Dussehra 2022 : दसऱ्याला सोन्याच्या पावलांनी आलेली लक्ष्मी कायमस्वरूपी घरात राहावी म्हणून वापरा ही चाणक्यनीती!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:49 AM2022-10-04T11:49:54+5:302022-10-04T11:50:13+5:30
Dussehra 2022 : लक्ष्मी घरात राहावी यासाठी अलक्ष्मीचे वास्तव्य घरातून हलवले पाहिजे, ते कसे करायचे ते जाणून घ्या!
आपले संपूर्ण आयुष्य पैसा जोडण्यात आणि संग्रही करण्यात खर्च होते. तरी वेळ प्रसंगी कधी पैसे कमी पडतात, तर कधी उसने घ्यावे लागतात. अशा वेळी वाटते, की लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल, तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येईल. परंतु लक्ष्मी चंचल असते. ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असे म्हणतात. मात्र, धनाढयांकडे पाहिले असता, प्रश्न पडतो, हे वैभव आपल्या वाट्याला कधी आणि कसे येईल? यावर आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये म्हटले आहे,
मूर्खा यत्र न पूज्यते धान्यं यत्र सुसंचितम्।
दंपत्यो कलहं नास्ति तत्र श्री: स्वयमागत:॥
ज्या घरात मूर्ख माणसांना जागा नसते, ज्या घरात अन्न धान्याची नासाडी होत नाही, ज्या घरात भांडणं होत नाहीत, अशा घरात लक्ष्मी दीर्घकाळ वास्तव्य करते. म्हणजेच, आपले घर लक्ष्मीच्या वास्तव्यासाठी अनुकूल बनवायचे असेल तर आपण गुणी माणसांचे आदरातिथ्य केले पाहिजे. घरात केवळ धन धान्याची साठवण न करता, वेळप्रसंगी दानधर्म केला पाहिजे आणि अन्न वाया जाऊ देता कामा नये. नवरा बायकोत कलह होत असेल, तर त्या घरात शांतता कधीच नांदत नाही. यासाठी दोघांमध्ये सुसंवाद असला पाहिजे आणि दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. तरच लक्ष्मी प्रसन्न मनाने गृहप्रवेश करते.
चला तर मग, आपणही श्री लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपली वास्तू सज्ज करूया, वास्तूदोष घालवूया. म्हणजे लक्ष्मी तर येईलच, पाठोपाठ लक्ष्मीपती अर्थात नारायण भगवान देखील येतील.