Early Marriage Tips: तरुणांनो, तुम्हालाही तुमची स्वप्नातली सावित्री लवकर मिळवायची असेल तर करा 'हे'उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:29 PM2022-06-13T15:29:12+5:302022-06-13T15:29:40+5:30
Early Marriage Tips: काही जणांची गाडी शिक्षण, नोकरीनंतर अचानक लग्न या विषयापाशी येऊन थांबते. यासाठी ज्योतिष शास्त्राने मुलांसाठी सुचवलेले उपाय!
जोडीदाराला दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळावे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. सती सावित्री सारखा उपास करतात, मनोभावे वडाची पूजा करतात. त्याचे फळ त्यांना मिळते. पण मुलांच्या बाबतीत असे विशिष्ट व्रत असल्याचे आपल्या ऐकिवात नाही. याचा अर्थ त्यांनी वाट बघत थांबून राहायचे का? वेळ वाया घालवायचा का? त्यांनाही उपासना करावीशी वाटत असेल तर नेमका मार्ग कोणता? याबद्दल ज्योतिष शास्त्र मार्गदर्शन करत आहे.
वेळेत शिक्षण, वेळेत करिअर, वेळेत लग्न आणि पुढचा संसार सुरळीत व्हावा, अशी सर्वसामान्यपणे प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र काही जणांची गाडी शिक्षण, नोकरीनंतर अचानक लग्न या विषयापाशी येऊन थांबते. मुली स्तोत्रवाचन, जप, जाप्य इ. उपाय करतात. पण मुलांनी नेमके कोणते उपाय करायला हवेत हे कोणीच सांगत नाही. यासाठीच ज्योतिष शास्त्राने मुलांसाठी पुढील उपाय सुचवले आहेत.
लग्नाला उशीर होण्यामागे किंवा वारंवार फसवणूक होण्यामागे कुंडलीतील ग्रह कमकुवत असू शकतात. मात्र त्यावर उपाय केले तर मनासारखा जीवनसाथी मिळणे अवघड जाणार नाही. जर तुम्हाला जोडीदार मिळत नसेल किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न ठरण्यात अडथळे येत असतील तर पुढे दिलेले उपाय सुरू करा.
- जर तुमचा जोडीदाराचा शोध संपत नसेल, तर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा. यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेमाचा वेणूनाद होईल आणि प्रेमाची बाधा दूर होऊन तुमची राधा तुम्हाला लवकरच सापडेल.
- एखाद्या मुलीवर तुमचे प्रेम आहे पण लग्न जुळून येण्यात अडथळे येत असतील तर एखाद्या उंचावरील देवीच्या देवस्थानात दर्शनाला जा. देवीला आपली समस्या सांगा आणि श्रीफळ अर्पण करून संसार मार्गी लागू दे अशी प्रार्थना करा.
- चांगला आणि प्रामाणिक जीवनसाथी मिळण्यासाठी भगवान शिव शंकराची आराधना करा. १६ सोमवारचा उपास सुरू करा. ते शक्य नसेल तर दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन अभिषेक करा. भोलेनाथाची कृपा झाली तर तुम्हाला चांगला जोडीदार मिळून आयुष्य मार्गी लागेल.
- कुंडलीतील ग्रह दोषांमुळे विवाह ठरण्यात अडचणी येत असतील तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. दररोज ''ओम लक्ष्मी नारायण नमः'' या मंत्राचा जप करा. पुढच्या तीन महिन्यात तुमचे लग्न ठरले तर एखाद्या गरजू जोडप्याला अन्न तसेच पिवळ्या वस्त्राचे दान करा.
- प्रेम विवाह पार पडण्यात अडचणी येत असतील तर शनिवारी तसेच अमावस्येच्या दिवशी प्रियकर-प्रेयसीने भेटणे टाळावे. घरी लग्नाचा प्रस्ताव मांडायचा असेल तर शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मांडावा. घरातून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल.
- लग्न ठरेपर्यंत आणि ठरल्यावरही शक्य तेव्हा कृष्ण मंदिरात दर्शनाला जा. राधा कृष्णाची उपासना करा. शक्य झाल्यास स्वतःच्या हातांनी गुंफलेला हार किंवा एखादे फुल देवाला अर्पण करा.
- वरवर सोपे वाटणारे हे तोडगे तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळवून देईल.