Dussehra 2024: रावण दहनापूर्वी लक्ष्मणाला कळले होते 'हे' गुपित; तुम्हीही जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 01:42 PM2024-10-11T13:42:00+5:302024-10-11T13:45:24+5:30
Dussehra 2024: १२ ऑक्टोबर रोजी दसर्याच्या मुहूर्तावर रावणदहन करून विजयोत्सव साजरा केला जाईल, त्याआधी तुम्हीदेखील हे गुपित जाणून घ्या!
दसऱ्याला रावण दहन करून आपण प्रभू श्रीरामाचा विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतो. या दिवशी प्रभू श्रीरामाने कात्यायनी देवीची पूजा करून रावणाशी युद्ध पुकारले. रावणाच्या बलाढ्य सेनेला तोंड देत दशाननाचा वध करून श्रीरामाने रामराज्य स्थापन केले. असे म्हणतात, की रावणाचा वध झाला नसता तर कायमचा सूर्यास्त झाला असता. परंतु तसे झाले नाही, तरी विजयाचा सूर्य उगवला आणि तो तेजाने चमकत राहिला.
रावणाचा वध झाला तेव्हा कैक दिवसांपासून सुरू असलेले तुंबळ युद्ध क्षणार्धात थांबले. रावणाला धारातीर्थी पडलेला पाहून त्याचे सैन्य सैरावैरा पळू लागले. तेव्हा प्रभू श्रीराम स्तब्धपणे रावणाकडे पाहत होते. मात्र रावणाला पाहून लक्ष्मणाचे रक्त उसळत होते. त्याच्या मुठी रागाने आवळल्या जात होत्या. त्याचवेळेस प्रभू श्रीराम दोन्ही हात जोडून रावणाला वंदन करत होते. शत्रूसमोर हात जोडलेले पाहून लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले, 'आपण हे काय करत आहात? रावणाने आपल्या सर्वांना किती त्रास दिला हे माहीत असूनही त्या दुष्ट व्यक्तीसमोर तुम्ही हात जोडताय?'
Dussehra 2024: दसर्याला राशीनुसार दिलेले उपाय करा आणि भरघोस लाभ मिळवा!
त्यावर श्रीरामचंद्र म्हणाले, 'लक्ष्मणा 'मरणान्ति वैराणि' अर्थात मृत्यूबरोबर वैरत्व संपते. रावणाला त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली आहे. तो अखेरचे श्वास घेत आहे. तो दुष्ट असला तरी तो एक विद्वान, वेदसंपन्न, शूर, बलवान, राजकारणी होता हे आपल्याला विसरता येणार नाही. त्या विद्वत्तेला हा नमस्कार आहे. मी तर म्हणतो, राग सोड आणि त्याच्याकडून काही कानमंत्र घेता येतो का बघ.'
श्रीरामांची आज्ञा शिरसावंद्य मानून लक्ष्मण रावणाजवळ आला. हात जोडून म्हणाला, 'आपल्याशी आमचे शत्रुत्व असले, तरी आपल्या विद्वत्तेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. आपल्याकडून आयुष्यभरासाठी काही कानमंत्र मिळाला, तर मी ते माझे भाग्य समजेन.'
तेव्हा रावणानेही वैरभाव सोडून लक्ष्मणाला उपदेश केला -
चांगल्या कार्यात कधीच विलंब करू नये. तसेच जे कार्य आपल्याला चुकीच्या मार्गावर नेणार असल्याचे आपले मन आपल्याला सूचित करते, त्या कार्यात कितीही मोहाचे क्षण आले, तरी ठामपणे नकार देता आला पाहिजे.
Dussehra 2024: 'या' पाच गोष्टींचे आपल्याला सीमोल्लंघन करता आले तर खरा विजयोत्सव!
पराक्रम, कर्तृत्व गाजवण्याच्या नादात मनुष्य एवढा भरकटत जातो, की त्याला योग्य-अयोग्य याची समज उरत नाही. आपण दुसऱ्याला तुच्छ लेखू लागतो. अहंकारामुळे आपलाच सर्वनाश होतो. म्हणून काहीही झाले तरी आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवावी आणि प्रसंगी हितचिंतकांचे मार्गदर्शन घ्यावे.
शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही गोष्टी आपण आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवल्या पाहिजेत. व्यक्ती आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही. जसे की, माझा भाऊ बिभीषण माझ्या राज्यात असे पर्यंत तो माझा हितचिंतक होता, श्रीरामांना येऊन मिळाल्यावर तो माझा शत्रू झाला. त्याने सगळे गुपित श्रीरामांना सांगितले. म्हणून काही बाबतीत गोपनीयता जरूर पाळली पाहिजे.
या तीन गोष्टी सांगून रावणाने प्रभू श्रीरामांना वंदन केले आणि जगाचा निरोप घेतला. लक्ष्मणाला सांगितलेल्या या गोष्टी आपणही लक्षात ठेवूया आणि त्या आचरणात आणून आपल्यातला रावण कायमचा नष्ट करूया.
Dussehra 2024: इतर वेळी पूजेत आंब्याचे, विड्याचे पान; पण दसर्याला का बरं आपट्याच्या पानाला मान?