात. आपापसातील मतभेद विसरून, आपट्याची पाने देऊन जुन्या नात्यांना सोनेरी झळाळी दिली जाते, तो हाच सोनेरी दिवस. या दिवशी कोणते विधी केले जातात, कोणते सोपस्कार पार पाडले जातात, नवीन वस्तू किंवा वास्तू खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते, सविस्तर जाणून घेऊ.
दसऱ्याचा शुभमुहूर्त :
गुरुवार, १४ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ०६. ५२ पासून अश्विन शुद्ध दशमी दशमी सुरू होत आहे आणि शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ०६.०२ मिनिटांनी ही तिथी संपेल. परंतु दशमीची तिथी १५ तारखेचा सूर्योदय पाहत असल्यामुळे विजय दशमीचा सण शुक्रवारी १५ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा केला जाईल.
शस्त्र पूजनाची वेळ :
दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ.
अभिजित मुहूर्त - सकाळी ११. ४३ ते दुपारी १२.३० पर्यंत.
विजय मुहूर्त - दुपारी २.०१ दुपारी ते दुपारी २.४७ पर्यंत
अमृत काल मुहूर्त - संध्याकाळी ६.४४ ते रात्री ८.२७ पर्यंत.
या सणाचे विधी :
>> दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.
>> या दिवशी शस्त्रांच्या पूजेला खूप महत्व आहे.
>> या दिवशी महिषासुरला माता दुर्गेने आणि रावणाला श्री रामाने मारले, म्हणून त्या दोहोंचे पूजन केले जाते.
>> या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याची पाने देण्याची परंपरा आहे.
>> या दिवशी काही नवीन काम करण्याची, खरेदी करण्याची, नवीन कपडे घालण्याची प्रथा आहे.
>> या दिवशी गोर गरिबांना भेटवस्तू, उपयुक्त सामान, अन्नधान्य तसेच मिठाई दान दिली जाते.
>> या दिवशी कुटुंबातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींना वाकून नमस्कार केला जातो व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.
>> या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ बनवून नऊ दिवसाच्या उपासाचे पारणे फेडले जाते.
>> अनेक ठिकाणी रावणदहन करून या दिवशी फटाकेही सोडले जातात.
>> दसऱ्याच्या दिवशी, परस्पर वैर विसरून, आपट्याची पाने देऊन नव्याने संबंध प्रस्थापित केले जातात.