'आधी पोटोबा मग विठोबा' हे बरोबर आहे का? शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 03:15 PM2022-02-10T15:15:25+5:302022-02-10T15:15:50+5:30
अनेक गोष्टींची आपल्याला सवय असते परंतु त्या सवयी योग्य आहेत की अयोग्य ते वेळोवेळी तपासून घ्यावे.
आपल्यापैकी अनेकांना सवय असते, सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्कीट खाण्याची! ही सवय एवढी अंगवळणी पडते, की अनेकदा या सवयीमुळे उपास तुटतो. कारण आज उपास आहे आणि उपासाला बिस्कीट खाल्लेले चालत नाही, हे लक्षातच येत नाही. परंतु हा सवयीचा भाग योग्य आहे की अयोग्य, याबाबत शास्त्र काय सांगते, ते पाहू!
शास्त्रात म्हटले आहे, की अंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये. उठल्यावर आपल्या दिनचर्येची सुरुवात प्रसन्न व्हावी, यासाठी व्यायाम, अंघोळ, पूजाआणि नंतर न्याहारी असा शास्त्राने क्रम ठरवून दिला आहे. ज्यांना औषध घ्यावे लागते, त्यांचा अपवाद वगळता सुदृढ लोकांनी अंघोळ केल्याशिवाय न्याहारी करू नये, असे म्हटले आहे. सकाळी उठल्यापासून विषय सुखात मन अडकवून न घेता परमात्म्याचे चिंतन करावे मग अन्य विषयांचा विचार करावा, ही त्यामागील भावना आहे. त्याला विज्ञानाने देखील पुष्टी दिली आहे.
विज्ञान सांगते -
व्यायाम केल्याने शरीरातून येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. स्नान केल्याने ती पातळी संतुलित होते. शरीराला शीतलता आणि स्फूर्ती येते आणि भूक देखील लागते. भूक लागल्यानंतर आपण काही खाल्ले तर ते अन्न शरीराला जास्त पुष्टिवर्धक असते. अंघोळ करण्यापूर्वी काही खाल्ले, तर जठराग्नी ते पचवण्याचे कार्य करते. त्यानंतर अंघोळ केल्यास ते थंड पडते आणि पचनक्रिया मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि पचनक्रियेचे आजार उद्भवतात. पोटात वात धरतो आणि दिवसभर अस्वस्थता जाणवते.
म्हणून सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप, मध लिंबू पाणी, कोमट पाणी असे द्रव पदार्थ काहीही प्या, परंतु व्यायाम, अंघोळ, पूजा झाल्यानंतरच अन्नाचे सेवन करा.